एका बेटाची जगावेगळी कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

सॅन सबॅस्टीयनच्या पूर्वेकडे, बिस्केच्या उपसागराच्या सुमारे दोन मैल दूर, बिदासोवा नदीत फीझंट हे बेट स्थित आहे. फक्त 150×200 मीटर एवढंसच. ही नदी आहे फ्रान्स आणि स्पेनच्या मध्ये. जगातला सर्वात छोटा फ्रान्स आणि स्पेन यांचं सहस्वामित्व असलेला हा भाग आहे. इतिहासातील एक महत्त्वाची घटना या बेटावर घडली, ती म्हणजे ‘ट्रिटी ऑफ पायरेनीज’वर केलेल्या सह्या. कारण या सह्या हे एकूण 24 परिषदांचं फलित होतं, ज्यात स्पेनचे सरदार लुईस द हॅरो आणि फ्रान्सचे मुख्यमंत्री कार्डिनल माझरीन यांचा सहभाग होता. ही गोष्ट 1659 ची जेव्हा 31 वर्षांच्या युद्धाचा शेवट झाला. याच्या स्मरणानिमित्त या बेटावर एक अखंड दगडी स्तंभ उभारला गेला. अर्थात इथे कुणी राहत नसलं तरी (तशी परवानगीच नाही कुणाला.) राजांच्या भेटींसाटी हे बेट अनेकदा वापरलं गेलं आहे.

1659 मध्ये लुईस (14 वा) त्याच्या भावी बायकोला – मरिया थेरेसा (स्पेन) – या बेटावर भेटला. तिने तिच्या वडिलांना – स्पेनचे फिलीप (चौथे) यांना शेवटचा सलाम केला आणि ती कायमची फ्रान्सला गेली. 1721 मध्ये लुईस 15 वा, स्पेनच्या मरियाना व्हिक्टोरीया हिला पत्नी बनविण्याच्या हेतूने इथे भेटला. त्यांचं लग्न झालं नाही. नंतर लुईस 15वा ने मारी लेस्झीएन्का हिच्याशी लग्न केलं. त्याच्या करारानुसार या बेटाची व्यवस्था फ्रान्स आणि स्पेन मिळून पाहतात, पण प्रत्येकी सहा-सहा महिने! सॅन सबॅस्टीयन (स्पेन) चे कमांडर ही व्यवस्था 1 फेब्रुवारी ते 31 जुलै आणि बेयॉन्स (फ्रान्स) चे कमांडर 1 ऑगस्ट ते 31 जानेवारी! प्रत्यक्षात प्रशासन मात्र इरन (स्पेन) आणि हेंदाय (फ्रान्स) यांचे मेयर बघतात.

कधी कधी ओहोटीच्या वेळी स्पेनच्या बाजूने या बेटावर जाता येतं, पण सर्वसाधारणपणे तिथे जायची परवानगी नाही. तसं तिथे कुणी राहतही नाही. फक्त खुला वारसा – दिवस असेल तरच तिथे जाता येतं. इरन आणि हेंदाय यांच्या नगरपालिकेच्या नोकरदारांना सहा महिन्यांतून एकदा स्वच्छतेसाठी आणि बागकामासाठी तिथे जायची परवानगी असते, मात्र सबॅस्टीयन (स्पेन) आणि बेयॉन (फ्रान्स) येथील नौदलाचे लोक, जे तिथली देखरेख करतात, त्यांना तिथे दर पाच दिवसांनी जाता येतं.

फीझंट बेटाची कहाणी खरोखरच अजब आहे. तरी अशाच अनेक गोष्टी आहेत ज्या अनेक देशांच्या सीमांबद्दलच्या आहेत. ओरेगॉन देशाची सत्ता 1818 व 1846 या काळात ब्रिटन आणि अमेरिका या दोन देशांत विभागलेली होती. अजूनही युरोपातील आल्प्समधील कॉन्स्टान्स तळं तीन देशांच्या हक्काचं आहे. दीव, दमण आणि गोवा हे हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावरही पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. 1961 साली ते सगळे भाग हिंदुस्थानात विलीन करण्यात आले. बांगलादेशच्या हक्काचे जमिनीचे काही तुकडे हिंदुस्थानात तर हिंदुस्थानच्या हक्काचे काही जमिनीचे तुकडे बांगलादेशमध्ये अजूनही आहेत. लेच दरीकडून जंगोलाझ दरीकडे जायला दोन मार्ग आहेत. एक : वर चढत सॉर्गश्रोफेन शिखरावरून (5364 फूट) पलीकडे जायचं किंवा दोन : त्याभोवती वळसा घालत जर्मनीतून जायचं.

जीनीवा विमानतळाला उतरणाऱ्या प्रवाशांना तर माहिती आहे की, त्यांना जर्मनीला जायचं आहे की स्वीत्झर्लंडला यावर त्याने त्याचं बाहेर पडण्याचं गेट ठरवायचं असतं. तिथून उत्तरेकडे 5 किमीवर असलेलं हॉटेल आरबेझ तर दोन्ही देशांच्या सीमेवर दोन पाय ठेवून उभं आहे. सीमारेषा त्याच्या स्वयंपाकघरातून, जेवणघरातून वगैरे जाते. कदाचित झोपताना तुमचे पाय एका देशात तर डोकं दुसऱ्या देशात असं होऊ शकतं.

फीझंट बेटाच्या जगावेगळ्या कहाणीत वेगळं हे आहे की, दोन देश एकाच वेळी त्यावर हक्क सांगत नाहीत. त्याची व्यवस्थित वाटणी झालेली आहे. दर फेब्रुवारीत व ऑगस्टमध्ये फ्रान्सचे व स्पेनचे प्रतिनिधी एकमेकांना फीझंट बेटावर भेटून कागदांची देवाण-घेवाण करतात. हे असं आतापर्यंत 700 हून अधिक वेळा घडलं आहे. आणखी किती वर्षे हे असंच चालणार कोण जाणे!

[email protected]