
>> नीती मेंहेंदळे
आ पल्या हिंदुस्थानात शिवमंदिरं उभारायची परंपरा फार फार प्राचीन आहे. आसेतुहिमाचल अगदी, पण क्षेत्रफळाने तिसऱया क्रमांकावरच्या महाराष्ट्रातच मी इतकी रमले की, पाहता पाहता पन्नासेक मंदिर समूह वेचून झाले. अजूनही पुष्कळ आहेत. ते पण दस्तऐवजीकरण करीनच. मुद्दामहून प्रसिद्ध शिवदेवतेची मंदिरं आणि मुख्य ज्योतिर्लिंगे यात घेतली नव्हती. फक्त मराठी मुलखातली अल्पपरिचित शिवमंदिरं प्रकाशात आणण्याचा माझा हा प्रयत्न होता. शिवमंदिरं उभारली ते राजे, त्यांच्या राजवटी, थोडक्यात इतिहास, मंदिर परिचय करता करता तीन वर्षे उलटून गेली. ही एक सवयच होऊन गेली होती. हा समारोपाचा लेख सादर करताना शिवभाव प्रकर्षाने उमलून आला आहे. तर आजचं समारोपाचं शिवपुष्प कराड अर्थात कऱहाटक नगरीला अर्पण करते आहे.
काही गावं नावापासूनच उत्सुकता दडपून असतात. सातारा शहरापासून उंब्रज ओलांडत पलीकडे कराड हे महत्त्वाचं शहर लागतं. हे असंच एक प्राचीन शहर. प्राचीन व्यापारी बाजारपेठ कऱहाटक नावाने प्रसिद्ध असलेलं हे शहर शिवमंदिरांची फौजच बाळगून आहे जणू! प्राचीन मंदिरं आहेत तशीच नवीनही आहेत.
मंगळवार पेठेतलं कमळेश्वर हे त्यातलं सुस्थितीत असलेलं तेराव्या शतकातलं मंदिर. शिलाहारांची शिवभक्ती सर्वज्ञात आहे. त्यामुळे शिलाहारांची एकेकाळी राजधानी असलेल्या या शहरात शिवमंदिर असणं क्रमप्राप्तच होतं. दोन भव्य दीपमाळा व स्वतंत्र नंदी मंडप असलेल्या या मंदिराच्या बाहेरून सध्या रंगवून काढलेल्या आधुनिक छतावर जायचं नाही. मंदिराचं अरुंद प्रवेशद्वार, वर गणपती असलेलं ललाटबिंब व पायाशी कीर्तिमुख पाहत आत शिरलं की, दगडी भक्कम बांधकामाची कल्पना येते. सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी रचना असलेल्या या मंदिराचं गाभाऱयातलं अष्टकोनी भव्य छत दगडाचे थर रचून केलेलं आहे. गाभाऱयात महिषासुरमर्दिनी व गणेशमूर्ती आढळतात. कमळेश्वराची पिंड अतिभव्य आहे. त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्री हे मोठे उत्सव इथे संपन्न होतात.
याखेरीज कोयनेश्वर, रत्नेश्वर, नागेश्वर, हटकेश्वर, सोमेश्वर ही नंतरच्या कालखंडात बांधली गेली आहेत. कराड हे संगमाकाठचं शहर ही त्याची अजून एक ओळख. कृष्णा व कोयना या प्रमुख नद्यांच्या संगमाकाठचा हा सुपीक प्रदेश प्राचीन व्यापारपेठ होता यात नवल नाही. नकटय़ा रावळ्याची विहीर म्हणून प्रसिद्ध अशी भव्य बारव म्हणजे कराडमधलं अजून एक वैशिष्टय़. संगमाजवळच्या दोन गावांमध्येही अशीच पुरातन मंदिरं आहेत. यापैकी वारुंजीमधलं आनंदेश्वर आणि सैदापुरातलं पावकेश्वर ही प्रसिद्ध आहेत. सैदापूर नाव कसं पडलं याच्या अनेक आख्यायिका आहेत, पण मूळचं ते शिवापूर आणि शिववारसा जपणारं पावकेश्वर हा त्याचा पुरावा म्हणता येईल. वीस फूट उंच एक मोठी दीपमाळ आणि मंदिराच्या परिसरात भक्तनिवासाची प्राचीन खूण सांगणारे बांधकाम ही या मंदिराची मुख्य वैशिष्टय़ं. मंदिराला दोन दरवाजे आहेत. यातील उत्तर दरवाजा, कोयनेच्या दिशेला आहे. या पूर्वाभिमुख देवळाच्या पूर्व दरवाजाला दोन चांगल्या स्थितीतल्या देवडय़ा आहेत. इथली नंदीची मूर्ती सातशे वर्षांपूर्वीची आहे. देवळाच्या भव्य सभामंडपाला सहा खांब असून दहा अर्धखांब आहेत.
खांबांवर घटपल्लव, गजमुख, शरभशिल्प, काही प्राणी कोरलेले आढळतात. छताच्या बाहेरील बाजूस सर्व दिशांकडे तोंड करून असलेल्या रक्षकांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. गाभाऱयाचं भव्य छत अर्थात वितान दगडी असून ते दगड केवळ एकमेकांवर रचून सांधलेले आहे. गाभाऱयाच्या दोन्ही बाजूंना कोनाडय़ांत गणपतीच्या मूर्ती आहेत. मंदिर परिसरात खांबांचे तुटके भाग इतस्ततः विखुरलेले दिसतात.
सतराव्या शतकात छत्रपती शाहू महाराजांनी मंदिरास इनाम दिल्याची नोंद आढळते. कऱहाडचा परिसर मंदिरसमृद्ध असून सुपीक जमिनीमुळे साखर कारखाने वगैरे आर्थिक सुबत्ता असलेला आहे. कराडहून चिपळूणमार्गे कोकणात जायला कुंभार्ली घाटवाट असून या मार्गावर कराडशेजारीच सदाशिवगड व आगाशिव लेणी पण आहेत. अशा प्राचीन वारसा सांगणाऱया या शहराचे ऐतिहासिक जतनही करायला हवे आहे. आज गावकरी जागरुक होत आहेत. सरकारची मदत मिळेल या आशेवर न राहता स्वतः पुढाकाराने जतन करत आहेत. या प्रयत्नात योग्य प्रकारे संवर्धन करण्यासाठी सरकारतर्फे पुरातत्त्वीय दृष्टीने मदत मात्र मिळणं अत्यंत गरजेचं आहे.
























































