
>> प्रसाद वि. प्रभू
मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी 25 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला आणि ते जगाच्या राजकीय पटलावरून जवळ जवळ विस्मरणात गेले. सोव्हिएत युनियनच्या विसर्जनानंतर शीतयुद्धाची समाप्ती झाली असे म्हटले गेले, पण अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी म्हणजेच ‘नाटो’ने सोव्हिएत युनियनमधून फुटलेल्या काही देशांमध्ये आपला विस्तार करण्यास सुरुवात केल्यानंतर रशियाने त्यांना प्रतिकार करण्यास प्रारंभ केला. बोरिस येलत्सिन यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध सध्या युद्ध सुरू केले आहे. त्याची पार्श्वभूमी ही अशी आहे आणि त्याला गोर्बाचेव्ह कारणीभूत आहेत असे म्हटले जात आहे.
खालावलेली अर्थव्यवस्था, शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे न पेलवलेले ‘पेरेस्त्राsईका’ (आर्थिक पुनर्रचना) ग्लासनोस्त (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) प्रयोग आणि इतर काही कारणांनी लेनिन-स्टॅलिन यांचा सोव्हिएत युनियन हा महाकाय देश आणि जगातील एक महासत्ता 1991 मध्ये विघटित झाली. नंतर जगातील एकमेव महासत्ता म्हणून अमेरिकेवर शिक्कामोर्तब झाले. सोव्हिएत युनियनच्या विसर्जनातून जवळ जवळ दीड डझन नवीन राष्ट्रे निर्माण झाली. त्यामुळे जगाचे राजकारण बदलून गेले. युरोपमधील सोव्हिएत युनियनचा पाठिंबा असलेल्या अनेक देशांतून साम्यवादाचे उच्चाटन झाले. बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यानंतर एक वर्षातच 25 डिसेंबर 1991 रोजी गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला आणि ते जगाच्या राजकीय पटलावरून जवळ जवळ विस्मरणात गेले. सोव्हिएत युनियनच्या विसर्जनानंतर शीतयुद्धाची समाप्ती झाली असे म्हटले गेले, पण अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी म्हणजेच ‘नाटो’ने सोव्हिएत युनियनमधून फुटलेल्या काही देशांमध्ये आपला विस्तार करण्यास सुरुवात केल्यानंतर रशियाने त्यांना प्रतिकार करण्यास प्रारंभ केला. बोरिस येलत्सिन यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध सध्या युद्ध सुरू केले आहे. त्याची पार्श्वभूमी ही थोडक्यात अशी आहे आणि त्याला गोर्बाचेव्ह कारणीभूत आहेत असे म्हटले जात आहे. एवढेच नव्हे तर गोर्बाचेव्ह यांनी केलेल्या चुका आता पुतीन दुरुस्त करीत आहेत असेही म्हटले जात आहे.
या पार्श्वभूमीवर 91 वर्षांचे मिखाईल गोर्बाचेव्ह सध्या काय करीत आहेत? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. राजधानी मास्कोच्या डाशा उपनगरातील एका सरकारी बंगल्यामध्ये वृद्ध गोर्बाचेव्ह एकटेच राहतात. 1999 मध्ये गोर्बाचेव्ह यांच्या पत्नी रैसा यांचा जर्मनीमध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. त्यामुळे गोर्बाचेव्ह यांना खूप दुःख झाले आणि त्यांना एकाकी वाटू लागले. कारण त्यांच्या सांसारिक जीवनात आणि राजकीय वाटचालीत रैसा यांनी त्यांना खंबीर साथ दिली होती. मॉस्को विद्यापीठात शिकत असताना ‘लव्ह स्टोरी’मधून या दोघांचा विवाह झाला होता. 1991च्या ऑगस्टमध्ये झालेल्या एका बंडामध्ये गोर्बाचेव्ह यांना सपत्नीक क्रिमियामधील एका रिसॉर्टवर स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यावेळच्या अतिताणामुळे रैसा यांना पक्षाघात झाला होता. आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ गोर्बाचेव्ह यांनी रैसा गोर्बाचेव्ह चॅरिटेबल फाऊंडेशनची स्थापना केली. ही संस्था कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी निधी उपलब्ध करून देते. सेंट पीटर्सबर्ग येथे या फाऊंडेशनने सर्व सोयींनी युक्त असे एक हॉस्पिटलही उभारले आहे.
सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी राजकारणात सक्रिय राहण्याचा थोडाफार प्रयत्न केला होता. 1996 साली गोर्बाचेव्ह यांनी रशियाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली, पण त्यांना एक टक्काही मते पडली नव्हती. खरं म्हणजे प्रारंभी गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे रशियन जनता खुश झाली होती, पण सोव्हिएत युनियनच्या विघटनामुळे रशियन जनतेला दुःखही झाले होते.
