ब्लड मनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

स्पेनमध्ये येऊन बुल फाइट पाहायला न मिळणं हे दुर्भाग्य की सद्भाग्य?

मला या क्षणी ठरवणं कठीण जातंय.

‘बुल फाइट’ हे क्रूरतेचं दुसरं नाव आहे, पण एक लेखक म्हणून तो अनुभव एका बाजूला मला फार महत्त्वाचा वाटतो, तर क्रूरतेच्या प्रदर्शनात लोकांनी बेभान होऊन मारलेल्या टाळय़ा, त्यांनी एका प्राण्याच्या शिकारीवर केलेला उत्सव, मुखातून येणारे चीत्कार याचा भाग बनणं माझ्यातील संवेदनशील मनुष्याला भावलं नसतं.

स्पेनला जाताना बुल फाइट पाहायची इच्छा होती. माद्रिदच्या बुल रिंगवर गेल्यावर जोपर्यंत माद्रिदमध्ये होतो, तोपर्यंत बुल फाइट नाही हे कळल्यावर मी हिरमुसलो, पण तिथे पाहिलेले व्हिडीओ आणि तिथल्या हिंदुस्थानी गाईडने केलेले वर्णन, तो एरिना पाहिल्यावर एक जाणवलं की, माणूस हा जनावरच असतो. तो कधी कधी माणूस होतो. जनावरं तरी त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याशिवाय किंवा पोटात भुकेचा डोंब उसळल्याशिवाय शिकार करत नाहीत, पण माणसं निव्वळ क्रूरतेतून मिळणाऱया आनंदासाठी प्राण्यांचा जीव घेतात. तुम्ही आफ्रिकेत हिंस्र प्राणी पाहायला गेलात तर सिंहाने केलेली एखाद्या हरणाची शिकार पाहणं हे माणूस सद्भाग्य समजतो. पाश्चिमात्य देशांत तर प्राण्याला ‘गेम’ म्हणणं (पाळीव प्राणी सोडून) म्हणजे शिकार म्हणणं हे नैसर्गिक असतं.

‘बुल फाइट’ हा एक रानटी, मदमस्त बैलाची शिकार करण्यात आनंद मानण्याचा, त्याला शूरत्व समजण्याचा आणि त्यात सामूहिकपणे आनंद लुटत सहभाग करणारा खेळ आहे. खरं तर ती स्पेनची परंपरा आहे आणि सुजाण जगाकडून विरोध होत असताना टिकवण्याची धडपड आहे. ही संस्कृती असेल तर ती पाशवी संस्कृती आहे.

माद्रिदच्या बुल रिंगबाहेर काही महान ‘माताडोर’चे पुतळे आहेत. माताडोर (इंग्लिशमध्ये मॅटाडोर) म्हणजे बैलाला यमसदनाला पाठवतो तो वीर! एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियमसारखा तो स्टेडियम होता. बावीस हजारांची क्षमता होती. त्याच्यापेक्षा मोठा स्टेडियम फक्त मेक्सिकोतच आहे. इंग्लिश मंडळी जिथे गेली तिथे क्रिकेट घेऊन गेली. स्पॅनिश बुल फाइट घेऊन गेले. तिथे देशाच्या प्रेसिडेंटची खास राखीव जागा आहे. चार युरोपासून (रुपये ३२०) शंभर युरोपर्यंत (आठ हजार रुपये) तिकीट असतं. चार युरोत अर्थात वर कोपऱयात उन्हाच्या झळा सोसत बसायचं. शंभर युरोत पुढे बैलाच्या तोंडावरचे मृत्यूला कवटाळण्याच्या अवस्थेतील केविलवाणे भाव दिसतील आणि मॅटाडोरच्या चेहऱयावरचा उन्माद दिसेल अशी जागा ती असते.

