शलाका – जिज्ञासक महादाईसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रिया धारुरकर

स्त्रीच्या व्यक्तित्त्वाचा शोध घेताना तिची अनेक रूपं समोर येतात. पंचकन्या, पंचसतीपासून सुरू झालेला हा प्रवास अगदी आजच्या काळापर्यंत तिला घेऊन येतो कधी अभिशापाचं गोंदण म्हणून तर कधी आत्मभानाचं रूपक म्हणून. हाच शोध मांडणारं सदर…

जिला स्वतःची जाणीव होते ती स्वतःला शोधू लागते. तिला कुळामुळापार जाऊन अनेक प्रश्नही पडू लागतात. आपला भोवताल, आपलं पर्यावरण, आपला इतिहास, भूगोल ती समजून घेऊ लागते. तसतशी तिच्यात निर्माण झालेल्या जिज्ञासेमुळे तिच्यात आंतरिक रूपांतरणाचीही प्रक्रिया घडू लागते. तिच्यातला जाती, धर्म, लिंगभेद संपून जातो आणि ती निखळ माणूस बनते. स्वतःला अवगत करते. स्वचं तंत्र विकसित करते. स्वतःचे निर्णयदेखील घेऊ लागते. मग काळ कोणताही असू दे. तिच्या अंतरंगातले रंग ती शब्दाक्षरांना देऊ लागते.

असे स्वतःचे दृष्टिकोन, स्वतःचे आयाम देणारी, जिला महानुभाव चक्रधरस्वामी ‘म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक’ म्हणतात ती आद्य कवयित्री महदंबा ही अशीच आस्थायुक्त श्रद्धा असणारी, चक्रधरस्वामींची निष्ठावंत शिष्या. सतत प्रश्न विचारणारी, शंका निरसन करून घेणारी ही बालविधवा संन्यासिनी झाली. चक्रधरांनी सांगितलेले तत्त्वज्ञान अंगीकारत तपस्विनी झाली.

तसे पाहता तो काळही तसा पुरुषसत्ताकच, पण त्याही काळात तिने आपल्या कार्याने, आपल्या बुद्धिवादी कौशल्याने आणि आपल्या संवेदनशील वाङ्मयीन निर्मितीने स्वतःची नाममुद्रा उमटवली. चतुरस्र, संवेदनशील सौंदर्यदृष्टी असलेली अशी तिची थोरवी. तिला टाळून आपण एकूणच कवयित्रींचा इतिहास किंवा एकूणच वाङ्मयीन इतिहास मांडूच शकणार नाही.

रांगोळी काढणारी, सुगरण असणारी महादाईसा, रुपाईसा किंवा महदंबा अशी नावे असलेली ही विदुषी महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी. जालना जिह्याच्या परिसरातील विद्वान घराण्यात हिचा जन्म झालेला. वायेनायक हे पिता तर कामाईसा ही माता. तिच्या पणजीला म्हाळसा प्रसन्न होती असे मानले जाते.

इ.स.1238 मध्ये हिचा जन्म, तर इ.स.1308 मध्ये मृत्यू.

बालपणी पतीच्या निधनानंतर प्रथेनुसार ती माहेरी आली. तिला बालपणापासूनच भक्तिमार्गाची आणि परमार्थाची ओढ होतीच. त्याच ओढीने प्रथम ती आणि तिचे चुलतबंधू नागदेव चक्रधरस्वामींचे वडणेरचे रामदेव दादोस नावाचे जे शिष्य होते, त्यांचे शिष्य झाले. त्यांच्यामुळेच पुढे ते चक्रधरस्वामींशी जोडले गेले.

एकेश्वरीवादाचा पुरस्कार करणाऱया महानुभाव पंथाची स्थापना चक्रधरस्वामींनी त्याच काळात केली होती. त्यांनी सर्व पुरुषांना आणि स्त्र्ायांना आपल्या पंथात सहभागी करून घेतले होते. महानुभाव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता. संन्याशाचा कठोर आणि कडक आचारधर्म महादाईसेने स्वीकारला. महानुभावाचे खडतर भिक्षाव्रत स्वीकारले. ओंजळीत मावेल एवढेच अन्न भिक्षा म्हणून स्वीकारायचे, ते अन्न नदीच्या काठी जाऊन नदीकडे तोंड करून प्राशन करायचे, त्यानंतर पाणी प्यायचे. मनाचा निग्रह आणि वैराग्य वृत्ती उपजतच असल्यामुळे ती जीवनभोगांपासून दूर राहून या पंथाला नुसती अनुसरूनच राहिली नाही, तर या पंथाची यशस्वी प्रसारक आणि प्रचारकदेखील झाली.

