
>> प्रसाद ताम्हनकर
क्रिप्टो चलनाची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱया 47 वर्षीय चिएन चिमिन या चिनी महिलेला नुकतीच ब्रिटनच्या पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर फसवणूक, पैशांची अफरातफर, मनी लाण्डरिंग असे गुन्हे सिद्ध झाल्याने तिला 11 वर्षे आणि 8 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हजारो चिनी पेन्शनधारकांना खोटी आश्वासने देऊन तिने तिच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर त्या संपूर्ण रकमेचा अपहार केला असा तिच्यावर आरोप आहे. एका छोटय़ा देशाची राणी बनण्याचे स्वप्न पाहणारी ही महिला सध्या तुरुंगाची हवा खात आहे.
चिएन चिमिन ही मूळची चीनची रहिवासी. आपली कंपनी ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आरोग्य उत्पादनांची निर्मिती करते आणि क्रिप्टो मायनिंगदेखील करते असा दावा करून तिने भरपूर मोबदल्याच्या आमिषाने लाखो गुंतवणूकदारांना तिच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले. मात्र प्रत्यक्षात तिने या संपूर्ण रकमेचा अपहार केला. चिएनने स्थापन केलेल्या लँटियन गेरुई नावाच्या कंपनीने विशेष करून चीनमधल्या एकाकी वृद्धांना आपले लक्ष्य केले होते. अशा वृद्धांची, समाजाची, देशाची आपल्याला किती काळजी आहे हे भासवण्यासाठी चिएनने सामाजिक जबाबदारीवर आधारित काही कवितादेखील लिहिल्या.
आमची देशभक्ती ही आमचा कमकुवतपणा ठरली असे दुःख अनेक गुंतवणूकदारांनी व्यक्त केले. चिएन स्वतःला देशभक्त भासवायची, चीनला जगातले पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र बनवायचे आपले स्वप्न असल्याचे ती सांगायची. तिच्या कंपनीतर्फे विद्यमान गुंतवणूकदार आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यासाठी अनेकदा सहली आयोजित केल्या जायच्या, मोठय़ा मेजवान्यादेखील दिल्या जायच्या. हजारो गुंतवणूकदारांना पहिले काही दिवस रोज 100 युआन (1243 रुपये) परतावा म्हणून दिला जात होता. अनेक लोक त्यामुळे अधिक आकर्षित झाले आणि प्रसंगी त्यांनी कर्ज काढून चिएनच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली.
चीनमधील प्रत्येक प्रांतांतील साधारण 1,20,000 लोकांपर्यंत हा घोटाळा पोहोचल्याचे तपासातून उघड झाले आहे. गुंतवणुकीची हे रक्कम अंदाजे 40 अब्ज युआन (4.97 ट्रिलियन रुपये) पेक्षा जास्ती असल्याचा अंदाज आहे. स्वतःला देशभक्त म्हणवणारी आणि राष्ट्रप्रेमाला प्राधान्य देते सांगणारी चिएन 2017 मध्ये चीनमध्ये चौकशी चालू झाल्यानंतर बनावट पासपोर्टद्वारे देश सोडून पळाली आणि ब्रिटनला पोहोचली. लंडनमध्ये हॅम्पस्टेड हीथ परिसरात तिने एक भव्य हवेली भाडय़ाने घेतली आणि ती तिथे राहू लागली. या हवेलीचे दरमहा भाडे दरमहा 17,000 पौंड (अंदाजे 1.997 दशलक्ष रुपये) इतके होते. पुरातन किमती वस्तू आणि हिऱयांची आपण मोठी वारसदार असल्याचे तिने भासवले होते. तिच्याकडे असलेल्या क्रिप्टो करन्सीचे रोखीत रूपांतर करण्यासाठी तसेच काही मालमत्ता खरेदी करण्यासाठी तिने एक सहाय्यकदेखील ठेवली होती. या सहाय्यकाला गेल्या वर्षी मनी लाण्डरिंगच्या आरोपात अटक झाली आणि सहा वर्षांची शिक्षादेखील सुनावण्यात आली.
अत्यंत ऐषोरामात जीवन जगणाऱया चिएनच्या डायरीत पोलिसांना थक्क करणारी माहिती हाताला लागली आहे. तिच्या डायरीत तिने सहा वर्षांची एक योजना आखलेली होती. त्यानुसार तिला एक आंतरराष्ट्रीय बँक स्थापन करायची होती. एक स्वीडिश किल्लादेखील विकत घ्यायला होता. एवढेच नाही तर सन 2022 पर्यंत सर्बियाच्या सीमेवर असलेल्या लिबरलँड या छोटय़ाश्या देशाची राणी बनण्याचेदेखील तिचे स्वप्न होते. मात्र अशी मोठी स्वप्ने बघणारी चिएन एका छोटय़ा चुकीने पकडली गेली. तिने लंडन परिसरात एक घर घेण्याचे ठरवले. एका श्रीमंत भागातले घर तिला पसंतदेखील पडले. मात्र या अत्यंत महागडय़ा अशा घराच्या करारामुळे पोलिसांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आणि तिच्या चौकशीला सुरुवात झाली.
पोलिसांनी चिएनच्या घरावर टाकलेल्या छाप्यात लाखो बिटकॉइन्स असलेल्या हार्ड डिस्क आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. ब्रिटनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी क्रिप्टो करन्सीची जप्ती असल्याची चर्चा आहे. या जप्तीतील काही रक्कम तरी आपल्याला परत मिळेल अशी आशा आता गुंतवणूकदारांना वाटू लागली आहे.




























