ही बुल फाइट वीस मिनिटांची असते. माद्रिदमध्ये बैलाला घेऊन जायला यम आला की, संपली लढत. पोर्तुगालमध्ये बैलाला मारण्यावर बंदी आहे. स्पॅनिशपेक्षा पोर्तुगीज थोडे संवेदनशील आहेत असं म्हणायला हरकत नाही. शिकार करणारा मॅटाडोर घोडय़ावरून योद्धय़ाच्या वेशात येतो. हातात त्याच्या तलवारीसारखं शस्त्र आणि लाल कापड असतं. लाल कापडामुळे बैल बिथरतो ही अंधश्रद्धा आहे. बैलाला रंग कळत नाहीत. केवळ कापडाच्या हालचालीवरून तो उचकतो. बैलाच्या वशिंडावर (पाठीवरचा उंचवटा) आणि त्याच्या बाजूला तीक्ष्ण हत्याराने वार केले जातात. कारण तिथे बैलाचं हृदय असतं. तिथे वार करून बैलाचं हृदय विदीर्ण केलं जातं आणि मग घायाळ बैल रक्तबंबाळ होऊन धारातीर्थी पडतो. प्रेक्षक जल्लोष करतात. कुणाचंही का असेना, रक्त पाहून आनंदाने नाचणारी मंडळी मला रक्तपिपासू वाटतात. एखाद्या मॅटाडोरने बैलाला मारताना चांगलं कौशल्य दाखवलं तर त्याला बैलाचा कान बक्षीस मिळतो, पराक्रम मोठा असेल तर दोन कान, स्पृहणीय असेल तर बैलाची शेपटी. ही मानाची पदकं आहेत, पण या रक्तपिपासू मंडळींनाही काळीज असतं, बैलाच्या शौर्याची कदर असते हे दाखवणारं एक इनाम आहे. बैलाने खरंच पराक्रमाची शर्थ केली असेल तर त्याला चक्क जिवंत सोडण्यात येतं. तो बैल सांड मानला जातो. त्याला अशा मृत्यूपासून अभय मिळते आणि प्रजोत्पादन हे महत्त्वाचं कार्य त्याच्यावर सोपवलं जातं. प्रजोत्पादनाची फार मोठी गरज असते. कारण वर्षाकाठी या ‘बुल फाइट’मध्ये अडीच लाख बैल माणसाच्या विकृत आनंदाची शिकार होतात. या बैलांना गोठय़ात मोठं करत नाहीत. जंगलाच्या वातावरणात त्यांना ठेवतात. खरं तर पोसतात. त्यांचा माणसांशी संपर्क नसतो. त्यामुळे ते लढायला प्रवृत्त होतात. त्यांचा मृत्यू कसाईखान्यातल्या बैलाप्रमाणे एका क्षणात होत नाही. ते त्यांचे मरण स्वतःच्या डोळय़ाने मानवी जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर पाहत मरतात.
तुमचा पुढचा प्रश्न असेल, मेलेल्या बैलांचं काय करतात?

त्यांना कसाईखान्यात नेऊन, कापून त्यांचं मटण विकलं जातं. एक बैल स्पॅनिश माणसाला सांस्कृतिक आनंद देतोच, पण जिभेचे चोचलेही पुरवतो. ‘स्पॅनिशांच्या कल्याणा बैलांची विभूती’ असं म्हणायला हरकत नाही.

त्या गाईडला माझा प्रश्न होता की, किती बुल फायटर्स मरतात? अलीकडे तर क्वचितच. अर्थात त्यांना जखमा होतात, पण एक आकडेवारी अशी दिली जाते की, सतराशे सालापासून आजतागायत फक्त ५३३ बुल फायटर्स मृत्युमुखी पडले आहेत किंवा स्वतःच्या पायाने मृत्यूकडे संस्कृती रक्षणासाठी चालत गेले. बरं, या संस्कृती रक्षणासाठी किती पैसे मॅटाडोरना मिळतात? हाही प्रश्न माझ्याप्रमाणे तुमच्या डोक्यात उद्भवला असेल. आमच्या गाईडच्या मते एका बुल फाइटसाठी पंधराशे ते दोन हजार युरो. म्हणजे एक लाख वीस हजार ते एक लाख साठ हजार! मला हे कमी वाटतात. आपल्या क्रिकेट टीमचे राखीव खेळाडू नुसतं पॅव्हेलियनमध्ये बसून यापेक्षा जास्त कमावतात आणि बुल फायटिंगमध्ये तर एखाददोन चुका आणि मॅटाडोर रक्तबंबाळ होऊ शकतो. त्याचा स्टॅमिना, त्याचा फिटनेस, त्याच्या हालचालीतली लवचीकता, त्याचे रिफ्लेक्सेस यांचा विचार करा! मार्शल किंवा थॉम्सनचे चेंडू हेल्मेट, पॅडस्शिवाय वीस मिनिटं खेळण्यासारखं भयकारी आहे हे! पण मध्यंतरी एका मोठय़ा बुल फायटरच्या मॅनेजरने कबूल केलं की, त्याच्या मालकाला पाच कोटी युरो वर्षात मिळाले. स्पेनच्या अध्यक्षाला वर्षाकाठी ब्याऐंशी हजार पाचशे युरो मिळतात. खरंच या पैशाला ‘ब्लड मनी’ म्हणायला हरकत नाही. ‘रक्तरंजित पैसा’ असं त्याचं भाषांतर करावं.

रोमन काळाच्या आधीपासून वेगवेगळय़ा प्रकारे सुरू असलेली प्रथा पुढे स्पेनची संस्कृती बनली, पण स्पेनमध्येही आता विरोधाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. नवी पिढी बुल फाइट पाहायला जात नाही. मी हा लेख बार्सिलोनात बसून लिहितोय. तिथे चक्क बंदी आहे. तिथल्या बुल रिंगचं रूपांतर शॉपिंग मॉलमध्ये झालंय. जगभर आता अशा खेळांना विरोध होतोय. हे माणूस सुसंस्कृत आणि प्राण्यांच्या बाबतीत अधिक कनवाळू होत चालल्याचं लक्षण आहे. माझा या बंदीला पाठिंबा आहे.

…आणि म्हणूनच ही बुल फाइट पाहायला न मिळणं हे सद्भाग्य मी मानतो.

– [email protected]