गोंदण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रणव पाटील

जगभरात इसवी सन पूर्व दोन हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधल्या आणि न्यूबीयन ममींच्या शरीरावर गोंदवलेल्या खुणा सापडल्या आहेत. रोमन राज्यात गुलाम आणि गुन्हेगारांच्या शरीरावर विशिष्ट खुणा दर्शवणारे गोंदण केले जात. जगभरात आणखीन काही भागातील गोंदण्याविषयीचे वेगळे प्राचीन पुरावे आणि पद्धती पाहायला मिळतात. या सर्वांमागे काही अर्थ नक्कीच असतो.

आज जगभरात शरीरावर विशेषतः हातावर गोंदवून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये या गोंदवून घेण्याला वेगळे अर्थ आहेत. सैनिक, गायक, गुन्हेगार, स्त्रीया, विद्रोही या वेगवेगळ्या लोकांच्या अंगावर गोंदवून घेण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यात प्रत्येकाचे ठरलेले आकार, रंगरूप, गोंदवून घेण्याच्या जागा ठरलेल्या आहेत.

प्राचीन काळी शरीरावर गोंदवून घेण्याचे वेगवेगळे उद्देश होते. आजारपणापासून आणि मृतात्म्यांपासून रक्षण व्हावे हे दोन प्रमुख उद्देश होते. त्या काळी शरीरावर गोंदलेल्या खुणांवरून त्या व्यक्तीचे पद, श्रेणी, विशिष्ट समूहाची ओळख यांची माहिती मिळत असे. याशिवाय शरीराची सजावट आणि आकर्षपणा वाढवणे हे दोन हेतूही यामागे नेहमीच होते.

जगभरात इसवी सन पूर्व दोन हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधल्या आणि न्यूबीयन ममींच्या शरीरावर गोंदलेल्या खुणा सापडल्या आहेत. रोमन राज्यात गुलाम आणि गुन्हेगारांच्या शरीरावर विशिष्ट खुणा दर्शवणारे गोंदण केले जात. जगभरात आणखीन काही भागातील गोंदण्याविषयीचे वेगळे प्राचीन पुरावे आणि पद्धती पाहायला मिळतात. या सर्वांमागे काही अर्थ नक्कीच असतो.

महाराष्ट्राचा विचार करता आपल्याकडे गोंदणे ही एक सर्वसामान्य गोष्ट समजली जाईल. आजही ग्रामीण भागात यात्रा जत्रांमध्ये अनेक लोक अंगावर गोंदवताना दिसतात. विशेषतः स्त्रीयांच्या चेहऱ्यावरील गोंदणाला पूर्वी खूप महत्त्व आणि अर्थ होते. मी मावळातील दुर्गम आशा डोंगराळ भागात भटकंती केली त्या वेळी या गोंदण्याचे नवे अर्थ मला सापडले.

मावळातील डोंगराळ परिसरात राहणाऱ्या महादेव कोळी आणि गवळी-धनगर स्त्रीयांच्या हातांवर या गोंदण्याची एक विशिष्ट पद्धत पाहायला मिळते. यात सर्वात वेगळी गोंदलेली आकृती होती ती म्हणजे पाच मावळाया असलेली. मावळाया या साती आसरांसारख्याच जलदेवता आहेत. फक्त साती आसरा या संख्येने सात असतात तर मावळाया या पाच असतात. या पाच मावळाया या स्त्रीयांच्या हातावर गोंदलेल्या केलेले दिसतात. मावळ मुलखात जागोजागी पाणवठ्याच्या ठिकाणी या देवींची ठाणी आहेत. शेंदूर लावलेले पाच दगड त्यांचे अस्तित्व दाखवते. या जलदेवता जशा शुभंकर आहेत तशा भयंकरही आहेत. विशेष म्हणजे या जलदेवता स्त्रीयांशी संबंधित असल्यामुळे त्या सुफलनकारी आहेत. मावळातील पुरुषांच्या हातावर मात्र त्या गोंदवल्या जात नाहीत असे दिसते. ज्येष्ठ संशोधक दामोदर कोसंबींच्या मते मावळ हा शब्दच मुळी या मावळाया देवींच्या नावावरून आला आहे. यामुळे मावळायांच्या गोंदणाचे हे प्राचीन संदर्भ या स्त्रीयांना माहीत नसले तरी त्यांची या देवींवर अनन्य भावाने श्रद्धा असते. या श्रद्धेतूनच या देवींच्या गोंदण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. या पाच मावळाया गोंदताना कधी उभ्या दाखवतात तर कधी बसलेल्या रूपात दाखवल्या जातात. मावळातील स्त्रीयांच्या हातावर याशिवाय इतत्र गोंदवली जाणारी चिन्हेही असतातच, मात्र मावळायांचे गोंदण आपल्याला लोकसंस्कृतीची नाळ प्राचीन इतिहासाशी कशी जोडलेली आहे हे प्रामुख्याने दर्शवते.

[email protected]