ललित कलेचा कलारंग पंधरवडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. गजानन शेपाळ

महाराष्ट्राला राजधानी म्हणून लाभलेल्या मुंबई नगरीला, चित्रकार- शिल्पकारादी ललित कलांचा महास्रोत असलेली रंगनगरी असंही मानलं जातं. या मुंबईत ‘साठी’ पार करणाऱया ललित कला अकादमीने केवळ एकच प्रदर्शन पूर्वी भरविले होते. या वर्षी मात्र 25 मार्च ते 8 एप्रिल हा पक्ष ‘कलारंग’ पक्ष म्हणून मुंबापुरीत साजरा होतोय. तसं पाहिलं तर अभिजात कलाकाराला वयाची-अनुभवाची अट नसते अन् प्रतिभाशक्तीलाही वयाची- अनुभवाची अट नसते. सर्वच सज्ञान वयोगटातील कलाकारांना या प्रदर्शनाद्वारे कलाजगतातील अरंगेत्रम्चा आनंद तसेच रंगनृत्याविष्कारांच्या महेफिलीचा आस्वाद मिळणार आहे. कलारसिक, कलाभ्यासक आणि ज्ञात-अज्ञात सर्वच कलाकारांना या कलारंग पंधरवडय़ात ‘गुरू-शुक्र’ युती जवळून पाहण्याची पर्वणी आहे.

‘‘वेरूळ-अजिंठय़ाच्या महाराष्ट्रात ललित कला अकादमीचे केंद्र सुरू व्हावे यासाठी माझे प्रयत्न आहेत.’’ ललित कला अकादमी, नवी दिल्लीचे चेअरमन आणि ज्येष्ठ शिल्पकार तसेच प्रतिथयश चित्रकार उत्तम पाचरणे अत्यंत जिव्हाळय़ाने बोलत होते. मुळातच पारदर्शी आणि सर्व कलाप्रकारांबद्दल आत्मीयता असलेले शिल्पकार पाचरणे ललित कला अकादमी, नवी दिल्लीला राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे 17 मे 2018 रोजी चेअरमनपदी नियुक्त झाले व महाराष्ट्राच्या कलासंस्कृतीबरोबर ललित कलेच्या नात्याची वीण घट्ट झाली.

शिल्पकार उत्तम पाचरणे भरभरून बोलत होते. पेंटर, स्कल्पटर वा उपयोजित कलाकारांसह सर्व प्रकारच्या कलांनी युक्त अशी ललित कला कुठल्याही कलाप्रकारांमध्ये भेदभाव मानत नाही हे ठासून सांगतानाच ते म्हणाले की, ‘महाराष्ट्राचं कला व सांस्कृतिक वैभव हे देशात सर्वोच्च आहे. मुंबईत जे.जे. कला समूह महाविद्यालये, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांसारख्या शंभरी-दीडशेहून अधिक वर्षे पार केलेल्या संस्था-शैक्षणिक संस्था आहेत. बऱयाच संस्था शंभरी गाठायला आल्या आहेत. अशा मुंबईत होणारा कलाव्यवहार हा जागतिक पातळीवरचा आहे. मग महाराष्ट्रासाठी ललित कलाची एक शाखा वा एक केंद्र इतक्या वर्षांत का झाले नाही, या प्रश्नाचं उत्तर शोधत बसण्यापेक्षा हा प्रश्नच निकाली काढण्याचा माझ्या महाराष्ट्रासाठीचा हा माझा प्रयत्न आहे. कलाकार हा भावनाप्रधान असतो, जो अंतर्मुख होणारा कलाकार असतो. पाचरणे यांच्या नावातच ‘उत्तम’ आहे. ते अगदी स्वाभिमानाने सांगत होते की, ‘‘महाराष्ट्रात प्रोग्रेसिव्ह ग्रूप जेव्हा मुंबईच्या कलाजगतात कार्यरत झाला म्हणजे आरा, रझा, सुझा, सदानंद बाकरे, अंबादास यांच्यासारख्या प्रयोगशील कलाकारांच्या प्रोग्रेसिव्ह विचारसरणीला अनुसरून त्या व्याप्तीपूर्ण कलाप्रवाहाचं अनुकरण करणारा एक वर्ग तयार झाला त्या कलादिंडीची पताका खांद्यावर घेताना मलाही खूप भाग्यवान असल्याची अनुभूती येते.’’

