>> मलिका अमरशेख
सावळं सावळं आभाळ… मंद कुंद हवा… आणि अचानक सर सर रिमझिम सुरू होते… गारवा… मातीचा मंद गंध… पांढरे शुभ्र थेंब पानांवर उडय़ा मारत नाचून जमिनीवर झेप घेताना… अशाच वेळी पटकन् बाहेर पडायचं… बाहेर सगळे गडबडीनं गोंधळून आडोशाला पळत असतात… आपण नाही पळायचं… हात पसरून वर पाहायचं… पापण्यांवर थेंब… गार गार थेंब… निसर्गाचा आशीर्वाद भरभरून… कपडे भिजतायत भिजू द्या… मन भिजतंय… भिजू द्या… आत बाहेर पाऊस… आत्मासुद्धा चिंब झालाय… किती काळ रखरख सोसलीय शरीरानं… मनानं… मातीचा गंध श्वासात भरून घ्यायचा. रूपरंग गंध सगळय़ा जाणिवेनं पाऊस भोगायचा…
पावलाखालचं हिरवंगार गवत मखमल झालीय… लाल मातीची पाऊलवाट सगळी चंदनाची झालीय… रानफुलं रंगीत हसतायत… पाकळय़ांच्या नाजूक गालातून… सगळय़ांना कसला आनंद झालाय… जंगल लहान बाळासारखं हसतंय डोलतंय… झाडं जागच्या जागी नाचतायत थयथय… लांबवरून पक्ष्यांची किलबिल… कात टाकलेल्या सापासारखा सर्पिल रस्ता चमकतोय… पावसाचा आवाज… तो नाद रुणझुण पैंजणागत वाजतो… सागराच्या गाजेसारखा तो धीरगंभीर नसतो… मित्रानं पिंवा मैत्रिणीनं कानगोष्टी सांगाव्या न् खळखळून हसावं तसा असतो पावसाचा नाद-आवाज… झऱयाचा झुळझुळ आवाज… धबधब्याचा आवेगी आवाज… आणि त्यात पावसाचा रिमझिमता ओला गहिरा आवाज सगळं बोलावतं आपल्याला… या या म्हणतं…
पाऊस म्हणतो… मी तुमच्यासाठी येतो…
फुलं म्हणतात मी तुमच्यासाठी फुलते…
झरे म्हणतात मी तर धावत येते केवळ तुम्ही माझ्या पाण्यात चुळूकबुळूक पाय वाजवाल न् चेहरा पाहाल माझ्या पाण्यात म्हणून! अगदी नार्सिसस नाही, पण निसर्गाचं मूळ होऊन त्याला बिलगायला हा पावसाळाच योग्य मोसम असतो… लहानपणी आभाळात काळे काळे ढगोबा मोठ्ठाली पोटोबा सावरत आले की धूम पळायचं घरात… विजेनं आसूड वाजवला की आईच्या पदरात दडायचं… मग नंतर कागदाच्या होडय़ा करून साचलेल्या पाण्यात सोडायला मजा येऊ लागली.
नंतर त्या साचलेल्या पाण्यात पागोळय़ा पडल्या की पाण्यात अंगठय़ा तयार व्हायच्या… कधी कधी लाईट गेली की मेणबत्त्या लावून पाऊस ऐकत बसायचं… खूप गूढ… खूप अंतरंगातलं काही हळवं होऊन त्या अंधारात स्वतःला भेटत पावसाला ऐकायला खूप शांत वाटतं… पाऊस आणि समुद्र आणि जंगल तुमच्याकडे काहीच मागत नसतात… त्यांना फक्त देणंच ठाऊक आहे…
झाडांना पानगळीचं दुःख माहीत असतं, पण तरी ते वाट पाहतं पावसाची बहराची… मुंग्यांना माहीत असतं पाऊस कधी येणाराय ते…पाखरांना पण माहीत असतं… सगळे आधीपासूनच त्याच्या स्वागताची न् पावसाळय़ातल्या बेगमीची न् घरटय़ाची तयारी करतात… आपण त्याला भेटायला उत्सुक असतो, पण तो आला की आडोशाला पळतो. पावसाला ते मुळीच आवडत नाही. तो तुमच्यासाठी येतो… सकाळी तुम्ही कामावर जायला गडबडीनं बाहेर निघता तेव्हाच तो येतो; का की तुम्ही भेटावं! न् संध्याकाळी कामावरून घरी परतताना पण तो येतो!
