
>>द्वारकानाथ संझगिरी
निसर्गाने इंग्लंडला सौंदर्याचं वरदान दिलंय. हे वरदान चार महिने आपले डोळे सुखावतं. मे-जून-जुलैमध्ये आपली नजर पोहोचेल तिथवर हिरवा रंग त्याच्या विविध रूपांत दिसतो. त्यामुळेच ते पाचूचं बेट वाटतं. त्यावेळी इंग्लंडमध्ये कार किंवा ट्रेनने फिरणं हा एक वेगळा सौंदर्यानुभव असतो. क्रिकेटच्या विश्वचषकासाठी फिरताना बऱ्याचदा हा निसर्ग तुम्हाला पुनर्जीवित करतो. एक नवी ऊर्जा देतो.
साऊदम्प्टनच्या सामन्यानंतर ही ऊर्जा घेण्यासाठी मी ‘डर्डल डोअर’ला गेलो. माझ्या बरोबर विनायक दळवी आणि निमिष पाटगावकर हे माझे दोन पत्रकार मित्रही होते. इंग्लंडच्या दक्षिणेला डॉरसेटमध्ये ज्युरॅसिक किनाऱ्यावर एक दगडाची नैसर्गिक कमान तयार झालीय. त्याला ‘डर्डल डोअर’ म्हणतात. ज्युरॅसिक किनारा जवळजवळ 96 मैलांचा आहे. ईस्ट डेव्हनमधल्या एक्समथमधून तो सुरू होतो तो डॉरसेटपर्यंत येतो. त्याचं नाव ज्युरॅसिक आहे. कारण तिथल्या दगडांचं अस्तित्व हे ज्युरॅसिक काळापासून आहे. तिथल्या डोंगरात ज्युरॅसिक काळापासूनच्या प्राण्यांचे अवशेष फॉसिल्सच्या रूपात सापडतात. हे डर्डल डोअर जेव्हा तुम्ही डोंगरावरून पाहता तेव्हा एक अजस्र डायनासोर निळं पाणी पितोय असा भास होतो, पण त्याचा आणि ज्युरॅसिक बीच नावाचा संबंध नाही. ‘वेल्डस्’ नावाच्या एका कुटुंबाचा या डर्डल डोअरवर चक्क ‘मालकी’ हक्क आहे. डॉरसेटमध्ये त्यांची बाराशे एकरची इस्टेट आहे. त्या इस्टेटीचा डर्डल डोअर एक भाग आहे, पण त्यांनी तो हॉटेल किंवा रिसॉर्टला न देता सर्वसामान्य माणसांसाठी खुला केलाय. जुन्या इंग्लिशमध्ये डर्डलचा अर्थ ‘ड्रिल केलेला’ असा आहे. चुनखडीच्या (Limestone) डोंगरात ही कमान निसर्गाने ड्रिल केल्यासारखी वाटते.
सर्वसाधारणपणे इंग्लंडमध्ये कुठेही बस आणि ट्रेनने पोहोचता येतं. इंग्लंड आणि अमेरिकेतला हा मोठा फरक आहे. अमेरिकेत लिंबू आणायलाही पार्श्वभागाखाली गाडी लागते. इंग्लंडमध्ये बस, ट्रेन तुम्हाला कुठेही नेऊन सोडतात, पण डर्डल डोअरच्या बाबतीत तो प्रवास जरा जिकिरीचा आहे. मुख्य म्हणजे ते ट्रेन-बसचं वेळापत्रक पाळणं थोडं कठीण होतं. त्यामुळे आम्ही गाडी भाडय़ाने घेतली. तिथे आपल्याप्रमाणे ट्रॅफिकला ‘कीप लेफ्ट’ हा मंत्र असल्यामुळे गाडी चालवणं आपल्याला सोपं जातं. त्यातल्या त्यात कठीण गोष्ट असते ती नियम पाळणं किंवा कायदा न तोडणं. आपल्याकडे लोक महात्मा गांधींना विसरले, पण त्यांची सविनय कायदेभंगाची चळवळ ट्रॅफिकच्या बाबतीत मात्र सुरू ठेवलीय. इंग्लंडमध्ये त्यासाठी सविनय शिक्षा होते. निमिष पाटगावकर आमचा सारथी झाला आणि आम्ही साऊदम्प्टन एअरपोर्टवरून निघालो. होकायंत्रापासून प्रगती होत होत आता माणसाच्या हातात जीपीएस आलंय. पूर्वी इंग्लंडमध्ये गाडी चालवताना वेगवेगळे नकाशे घेऊन बसावं लागे. जवळ जवळ 2000 सालापर्यंत मी तो खेळ जवळून पाहिलाय. नंतर टॉमटॉम आले. