निसर्गभान – रायगड पुन्हा बुलंद होतोय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

मिशन बिगिन अगेननंतर राज्यातील सर्व कामांचा पुनश्च हरिओम झाला. त्यात किल्ले रायगडाच्या संवर्धनाच्या कामाचाही समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात थांबलेले काम पुन्हा सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने रायगडाच्या कामाचा घेतलेला हा आढावा.

छत्रपती शिवाजी महाराजांचा बुलंद रायगड किल्ला म्हणजे मराठी मुलखाचा जाज्वल्य इतिहास आहे. पण काळाच्या ओघात या बुलंद रायगड किल्ल्याचे बुरूज ढासळू लागले. त्यामुळे राज्य सरकारने या बुलंद रायगडाला शिवकालीन रूप देण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. 2018मध्ये या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू झाले. कामाने चांगलाच वेग पकडला होता. मात्र मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाला आणि दुरुस्तीची कामे बंद पडली. सप्टेंबरपासून पुन्हा काम सुरू झाले. शिवकाळात ज्या पद्धतीने रायगडाची उभारणी केली त्याच पारंपरिक पद्धतीने जतन व संवर्धन करण्याचे अतिशय आव्हानात्मक काम सुरू आहे.

तब्बल 2 हजार 900 फूट उंचीच्या रायगडावर दुरुस्तीसाठी सामान नेण्याचे अतिशय आव्हानात्मक काम आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून रोप वे बंद होता. त्यामुळे गडावर सामान नेण्यापासून मजुरांना गडावर नेण्यात अनेक अडचणी होत्या. पण या सर्व अडचणींवर मात करून काम सुरूच ठेवले आहे. मजुरांच्या मदतीने व गाढवांवर सामान लादून गडावर नेले. गडाच्या दुरुस्तीसाठी काळ्या दगडाचा वापर होत आहे. एका दगडाचे वजन तीस ते चाळीस किलो आहे. आतापर्यंत सुमारे एक ते दीड टन सामान मजूर व गाढवांवर लादून गडावर नेले आहे. त्यातून नाणे दरवाजाचा पायरी मार्ग, चित्त दरवाजाचा पायरी मार्ग, महादरवाजा ते शिरकाई मंदिरापर्यंतचा पायरी मार्ग घडवला गेला. पायरी मार्गाचे 80 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

शिवरायांच्या आज्ञापत्राचा आदर्श

गडावरील पाणीसाठा शक्य ते प्रयत्न करून जतन करावा या शिवरायांच्या आज्ञापत्राचा आदर्श ठेवून गडावरील तलाव, टाक्यांचेही संवर्धन व दुरुस्ती केली जात आहे. गडावर 84 तलाव व पाण्याची टाकी आहेत. त्यातील 23 टाक्यांमधील गाळ काढून टाकला आहे. चुना बेलफळाचे पाणी, विटांची भुकटी व बारीक रेतीच्या मिश्रणाने गळतीच्या जागा बंद केल्या. त्यामुळे तब्बल दीडशे वर्षांनी हत्ती तलाव तुडुंब भरला. शिवकाळात ज्या पद्धतीने गडउभारणीचे काम केले त्याच पद्धतीने किल्ल्याच्या डागडुजीचे काम सध्या सुरू असल्याचे रायगड विकास प्राधिकरणाचे वास्तू संवर्धक वरुण भामरे सांगतात.

एरियल मॅपिंगची मदत
गडाच्या संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. गडाच्या सर्वात वरच्या भागाचा परिसर तब्बल 1200 एकर आहे. त्यामुळे गडाचे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंगने एरिअल मॅपिंग केले आहे. त्याचेही 50 ते 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.