पावसाला तर तम भाव नसतो… गरीब श्रीमंत उच्च नीच असं काही नाही. तो सर्वांना सारखाच भेटतो आवेगानं… खूप दिवसांनी जिवाभावाचा मित्र भेटावा न् घट्ट गळाभेट घ्यावी तसा येतो तो…
वाऱयाचा हात धरून पाऊस शहरात जंगलात गावात नाचत उडय़ा मारत फिरतो… त्याला खूप काही सांगायचं असतं… जंगलातले वणवे विझवायचे असतात… माणसांच्या मनातील वणवे न् देहावरला वैशाखवणवा पण शांतवायचा असतो… एवढय़ा उंचावरून त्याला सगळं दिसतं, सगळं कळतं… धरणांचे दगडी ओठ तृप्त झाले की तो पुढच्या गावाची वाट धरतो… नांगरट केलेली काळी तपकिरी ढेकळं वाट पहात असतात… कांबळं खांद्यावर टाकून घामेजल्या चेहऱयानं शेतकरी वर पाहात असतो…
मातीत रुजलेल्या बिया हाका मारतात ती त्यालाच फक्त ऐकू येते… तो जसे आपले ताणे बाणे चूपचाप ऐकून घेतो तसंच बेडकांचं ‘डराँव डराँव’ असलं विचित्र गाण्यातून बोलावणं पण ऐकतो… कधी कधीच खूप वैतागला की तो हातातला विजेचा चाबूक आपटवत असा धिंगाणा घालतो की माणूस जात हबकून जाते…
-तसं तर आपल्या मनात पण मेंदूत पण किती विचारांचे धिंगाणे चालू असतात… रागांचे वणवे…, द्वेषाच्या ठिणग्या… पण आपण बाहेरचा पाऊस आत येऊ देत नाही. त्यामुळे त्या ठिणग्या-वणवे विझतच नाही. बाहेर पाऊस पडताना आत पण मेंदूत मनात पण पाऊस हवा… आपण पणत्या-निरांजनं असं काय काय लावतो… मनात नाही लावत मग मनाचे कोपरे अंधारेच राहतात- मेंदूच्या काजळी गल्ल्यात दुःखाची विषाद न् क्रोधाची वटवाघळं उडायला लागतात. देवाला भेटायला कोसच्या कोस चालत जातो… पण पावसाला भेटत नाही- स्वतःला भेटत नाही. जर स्वतःलाच भेटायला वेळ नसेल न् घाबरत असाल तर मग पाऊस कसा येणार मनात मेंदूत आत्म्यात? कुठलाच दिवा लागणार नाही अंतरात… अंतरआत्म्यात… समुद्र, पाऊस, धबधबा, जंगलं हे सर्व तुम्हाला काहीतरी सांगत असतात… आपण ते ऐकत नाही… आपण सर्वच नार्सिसस झालोत… न् आपण जेव्हा पाण्यात पाहू तेव्हा एका कुरूप माकडाचा चेहराच दात विचकताना दिसेल!
पावसाचा थेंब तळहातावर घ्या… डोळय़ांवर घ्या… डोळे मिटून पाऊस अनुभवा… तो हळूहळू ओल्या पावलांनी तुमच्या अंतरंगात उतरेल! हळूहळू चेहरा, हात, पाय, शरीर न् मग देहाची जाणीवच विरत विरघळत जाईल त्या पावसात… मग खूप शांत वाटेल… तृप्त वाटेल… न् मग तर तेही विरघळून जाईल… ‘मी’ ही भावना नाही- काही नाही… फक्त एक शांत तृप्त समृद्ध, मौन आणि त्या मौनाची झिमझिम्… असा पाऊस तुम्ही झालात की समजा तुम्ही परत जन्मला… परत हिरवं हसू हसत तुम्ही चैतन्याच्या गावातला पाऊस व्हाल!!





























































