
>> नीती मेहेंदळे
सर्वांना घेऊन पुढे वाहणारी नदी. तिच्या काठाशी सलगी करत तिला बिलगलेल्या लेकी तिच्या आपलेपणाचा वास अभिमानाने मिरवतात. या नदीच्या मुली, मत्स्यगंधाच जणू.
नदी जन्म देते त्या तिच्या उपनद्या
आणि येऊन मिळतात त्या वेगळ्या
तरी चिकटलेल्याच तिला.
या सर्वांना घेऊन पुढे वाहणारी ती नदी.
तिच्या काठाशी सलगी करू पाहतात
काही मुली
रोज रोज तिचा काठ चाचपतात
कधी पाण्यात उतरतात
कधी चिखलात सुद्धा
खडकातली अन्नमुळं हुडकायला.
नदीचा आपलेपणाचा वास लागतो त्यांना
वशट ओला दमट
तो अभिमानाने मिरवतात त्या,
तिच्या लेकी म्हणवतात.
नदीच्या मानलेल्या मुलीच!
त्या इतक्या एकजीव आहेत की
त्या नदीचं वाहणं जोखतायत की
नदी बिलगतेय त्यांच्या भावनांना
तेच कळत नाही.
नदीची पात्रं कुणी मोजावीत?
नदीचे काठ -खाजणं- परंपरा कुणी जाणावीत?
नदीवरची धरणं आणि त्याखाली दबलेली
कित्येक मरणं
सगळं या मुलींना उपजतं उमजतं.
नदीच्या या लेकी, मत्स्यगंधाच खऱ्या
त्यांचं सान्निध्य तर हवं, पण
पण त्यांच्या खारट गंधाचं वावडं असतं लोकांना
उजेडाचं अंग तर हवं, पण
त्याची किरणं नकोत पडायला…
तसंच काहीसं.
नदीच्या तोलाचं मोल कमी झालेलं
आवडत नाही त्यांना
उसळतात त्या मुली
हाराने रचलेला माशांचा महोत्सव
नजरअंदाज करून
ताजेपणा जोखायला आलेली माणसं
आणि त्यांच्या त्या चिकित्सांचे ऊत
उग्र करतात त्यांना.
पण त्यांच्या मुलींना नाही आता मत्स्यगंध
त्या आहेत सुवासिक स्वच्छ
मात्र, नदीच्या सूक्ताची भाषा
त्यांच्या अंगी भिनलीय
तिच्यातल्या कुळवंतीची लिपी
त्यांनी कधीच गिरवलीय.
मूळ कविता : नदीच्या मुली
काव्यसंग्रह : नदीच्या मुली (आगामी)
दिवसभर नदीचं काळीज खालीवर करून
चाचपून पाहतात या मुली
दिवसभर नदी चाचपून पाहते
त्यांचे अंग इतक्या समजून घेतात त्या एकमेकांना…
दोघींच्या डोळ्यांत
खळखळणारी नदी विकता येत नाही
ही गोष्ट समजून घेतली आहे दोघींनी…
दोघींनी एकमेकीत
मिसळलेली किंमत
एकाच पारड्यात व्हावी हे मंजूर नाही या मुलींना…
कागदाचा एक तुकडा फेकून
विकत घेण्याचा प्रयत्न
अजून किती जण करणार आहेत
याची वाट पाहत वाहत आहेत या मुली
कधी धरण भरून
कधी धरणाखालचं मरण बनून…
माशांचा ढीग किती मोठा आहे हे महत्त्वाचं नसतं
किती वेळापूर्वी जीव गेला
जीव जाताना किती यातना झाल्या हे पडताळणे
महत्त्वाचे वाटते गिऱ्हाईकांना
दिवसभर सहवास हवाय
पण अंगाचा वास नकोय
रात्रभर चिमणी तेवत ठेवायची आहे
पण प्रकाश नकोय
ही कुठल्या माणसांची भाषा…
माशावाल्यांच्या मुली
खूप स्वच्छ आहेत
खूप सुगंधी आहेत
खूप स्वच्छंदी आहेत…
नदीच्या खवल्यांची भाषा
चिकटली आहे या मुलींच्या नखांना…
कवी : भरत दौंडकर, पुणे
कवीचा संक्षिप्त परिचय
भरत दौंडकर हे आजचे नामवंत कवी. राहणारे पुणे जिल्ह्यात. निमगाव -म्हाळुंगी, तालुका शिरूरचे.
त्यांचे प्रकाशित साहित्य असे आहे –
1) गोफणीतून निसटलेला दगड (कवितासंग्रह)
2) नदीच्या मुली (कवितासंग्रह) आगामी
3) विविध वाङ्मयीन नियतकालिके व दिवाळी अंकांतून कथा, कविता, ललित, समीक्षा लेखन
4) किशोर मासिकातून बालसाहित्य लेखन
त्यांच्या ‘गोफणीतून निसटलेला दगड’ या एकाच संग्रहास 11 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव शिमला येथे काव्यवाचन-आयोजक भारत सरकार व साहित्य अकादमीत त्यांचा कवी म्हणून सहभाग होता.
भारतीय साहित्य अकादमीच्या वतीने मिझोराम येथे प्रत्येक राज्यातील एक याप्रमाणे महाराष्ट्रातून राष्ट्रीय बहुभाषिक कविसंमेलनात सहभाग होता. तसेच अखिल भारतीय बाल कुमार साहित्य संमेलनातही त्यांनी वेळोवेळी सक्रिय सहभाग घेतलेला आहे.





























