इस्रोकडे पूर्ण सॅटेलाईट डेटा उपलब्ध आहे. गड व 21 गावांचे संपूर्ण मॅपिंग केले आहे. गडावरील पाण्याचे प्रवाह गडाखालील पाणलोट क्षेत्र, गडावर किती वास्तू होत्या. याचा सर्व्हे पूर्ण केला आहे. गडावर साडेतीनशे वास्तू आहेत. त्यापैकी उत्खनन सहा वाडय़ांचे झाले आहे. उत्खननात शिवकालीन कौले, खिळे, अलंकार, शस्त्र्ाs, ठासणीच्या बंदुकीच्या गोळय़ा, तोफेचे गोळे सापडले आहेत.

नाणे दरवाजा मूळ स्वरूपात
खुद्द छत्रपती शिवाजी महाराज नाणे दरवाजाने येत असत, असा उल्लेख असलेल्या या नाणे दरवाजाची मूळ रूपात पुनर्बांधणी होणार आहे. या दरवाजाचे शिवकालीन 315 दगड गडावरील एका दरीत आढळून आले. एका दगडाचे वजन तीनशे ते चारशे किलो आहे. मजुरांच्या मदतीने हे दगड वरती काढण्यात आले. कमानीपासून वेगवेगळ्या आकाराचे हे दगड आहेत. पुनर्बांधणी झाल्यावर शिवकाळातील मूळ स्वरूपातील नाणे दरवाजा तयार होईल.

स्वतंत्र रोप वेचा प्रस्ताव लालफितीत
रायगडच्या संवर्धनासाठी पायथ्यापासून गडावर अवजड सामान नेण्यासाठी प्राधिकरणासाठी स्वतंत्र रोप वेची गरज आहे. सध्याचा खासगी रोप वे महागडा असल्याने सामान वाहून नेण्यासाठी स्वतंत्र रोप वेचा प्राधिकरणाने दिलेला प्रस्ताव दोन वर्षांपासून पुरातत्व विभागाकडे पडून आहे. गडाच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी स्वतंत्र रोपवेची परवानगी तातडीने मिळावी.

लाइट ऍण्ड साऊंड शो
शिवरायांच्या देदीप्यमान इतिहासाची देश विदेशातील पर्यटक व नव्या पिढीला माहिती करून देण्यासाठी गडावर लाइट ऍण्ड साऊंड शो होईल. त्यातून रायगडाचा पूर्ण इतिहास जिवंत होईल. पर्यटक रायगडाची महती हृदयात भिनवून गडावरून खाली उतरतील, अशा पद्धतीने शोचे क्रीप्ट तयार होत आहे. पुढील शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर शिवप्रेमींना काही तरी चांगले दिसण्याची शक्यता आहे.

गडाबरोबरच 21 गावांचा विकास
गडाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने 606 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. गडाच्या संवर्धनासाठी जानेवारी 2018मध्ये रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. छत्रपती संभाजी महाराज या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या कामाला वेग आला आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून गडाचे जतन व संवर्धन करताना रायगडाच्या घेऱयातील 21 गावांचा मूलभूत विकास होणार आहे.

पर्यटकस्नेही पायऱयांची बांधणी
शिवकाळात गडाला 1 हजार 475 पायऱया होत्या. गड चढताना शत्रूची दमछाक व्हावी, अशा पद्धतीने पायऱयांचे बांधकाम होते. त्या काळात एक पायरी दहा ते बारा इंचांपर्यंत होती. पण आताच्या काळातील शारीरिक क्षमता लक्षात घेऊन आता गडाच्या पायऱयांचा आकार सहा इंचांपर्यंत केला. त्यामुळे आता गडाच्या पायऱयांची संख्या वाढणार आहे. पण गडावर जाणाऱया पायरीमार्गात सुमारे पन्नास ठिकाणी पायऱया मूळ शिवकालीन स्वरूपात आहेत. त्यांना हात लावण्यात आलेला नाही. लष्करी किल्ल्याचे आर्किटेक्चर पर्यटनांना समजण्यासाठी पायऱया मूळ स्वरूपात ठेवल्या आहेत.

– [email protected]