
>> मलिका अमरशेख
बुडणाऱ्या कावळय़ाला पंजानं ओढून बाहेर काढून निर्मळ भावनेनं परत जाणारं अस्वलं – चिखलात रुतलेल्या माणसाला हात देणारा चिम्पांझी! पिल्लाला पाण्यातून बाहेर काढणारा हत्तींचा कळप. हे सारं पाहिलं की समाधानानं मन, डोळे, मेंदू तृप्तावतो – गहिवरतो – न् या वैविध्यानं नटलेल्या तरीही एकमेकांप्रती भूतदया असणाऱ्या अमोघ, असीम, उदार, समृद्ध, वैभवी, सृष्टीप्रति, निसर्गाप्रति, वसुंधरे प्रति नकळत हात जोडून मान नम्र होत जाते. सृष्टीची ही आगळीवेगळी रूपंच जणू…
अनेक पक्ष्यांच्या, पशूंच्या प्रजाती पृथ्वीवरून नष्ट होत चालल्यात. कोटय़वधी वर्षांपूर्वी डायनोसॉर, ऱिहनोसॉर होते. प्रचंड महाकाय –
एक अतिभव्य उल्कापिंड कोसळून ते नष्ट झाले. हे बरंच झालं म्हणायचं. कारण ते असते तर आता हे लिहायला मी न् वाचायला तुम्ही अस्तित्वातच नसतो, पण काही प्रजाती मात्र निसर्ग साखळीतला महत्त्वाचा दुवा म्हणून असायला हवा, तो मात्र आपल्या हव्यासानं नष्ट होत चाललाय्..चिमण्यांपासून वाघांपर्यंत… जटायूपासून गरुडापर्यंत…
नंतर कदाचित पुढल्या पिढीतल्या मुलांना चित्रातच सगळे पशुपक्षी दाखवण्याची वेळ न येवो म्हणजे मिळवलं…
नुकतेच चित्त्यांना चक्क नामिबियातून आणलं गेलं! मग आधीचे इथले चित्ते कुठं गेले? स्वतःचं जपायचं नाही आणि मग शेजारच्यांकडे मागायचं! ते तरी जपणार का?
राणीची ‘बाग’ पूर्वी ‘गरीब’ राणीची बाग होती. जुने गंजलेले पिंजरे – त्यातले वेडय़ागत येरझाऱया घालणारे दीनवाणे केविल पशू.
दगडी मूर्तिगत स्तब्ध असणाऱया मगरी – साप – गलेलठ्ठ – गब्दुल पाणघोडा गाईइतका गरीब दिसायचा – तर महाकाय हत्ती सुपाएवढय़ा कानानं उंदराएवढय़ा शेपटीनं माशा मारत पाय हलवत बसलेल्या न् दुकान न चालल्यामुळे उदास ढेरपोटय़ा हलवायागत मलूल दिसायचा.
झाडांचीच काय ती श्रीमंती – आत्ता बरं केलंसं ऐकिवात आलंय् –
पण एकंदरीतच आपल्याकडे ‘पर्यावरण’ हा शब्द पुस्तकात न् बातम्यांतच उरलाय्.
वास्तविक, जनसंख्या आणि जैव वैविध्य हे आपल्याकडे इतरांपेक्षा जास्तच!
खरं तर शालेय शिक्षणात पी.टी. (शारीरिक शिक्षण) या इतकाच पर्यावरण हा विषय अंतर्भूत करायला हवाय्.
विसंगती म्हणजे परवाची बातमी की, मुंबई जवळच्याच गावात बिबळय़ा दिसला. चारपाच कोंबडय़ांची पार्टी करून स्वारी निघून गेली आणि आता त्याला धरायला की मारायला वनखात्याचे लोक फिरतायत! अरे, मग इथं इतके बिबळय़ा आहेत तर त्यांनाच का अभयारण्यात ठेवता? नामिबियातल्या बिबळय़ांना कंटाळा आला होता की काय? की त्यांनाही हिंदुस्थान पर्यटन करावंसं वाटलं? गेलाबाजार प्लेनमधून तरी उडता येईल असं वाटलं?
तर मग समजा हिंदुस्थानातल्या तमाम पिंजऱयातल्या व बाहेरच्या प्राण्यांनी सभा घेऊन अर्ज दाखल केला की, ‘‘आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं चालणार नाही.’’
‘‘आम्हाला आचार स्वातंत्र्य हवंय्.’’
‘‘आम्ही पण नामिबिया, सेमिबिया, अमेरिका, ऑस्ट्रियाला जाणार, ते पण प्लेनमधून.’
‘‘त्यांना प्लेन न् आम्हाला वाघिणी?’’
असा मोर्चा काढला तर?
तसं पाह्यलं तर एकाच पिंजऱ्यात राहून राहून तेही किती कंटाळत असतील बिचारे.
वेडावणारे, हसणारे, पाहणारे चेहरे… त्यांना भावना आहेत – विकार आहेत – छोटा अप्रगत हा होईना मेंदू आहे…
त्यांना या साऱ्यांचा त्रास होत असेल… त्यांना समजत असेल की, ही मुलं आपली चेष्टा करतात, डिवचतात आणि आपण काचेत, पिंजऱ्यात बंद आहोत म्हणून काही करू शकत नाही. काचेवर हात आपटत ओरडणारे गोरिला – वाघ – माकडं आपण निर्बृद्ध जनावरं या कॅटॅगरीत टाकून मोकळे होतो. पण ते निर्बुद्ध नसतात. त्यांच्या भावना अतिशय तीक्र असतात.
‘माणुसकी’ हा शब्द त्यांना ठाऊक नाही, तरी ते प्रसंगी माणसापेक्षा जास्त माणुसकी माणसांना व इतर प्राण्यांना दाखवतात.
अलबत् – प्रेम – माया – न् भूक – न् स्वसंरक्षण एवढंच नाही तर निरपेक्ष दयाबुद्धीही माणसांपेक्षा जास्त असते.
बुडणाऱ्या कावळय़ाला पंजानं ओढून बाहेर काढून निर्मन भावनेनं परत जाणारं अस्वलं – चिखलात रुतलेल्या माणसाला हात देणारा चिम्पांझी!
पिल्लाला पाण्यातून बाहेर काढणारा हत्तींचा कळप.
हे सारं पाहिलं की समाधानानं मन, डोळे, मेंदू तृप्तावतो – गहिवरतो – न् या वैविध्यानं नटलेल्या तरीही एकमेकांप्रती भूतदया असणाऱया अमोघ, असीम, उदार, समृद्ध, वैभवी, सृष्टीप्रति, निसर्गाप्रति, वसुंधरे प्रति नकळत हात जोडून मान नम्र होत जाते. सृष्टीची ही आगळीवेगळी रूपंच जणू…
‘‘भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
दावित सतत रूप आगळे’’!
या आगळय़ावेगळय़ा रूपाला जपावं एवढीच या समग्र मानवसमूहाला प्रार्थना!






























































