रंगभूमी – कुणी रुग्णालय देता का रुग्णालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय कुळकर्णी

रंगमंच कामगारांसाठी रुग्णालय फार महत्त्वाचं आहे. कलाकारांना त्यांच्या वैद्यकीय खर्चात सवलत मिळणेसुद्धा जरुरीचं आहे. त्यासाठी निर्माता संघ यांनी सरकारबरोबर सल्लामसलत करून रंगकर्मीसाठी ठोस पावलं उचलायला हवीत. रंगकर्मी त्याकडे आशेने डोळे लावून बसलेले आहेत.

लाकार कितीही मोठा असला तरी येणाऱ्या संकटाला त्यास सामोरं हे जावंच लागतं. आजारी पडला की, त्याला औषधाचा खर्च स्वतःच करावा लागतो. ते एकवेळ समजू शकतो, पण जर असाध्य रोगाशी सामना करताना त्याला साथ कोण देणार? हा प्रश्न रंगकर्मीस पडलेला आहे. शस्त्रक्रियांचे खर्च अमाप वाढलेले आहेत. तो पाहिला तर धडकीच भरते. नाटय़ परिषद रंगमंच कामगारांचा आणि कलाकारांचा आरोग्य विमा काढते. आताची परिस्थिती माहीत नाही, पण तरीही कलाकारांसाठी एखादे रुग्णालय असावं असं ना नाटय़ परिषदेला वाटलं ना निर्माता संघास, असं रंगकर्मी सर्रास बोलताना दिसले. त्यासाठी कुणीच प्रयत्न केले नाहीत. त्यांचं म्हणणं तसं चुकीचं नाही. मुंबईतच नाही, तर महाराष्ट्रात अनेक सरकारी रुग्णालये आहेत. त्याचा फायदा रंगकर्मींना करून दिला तर काय हरकत आहे? हाच धागा पकडून ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले, रुग्णालय उभारणं ही खर्चिक बाब आहे. नीतू मांडके यांना स्वतःचे रुग्णालय उभारताना फार कष्ट सोसावे लागले हे आपण जाणतोच. कष्ट करूनही ते त्यांना पूर्ण करता आले नाही. त्यांच्या अकाली निधनानंतर अपूर्ण राहिलेले रुग्णालय अंबानी यांनी पूर्णत्वास नेले. त्यापेक्षा मुंबईतील आणि महाराष्ट्रातील रुग्णालयाच्या काही बेड्स कलाकारांसाठी आरक्षित ठेवाव्यात, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा मिळेल. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांचेसुद्धा म्हणणं तेच आहे. ते म्हणाले, रुग्णालय उभारणं ही मागणी तशी मूर्खपणाची आहे. रुग्णालयातील काही खाटा या राखीव ठेवाव्यात हे योग्य आहे. प्रायोगिक तत्त्वावर तसं करण्यास काहीही हरकत नाही.

ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चित्रपट आणि नाटय़सृष्टीतील कलाकारांना आणि रंगमंच कामगारांना इतकी वर्षे झाली, पण त्यांना हॉस्पिटल नाही. कोरोनाच्या वेळी त्यांना फारच कठीण परिस्थितीला तोंड हे द्यावं लागलं. योग्य उपचारांसाठी कुणीही सोय केली नाही. कोरोना काळात किती कलाकार गेले. त्यांना त्वरित उपचार हे मिळाले नाहीत. तशा आपत्ती यापुढे येतीलही आणि त्यासाठी कलाकारांसाठी रुग्णालय होणं गरजेचं आहे. सरकारनं त्याकडे जातीनं पाहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी कुणीतरी निःस्वार्थीपणे पुढाकार घ्यायला हवा. सरकारच्या मागे सातत्याने या गोष्टीसाठी पाठपुरावा करायला हवा. अभिनेते विजय मिश्रा म्हणाले, कलाकारांसाठी रुग्णालय हवं ही रास्त आणि चांगली मागणी आहे, पण यात कोणत्या प्रकारच्या कलावंतांना उपचार मिळणार आणि ती त्यांची कॅटेगिरी ठरवण्यात वाद आणि राजकारण होऊ शकते. त्यासाठी एक समिती गठीत होणे गरजेचं आहे. बोलणं सोपं आहे, पण करणं जरा कठीण आहे. रंगमंच कामगारांसाठी रुग्णालय फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अपघात विमा नाटय़ परिषद काढते, पण आरोग्य विमासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. ते दिवसाला बारा-पंधरा तास काम करतात. प्रायव्हेट रुग्णालयाचा खर्च त्यांना परवडत नाही. अशा वेळी त्यांच्या मदतीला कुणीही उभं राहत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

ही समस्या तशी विचार करणारी आहे. नाटय़सृष्टीचा कोटय़वधींचा वर्षाकाठी व्यवसाय होतो. नाटय़ संमेलनासाठी तेवढाच खर्च नाटय़ परिषद करते. त्या खर्चाला आळा घालून जर रंगकर्मीसाठी रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न केले तर ते नक्कीच दुवा देतील. अंबानी यांची मुंबईत दोन-दोन रुग्णालय आहेत. त्यांच्या रुग्णालयातील बेड्स कलाकारांसाठी आरक्षितसुद्धा ते ठेवू शकतात. कलाकारांना त्यांच्या वैद्यकीय खर्चात सवलत मिळणेसुद्धा जरुरीचं आहे. त्यासाठी निर्माता संघ यांनी सरकारबरोबर सल्ला मसलत करून रंगकर्मीसाठी ठोस पावलं उचलायला हवीत. रंगकर्मी त्याकडे आशेने डोळे लावून बसलेले आहेत. पाहू या.

[email protected]