सोव्हिएत युनियनचे इतक्या सहजतेने विघटन झालेले पाहून त्यावेळी केजीबीमधून राजकारणात उतरलेले ब्लादिमीर पुतीन अत्यंत दुःखी आणि विस्मयचकित झाले होते. सोव्हिएत युनियनचे अनावश्यक विघटन रोखण्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी गांभीर्याने आणि निकराने प्रयत्न केले नाहीत, त्याचप्रमाणे आपल्या धोरणांची अंमलबजावणी करताना त्यांनी देशाच्या सुरक्षेचा आणि अखंडतेचा गांभीर्याने विचार केला नाही, अशी टीका त्यांच्यावर नंतर झाली. अजूनही सोव्हिएत युनियनच्या विघटनाचे शल्य दोन तृतीयांश रशियनांना सलत आहे, असे ‘नेव्हाडा सेंटर’ या स्वतंत्र संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले.
‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्त्राsईका’ या अत्यंत वाईट गोष्टी गोर्बाचेव्ह यांच्या हातून घडल्या अशी टीका पुतीन यांनी केली होती. त्यावेळी रशियात ‘बनावट लोकशाही’ नांदते आहे, असे प्रत्युत्तर गोर्बाचेव्ह यांनी दिले होते. विशेष म्हणजे आपल्या विरोधकांचा काटा काढण्यात प्रवीण असलेल्या अध्यक्ष पुतीन यांनी कधीही गोर्बाचेव्ह यांना अटक अथवा शिक्षा केली नाही. उलट त्यांनी गोर्बाचेव्ह यांच्या बाबतीत सौम्य धोरण अवलंबले, पण त्यांच्यावर नजर मात्र ठेवली. बहुदा जागतिक इतिहासात आपले मोठे स्थान निर्माण केलेला हा सौम्य स्वभावाचा नेता त्यांना फारसा उपद्रवी वाटला नसावा किंवा एखाद्या प्रसंगामध्ये गोर्बाचेव्ह उपयोगी पडू शकतील अथवा रशियात त्यांचा प्रभाव फारसा राहिलेला नाही असे त्यांना वाटले असावे, पण कालांतराने ब्लादिमीर पुतिन यांची अध्यक्षपदावरील पकड मजबूत झाली आणि याची जाणीव गोर्बाचेव्ह यांनाही झाली. त्यामुळे हे दोघेही नंतर एकमेकांचे प्रशंसक बनले. पुतीन यांच्या सौम्य धोरणामुळे गोर्बाचेव्ह विदेश यात्रा करू शकले. तिथे त्यांचे सत्कार सोहळेही झाले. मी सोव्हिएत युनियनचे विघटन थांबविण्याचा प्रयत्न केला असता तर प्रचंड रक्तपात झाला असता असे सांगताना मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी शीतयुद्ध आणि शस्त्रास्त्र स्पर्धा थांबविण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले हे वारंवार विशद केले, पण कालांतराने त्यांना आपल्या धोरणांबाबत काहीसा भ्रमनिरास झाला असावा असे त्यांच्या प्रतिक्रियांवरून वाटते.
युक्रेनमुळे रशिया आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये मोठे युद्ध होऊ शकते असे भाकीत गोर्बाचेव्ह यांनी 2015 मध्ये आपल्या ‘आफ्टर क्रेमलिन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी केले होते. त्यावेळी त्यांनी अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांच्या रशियाविरोधी कारवायांवर जोरदार टीका करून पुतीन यांच्या कृतीचे समर्थन केले होते. या परिस्थितीस अमेरिकेची वर्चस्वाची तृष्णा कारणीभूत आहे असेही त्यांनी म्हटले होते. 2014 मध्ये पुतीन यांच्या रशियाने युक्रेनचा क्रिमिया प्रांत ताब्यात घेतला. त्यावेळी गोर्बाचेव्ह यांनी त्यांच्या या कृतीस पाठिंबा देताना ही एक कायदेशीर कारवाई असून एका ऐतिहासिक चुकीची दुरुस्ती आहे असे म्हटले होते, पण वॉशिंग्टन आणि मॉस्को यांनी संयम न ठेवल्यास महायुद्ध सुरू होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यांची ही भीती खरी होते की काय, असे सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धावरून वाटते.
मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना ब्लादिमीर पुतीन यांनी ‘असामान्य मुत्सद्दी’ अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली होती. कोरोना महामारीच्या काळात दक्षता म्हणून गोर्बाचेव्ह यांना अनेक महिने एका हॉस्पिटलमध्ये एकांतवासात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. वृद्धत्वामुळे गोर्बाचेव्ह घराबाहेर क्वचितच पडतात आणि क्वचितच मुलाखत देतात. क्रेमलिन सोडून गोर्बाचेव्ह यांना आता तीस वर्षे झाली आहेत, तर पुतीन सत्तेवर येऊन बावीस वर्षे झाली आहेत. तरीसुद्धा कमकुवत अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची दडपशाही, विरोधकांची हत्या, छळ, कारावास वगैरे रशियात सुरूच आहे आणि हुकूमशहा ब्लादिमीर पुतिन पुन्हा अखंड सोव्हिएत युनियन उभारण्याचे अवघड स्वप्न पाहत आहेत.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
































































