साहित्यजगत – चळवळी का थंडावतात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

चळवळी का थंडावतात याचे एका वाक्यात उत्तर पारंपरिक पद्धतीने सांगायचे झाले तर ‘भाकरी का करपते?’ सगळय़ाच फसलेल्या चळवळींबाबत हे निदान कमी-जास्त प्रमाणात लागू पडते का? साहित्य जगतात ग्रामीण साहित्य चळवळ ही एक लक्षणीय घटना होती. त्याची मुहूर्तमेढ निसंशयपणे डॉ. आनंद यादव यांनी रोवली. त्यांच्या जोडीला रा. रं. बोराडे, चंद्रकुमार नलगे, द. ता. भोसले यांच्यासारख्या प्रस्थापित लेखकांनी त्यांना साथ दिली. मग गावोगावचे ग्रामीण लेखक त्याकडे आकर्षित झाले. ग्रामीण साहित्यकांचे मेळावे, साहित्य संमेलने, चर्चासत्रे, कार्यशाळा अशा उपामांतून ग्रामीण साहित्याची ही चळवळ जोर धरू लागली.

यामध्येच एक कार्यकर्ते होते वासुदेव मुलाटे. खरे तर ते गेले होते आनंद यादवांकडे त्यांच्या पीएचडी मार्गदर्शनासंदर्भात, पण बघता बघता ते ग्रामीण साहित्य चळवळीत ओढले गेले आणि मग तो त्यांचा अखंड ध्यास बनला. मात्र नंतर ग्रामीण साहित्य चळवळीचा पट खिळखिळा झाला तरीही मुलाटे यांना अजूनही नव्या प्रतिभावंतांनी ग्रामीण साहित्य चळवळीला नवसंजीवन दिले पाहिजे असे वाटते. त्यासाठी चळवळीच्या इतिहासाचे अवलोकन करून आधीच्या पिढय़ांकडून राहिलेल्या उणिवा, जाणता-अजाणता निर्माण झालेले दोष आणि बलस्थाने ओळखून, लक्षात घेऊन ही चळवळ ऊर्जित केली. या साहित्य चळवळीच्या दिवसांचा आठव त्यांनी मांडला आहे. ते पुस्तक म्हणजेच ‘ग्रामीण साहित्य चळवळ: एक ध्यास पर्व!’ स्वरूप प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे.

एखाद्या चळवळीचा उदय मांडणे तसे सोपे असते. मात्र त्याचा अस्त वा पडझड मांडणे अवघड असते. हे काम वासुदेव मुलाटे यांनी संयमितपणे मांडले आहे. ग्रामीण साहित्य परिषदेची कायदेशीर नोंदणी न होणे, ग्रामीण साहित्य चळवळीचे स्वतंत्र मुखपत्र सुरू न करणे अशा उणिवांची आणि त्याला कारणीभूत असणारी आनंद यादवांची चिकित्सा मुलाटे यांनी नेमकेपणाने मांडली आहे. ही चळवळ अधिक व्यापक आणि कार्यक्षम होण्यासाठी द. ता. भोसले यांनी जे विचार मांडले आहेत ते लक्षात घेण्यासारखे आहेत. ते म्हणतात, “या चळवळीच्या कार्यपद्धतीतून ग्रामीण साहित्याची चळवळ पुढे नेटाने चालवणारे दुसऱया आघाडीचे लेखक आणि कार्यकर्ते निर्माण होणे तितकेच आवश्यक आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा पाया घालणारे आजचे लेखक आज ना उद्या थकणार आहेत. तेव्हा नवे कार्यकर्ते आणि लेखकांतून चळवळीचे नेतृत्व तयार होणे आवश्यक आहे. यासाठी चळवळीच्या आजच्या धुरिणांनी आपल्यानंतर या चळवळीचे कार्य अधिक व्यापक रीतीने करणारे व जोमाने चालविणारे नवे लेखक घडविले पाहिजेत. त्यांच्यावर चळवळीची जबाबदारी टाकून त्यांना अनुभवसंपन्न बनवले पाहिजे. त्यासाठी संघटनात्मक कार्याचा अनुभव अधिकाधिक मिळेल अशी उपाययोजना केली पाहिजे. म्हणजे मग या चळवळीचे भविष्यकालीन कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकेल.”
आनंद यादव आणि रा. रं. बोराडे यांच्या बाबतीत मुलाटे यांनी नोंदवलेले निरीक्षण व उदाहरण विलक्षण बोलके आहे. ते म्हणतात, “चळवळ उभी करण्यात, ती वाढवण्यात त्यांचे योगदान निश्चितच मोठे आहे. पण त्या दोघांत ईर्षा आणि स्पर्धेचे दर्शन होई.”

1975 मध्ये परभणी येथे भरणाऱया अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नारायण सुर्वे, आनंद यादव आणि रा. रं. बोराडे उमेदवार म्हणून उभे राहिले. त्या संबंधात मुलाटे लिहितात, “सुर्वे व डॉ. यादव बोराडे हे समविचारीच होते. वयाने ते डॉ. यादव बोराडेंपेक्षा मोठेच होते. म्हणून समविचारी चळवळीत असलेल्या डॉ. यादव बोराडे यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून स्वतला घोषित करणे तात्त्विकदृष्टय़ा चुकीचेच होते. डॉ. आनंद यादव आणि रा. रं. बोराडे हे दोघे ग्रामीण साहित्य चळवळीचे संस्थापक-प्रवर्तक होते. एका चळवळीतल्या या दोन आधारस्तंभाने एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिल्याने त्यांच्या अनुयायांनी कुणाच्या बाजूने उभे राहायचे हा पेच निर्माण झाला होता. पुढे या प्रकरणात डॉ. दत्ता भोसले यांनी मध्यस्थी केली आणि रा. रं. बोराडे यांनी माघार घेतली, पण चळवळीतील दुहीचे चित्र स्पष्ट झालेच.” या निवडणुकीत पुढे डॉक्टरांनाही पराभव पत्करावा लागला. या संबंधात मुलाटे म्हणतात, “अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची पात्रता असणाऱया व्यक्तीची तशी आकांक्षा असणे यात काहीही गैर नाही, पण वेळ चुकली. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ग्रामीण साहित्य चळवळीसारख्या पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीच्या नेतृत्वाकडून असे घडले.” हे वाचून आनंद यादव यांच्या चुकलेल्या आणखी काही वेळा निश्चितच आठवतील. डॉ. वासुदेव मुलाटे यांचीही निरीक्षणे निश्चितच सगळय़ाच चळवळीतील लोकांना बरेच काही सांगून जातात. पण प्रश्न तसाच राहतो की, चळवळी का थंड पडतात?