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वाटाडय़ाच, पण कंपनीचं नाव ‘टॉमटॉम’ म्हणून त्याला टॉमटॉम म्हणत. आता मोबाईल. हा असा जादूचा दिवा आहे, तो घासला की, सर्व काही मिळतं. त्यातल्या जीपीएस नावाच्या वाटाडय़ाला आम्ही जागृत केलं, पण तो अवलंबून असतो वायफायवर. त्या रस्त्यावर काही ठिकाणी वायफाय नसायचं आणि तो वाटाडय़ा चुकवायचा. त्यामुळे चुकत आम्ही दोन तासांचा प्रवास अडीच तास केला, पण ते चुकणं भयंकर सुखद होतं. कारण इंग्लंडमध्ये गावचे रस्ते अरुंद असतात. बाजूला हिरवं गवत नाहीतर टुमदार बंगले असतात. ते छोटय़ा डोंगरांच्या अंगावरचं गवत पाहिलं की, शम्मी कपूर, देव आनंदप्रमाणे हिरॉईनसह गाणी म्हणत लोळत खाली यावंसं वाटतं. खरं सांगायचं तर मनाने मी देव आनंदप्रमाणे ‘उफ् युम्मा’ म्हणत लोळण घेऊनही आलो. बरोबर आशा पारेख तेवढी घरची होती. ती रस्त्यावरची गावं पाहिली की, आपलं गाव असं असावं असं वाटतं. ‘त्या तिथे पलीकडे, तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे’ लिहिणारे माडगूळकर काही वर्षे इंग्लंडच्या खेडय़ात राहिले असते तर त्यांनी त्या खेडय़ाचं अफलातून वर्णन केलं असतं. ‘खेडं’ हा शब्द चुकीचा. तिथे काय नसतं? प्रत्येक सुखसोय, शांतता आणि वर निसर्ग हा बोनस! एक चर्च असणारं, एक पब असणारं, एक फिश ऍण्ड चिप्सचं दुकान असणारं मस्त निवृत्ती जीवन जगायला आदर्श अशी ही गावं किंवा किमान वीकेण्ड एन्जॉय करायला तरी. आम्ही डर्डल डोअरला कधी पोहोचलो ते कळलंच नाही. खारा वारा नाकात गेल्यावर समुद्राची चाहूल लागली. डोंगरावर एक कार पार्क आहे. तिथे गाडी ठेवायची आणि खाली उतरत जायचं. उतार बऱ्यापैकी जास्त आहे. मग एका व्हय़ू पॉइंटला आपण येतो आणि तिथे ते दृश्य तुम्ही डोळ्यांच्या कॅमेऱ्याने क्लिक करायचं. डोळा हा सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा आहे. त्यामुळे हवे तेवढे फोटो काढून तुम्ही ते जतन करून ठेवू शकता. त्या फोटोत दिसते ती कमान, तो पाणी पिणारा डायनासोरसदृश डोंगर, निळा आणि मध्येच मयूरपंखी वाटणारा समुद्र आणि क्षणभर पांढऱ्या वाळूत येऊन विसावणाऱ्या मंद लाटा. हे सर्व फोटो काढताना गार वारा तुमच्या शरीराशी झोंबत असतो. या व्हय़ू पॉइंटवरून खाली उतरले की, वाळू येते. आम्ही गेलो त्या दिवशी सूर्य तळपत होता. त्यामुळे सूर्यकिरणांसाठी आसुसलेली गोरी मंडळी वाळूत विसावली होती. मी अंगात जॅकेट घालून त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होतो. मी अंगात जॅकेट घालून वाऱ्याला दूर ठेवत होतो आणि ती मंडळी वारा अंगावर खेळवत होती. दोन-चार तरुण-तरुणी पाण्यात पोहत होते. काही मंडळी किनाऱ्यावरून दूर चालत निघालेली होती. कारण दूरवर आणखी एक नैसर्गिक कमान दिसत होती. थंडीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे हे मला जाणवलं.
‘डर्डल डोअर’ पाहताना मला पटलं की, निसर्ग हा एक अत्यंत दर्जेदार मूर्तिकार असतो. समुद्राच्या लाटा, वारा ही त्याची ‘छिन्नी-हातोडा’ वगैरे असतात. हजारो वर्षे काम करून तो ‘डर्डल डोअर’सारखं नैसर्गिक शिल्प तयार करतो. ती कमान एवढी मोठी आहे की, त्यातून मध्यम आकाराची बोट जाऊ शकते. या डर्डल डोअरवर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालंय, कविता लिहिल्या गेल्या आहेत. एक कविता मला आवडली.
आर्थर माऊल नावाच्या कवीने त्या डर्डल डोअरवर चार ओळी लिहिल्या आहेत-
Shall the tide thus ebb and flow for ever?
and for evermore
Rave the wave and glance the ripple through the rocks at Durdle Door?





























































