
>> प्रसाद ताम्हणकर
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एक महाप्रचंड दुर्घटना उत्तराखंडमधल्या ‘चामोली’मध्ये घडली… हिमालय पर्वताचा काही भाग कोसळून खाली दरीत पडला आणि त्यामुळे प्रचंड मोठा विनाश घडला. या दुर्घटनेत 200पेक्षा जास्ती लोक मरण पावले आणि हजारो कोटींचा जलविद्युत प्रकल्पदेखील उद्ध्वस्त झाला. ही आपत्ती जरी नैसर्गिक असली तरी त्या वेळेला ‘ग्लोबल वार्ंमग’ अर्थात ‘जलवायू परिवर्तन’ हे या दुर्घटनेमागे असल्याची जोरदार शंका विविध माध्यमांतून मांडली गेली होती. अशातच आता या दुर्घटनेवर 50पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संशोधकांचा समावेश असलेल्या एका चमूने त्यांचे संशोधन आणि त्याचा अहवाल समोर आणला आहे. चामोली दुर्घटनेची सुरुवात उत्तराखंडमध्ये असलेल्या चामोली जिह्यातील 6 किलोमीटर उंच अशा ‘रोंटी पीक’ या शिखरापासून झाली. 180 मीटर जाड आणि 500 मीटर रुंद अशी एक बर्फाची चादरच्या चादरच तुटून खाली दरीत पडायला सुरुवात झाली. संशोधकांच्या अभ्यासानुसार सलग एक मिनिटापर्यंत तब्बल 2.7 करोड क्युबिक मीटर इतका दरडीचा भाग मुक्तपणे खाली कोसळत होता. या कोसळलेल्या भागाचे वजन इजिप्तमधील गिझाच्या ‘ग्रेट पिरॅमीड’पेक्षादेखील दहापट जास्ती होते. जेव्हा हा सगळा भाग कोसळून खाली ‘रोंटी घाटी’मध्ये पडला तेव्हा हिरोशिमावर अणुबॉम्ब पडल्यानंतर जेवढी ऊर्जा निर्माण झाली होती त्यापेक्षा 15 पट अधिक ऊर्जा निर्माण झाली. यावरून दुर्घटनेची भयानकता समजू शकतो.
चामोली दुर्घटनेत कोसळलेल्या कडय़ात 80 टक्के दगड आणि 20 टक्के बर्फ होता. याच्या कोसळण्यामुळे निर्माण झालेल्या ऊर्जेमुळे हा संपूर्ण बर्फ वितळून गेला होता. हा कोसळलेला भाग इतका शक्तिशाली आणि वेगवान होता की त्याने खाली कोसळताना वाटेतील अनेक मोठाल्या शिळांचा चक्काचूर करून टाकला. या दुर्घटनेमुळे जो प्रचंड स्फोट घडला त्याचा परिणाम म्हणजे आजूबाजूचे तब्बल वीस हेक्टर जंगलदेखील संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्यानंतर पुढे 15 किलोमीटर जात ताशी 90 किलोमीटर वेगाने या दरडीने श्रीगंगा हायड्रो प्रोजेक्टला आणि त्यानंतर त्यापुढे 10 किलोमीटरवरती असलेल्या तपोवन हायड्रो प्रोजेक्टला धडक दिली.
संशोधकांनी आपल्या अहवालात ‘ग्लोबल वार्मिंग’ हे चामोली दुर्घटनेमागील एक कारण असल्याचे संपूर्णपणे नाकारले आहे. आपल्या संशोधनात असा कुठलाही पुरावा मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात एकूणच ‘ग्लोबल वार्ंमग’च्या प्रभावामुळे हिमालयात कडे कोसळण्याचे प्रमाण वाढलेले आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे. कडय़ाचा जो भाग कोसळला तो गेली चार वर्षे सरकत होता. उपग्रहांद्वारे मिळवलेले फोटो या सरकत्या भागाचे चित्र अधिक स्पष्ट करतात. दुर्दैवाने या सरकण्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही आणि पुढील दुर्घटना घडली. या अहवालासंबंधी मत देताना काही संशोधक आणि भूस्खलनाचे अभ्यासक अशा दुर्गम आणि उंच भागात निर्माण होत असलेल्या अत्यंत खर्चिक अशा पायाभूत सुविधांकडेदेखील लक्ष वेधत आहेत.
अशा सुविधा निर्माण करताना निसर्गाची जी हानी होते आणि त्यातून जे धोके निर्माण होतात त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे ते ठामपणे सांगतात. रोजगार निर्मिती करणे, इंधनाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्व गरजेचे असले तरी निसर्गाची काळजी घेणेदेखील किती गरजेचे आहे, हाच धडा या दुर्घटनेतून घ्यायला हवाय.































