चक्रधरस्वामींच्या तत्त्वज्ञानावर तिची गाढ श्रद्धा होती तरीही तिची भक्ती मात्र डोळस होती. चतूर, सडेतोड वृत्तीच्या महादाईसेने अगदी सहज आपले आयुष्य समर्पित केले होते. चक्रधरस्वामींच्या चिंतनवाटांवरचा तिचा प्रवास म्हणजे प्रकाशाच्या तिरिपेने तेजाकडे केलेली वाटचाल म्हणावी लागेल. तेजाने युक्त असा महान तपस्वी गुरू लाभणं, त्यांचा सहवास मिळणं हा खरं तर दुर्मिळ योग. अशा गुरूंकडून ज्ञान ग्रहण करताना केवढा दिव्य अनुभव घेतला असेल महदंबेने. तिच्याबद्दल ‘लीळाचरित्रा’त माहिती मिळते. चक्रधरस्वामी गेल्यानंतर त्यांच्या लीलांचे वर्णन करण्यासाठी ‘लीळाचरित्रा’ची निर्मिती झाली. या लीलांमध्ये त्यांना चौकसपणे प्रश्न विचारणाऱया महादाईसाचे वर्णन आहे. ‘एथ निरंतर काहीतरी पुसतची असे’ असे स्वामींनी तिच्याबद्दल म्हटले आहे. त्या दोघांच्या संवादातून, प्रश्नोत्तरांतून महानुभाव पंथ उलगडत जातो. चक्रधरस्वामींनी जाण्याआधी तिला ‘असन्निधान धर्म’ सांगितला होता. चक्रधरस्वामींनी त्यांच्यानंतर पंथाची धुरा नागदेव आणि महदंबा यांच्याकडे सोपवली होती. नागदेवाचार्य म्हणतात, ‘‘म्हातारी माझी प्रीतिदक्षः धर्मरक्षक की गाः’’ इथे प्रत्येक ठिकाणी ‘म्हातारी’ हे संबोधन वयाच्या संदर्भात नसून एक स्वयंपूर्ण तारा, महातारा, तेजस्वी या अर्थाने आले आहे.

कृष्ण म्हटलं की, आपल्यासमोर राधा येते, मीराही येते आणि द्रौपदीही येते. असंख्य लेखक, कवींनीदेखील याच अनुषंगाने लिहिले आहे. या तिघींनाच त्यांच्या साहित्यकृतीतून उजागर केले, पण ‘असन्निधानी तळमळ, पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये, अखंड जळतची असे’ अशी विरहात जळणाऱया रुक्मिणीची अवस्था मात्र महादाईसाने प्रखरतेने आपल्या काव्यातून मांडली आहे. ‘श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर’ कथेत महादाईसा हरवते, रुक्मिणीच्या मनातला भक्तिभाव तिला विशेष वाटतो. कृष्णचिंतन हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झालेला दिसून येतो. म्हणूनच कृष्णाचं नितांतसुंदर वर्णन त्या काळच्या बोलीभाषेत अनुभवताना आपल्यालाही आनंद होतो.

कासे पितांबरुःकंठी कुंदमाळाः
कांतू शोभे सावळाः रुक्मिणीचा
गावा द्वारावती गोमतीए प्रांती
गोदरीये क्रीडती चक्रपाणी
चापे गौर कांती चापयाच्या दृतीः
चांपौली साजती चक्रपाणीः

हे असं निर्मळ पोत असणारं साहित्य खरंच किती रसाळ, मधाळ आहे.

तिचे धवळे महानुभाव संप्रदायात प्रसिद्ध आहेत. एकशे नऊ ओवी संख्या असणारे मातृकी रुक्मिणी स्वयंवर, आध्यात्मिक स्वरूपाचे गर्भकांड, ओव्या, आरती इत्यादी वाङ्मय निर्मिती तिने केली आहे.

धवळे म्हणजे विवाहप्रसंगी गायची वरगाणी. ‘श्रीगोविंदप्रभुचरित्रा’त ‘विव्हाहो स्वीकारू’ या लीळेत याची माहिती मिळते. गोविंदप्रभू यांनी एकदा एक बाशिंग घेऊन जाणारी तेलीण बघितली आणि त्यांना विवाहप्रवृत्ती झाली. मग त्यांनी महदंबेला विवाहविषयक गाणी म्हणण्यास सांगितली. तिचं शीघ्र कवित्वदेखील यातून अधोरेखित झाले आहे.

‘‘तरी मज वेष द्यावा’’ असे तिने म्हटल्यानंतर तिला पंथाचा वेषही दिला गेला. तिनेही उत्तम रीतीने, भक्तांची काळजी घेत मठाची धुरा कडक शिस्तीत सांभाळली.

अशी ही महादाईसा मराठीच्या गौरवी परंपरेतलं मानाचं पान. हिची अभिव्यक्ती वाचू या, अभ्यासू या, परिश्रमपूर्वक जोपासू या.

 [email protected]