ही कलापरंपरा महाराष्ट्राची असूनदेखील गेल्या 60 वर्षांत केवळ एकच वेळा ललित कला प्रदर्शन मुंबईत भरले गेले ही खंत व्यक्त करीत बसण्यापेक्षा आलेली वेळ ही ‘संधी’ मानून संधीचं सोनं करण्याचा यशस्वी उपक्रम म्हणजे दि. 25 मार्चपासूनचा कलारंग पंधरवडा होय.

राष्ट्रीय स्तरावरील दोन हजार 836 कलाकारांनी सहा हजार 116 कलाकृती या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी सहभाग मिळावा म्हणून पाठविल्या होत्या. त्या सर्व कलाकृतींचे तज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करून 286 कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यासाठी निवडल्या आहेत. या कलाकृतींमध्ये वास्तववादी म्हणजे मूर्त-अमूर्त, शैली प्रकारांसह क्रिएटिव्ह, तंत्रांतील वैविध्यता जपणारे, प्रयोगशील तंत्र विकसित करून निर्माण होणाऱया कलाकृती… अशा प्रदर्शनी मूल्ये जपणाऱया कलाकृती या प्रदर्शनातून पाहता येणार आहेत. शिवाय विविध प्रकारचे दगड, त्रिमित माध्यमे, धातू इत्यादी माध्यम प्रकारांतील शिल्पाकृती, मुद्राचित्रे इत्यादी कलाविषयक कामे या प्रदर्शनात पाहता येतील.

महाराष्ट्रात तत्कालीन नवतरुण कलाकार वर्गात ‘पोस्ट प्रोग्रेसिव्ह’ गटदेखील महत्त्वाची भूमिका बजावणारा असा मानला गेला होता. के. बी. कुळकर्णी, हळदणकर, म. वि. धुरंधरपासून तर संस्कारप्रिय संभाजी कदम, बाबुराव सडवेलकर, विदर्भातील काळे, जोशी, नगरचे केळकर, कोल्हापूरचे वडणगेकर, बाबा गझबर, बाबुराव पेंटर, मेस्त्राr, पुण्यातील एन. ई. पुरम, अगदी भैयासाहेब ओंकार, दीनानाथ दलाल, मूळगावकर, गोपाळराव देऊसकर, एस. एम. पंडित अशी अनंत नावे आहेत की, प्रत्येक नाव उच्चारताना एक स्वतंत्र कलाइतिहास पटलावर येतो. हे सारे सारे या महाराष्ट्राने जगाला दिले आहेत. या साऱया ज्ञात, उल्लेखित, अनुल्लेखित सर्वच कलाकारांप्रति आदरभाव व्यक्त करण्याचा उपक्रम म्हणजे ‘राष्ट्रीय कलाप्रदर्शन’ होय.

या प्रदर्शनाच्या आयोजनाचे औचित्य साधून ललित कला अकादमी, नवी दिल्ली, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई आणि एन.जी.एम.ए. या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत जे.जे.त 59 कलाकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून 59 कलाकृतींनी जे.जे.च्या हिरवळीवर जन्म घेतला आणि तिसरा उपक्रम म्हणजे जे.जे.च्या प्रशस्त परिसरात कलामेळय़ाचे आयोजन केले असून सुमारे 100 ते 125 स्टॉल्सद्वारे आर्टिस्ट, आर्ट इन्स्टिटय़ूटस् आणि आर्ट मटेरियल उत्पादक यांचे दर्शन होणार आहे. म्हणूनच हे प्रदर्शन सर्वांनी आवर्जून पाहावे असे म्हणता येईल.

– [email protected]