
>> संजय मोने
आयुष्यभर त्याने असंख्य उद्योग केले, म्हणजे व्यवसाय करून बघितले. त्यामुळे कोणी तरी, कधी तरी त्याला टाटा असं नाव बहाल केलं आणि ते त्याला कायमचं चिकटलं. पार लहान असल्यापासून तो वेगवेगळे उद्योग करायचा. पार लहान म्हणजे बारा-पंधरा वर्षांचा. तेव्हा त्याची ही उद्योग गाथा सुरू झाली होती. आज तो तब्बल सत्तर-बहात्तर वर्षांचा आहे. पण सगळे त्याला एकेरी नावानेच पुकारतात. या वयातही त्याचे उद्योग चालूच आहेत.
त्याचं खरं नाव माहीत नाही. समेळ आडनाव तेवढं माहीत आहे, पण आयुष्यभर त्याने असंख्य उद्योग केले, म्हणजे व्यवसाय करून बघितले. त्यामुळे कोणी तरी, कधी तरी त्याला टाटा असं नाव बहाल केलं आणि ते त्याला कायमचं चिकटलं. पार लहान असल्यापासून तो वेगवेगळे उद्योग करायचा. पार लहान म्हणजे बारा-पंधरा वर्षांचा. तेव्हा त्याची ही उद्योग गाथा सुरू झाली होती. आज तो तब्बल सत्तर-बहात्तर वर्षांचा आहे. दोन-पाच वर्षं इकडे तिकडे म्हणजे माझ्यापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठा. पण सगळे त्याला एकेरी नावानेच पुकारतात. या वयातही त्याचे उद्योग चालूच आहेत. मुलं मोठी झाली आहेत. दोन नातवंडंही आहेत त्याला, पण तरीही तो… जाऊ दे ते नंतर.
मध्यमवर्गीय आणि आपल्यासारखी आर्थिक स्थिती असलेल्या घरात त्याचा जन्म झाला. शिक्षण वगैरेही फार देदीप्यमान नाही आणि अगदीच गचाळही नाही. अगदी सुरुवातीला त्याला दिवाळीला कंदील करून विकता येतील असा साक्षात्कार झाला. आमच्या आसपासचा परिसर बहुधर्मीय. त्यामुळे नाताळला चांदण्या, शिवाय ताबूत हेही बनवून पैसे कमावता येतील अशी अटकळ त्याने मनाशी बांधली आणि तो कामाला लागला. आजूबाजूच्या गरीब घरातल्या पोरांना त्याने कामाला लावलं. काडय़ा, कागद वगैरे जवळच्या दुकानदारांकडून उधारीवर घेतले. एक मात्र कबूल करायलाच हवं, त्याला या सगळ्या वस्तू उधारीवर मागायला लाज वाटली नाही. शिवाय त्याच्या बोलण्यात इतका कळवळा असायचा की दुकानदार बनिया त्याला अगदी आनंदाने त्याची उधारीची मागणी पूर्ण करून द्यायचा. आम्ही कायम घासाघीस करायला खूप लाजायचो, पण तो प्रत्येक वेळी त्या बाबतीत पुढे असायचा. रुपयाची वस्तू आपण फार तर ऐंशी पैशाला मागू (आता रुपयात काय येतं म्हणा!) तो सुरुवातच पस्तीस पैशाने करायचा. त्याचं म्हणणं एकदम राऊंड फिगर सांगायची नाही, म्हणजे चाळीस किंवा पन्नास असं म्हटलं की पुढे आपल्याला हव्या त्या किमतीला ती वस्तू मिळत नाही.. आणि तो ते प्रत्येक बाबतीत वापरायचा. एका दुकानदाराने रस्ते का माल सस्ते में असं म्हणून नऊ रुपये शर्टाची किंमत सांगितली. त्यावर तो थंडपणे म्हणाला, तीन रुपये. दुकानदारही अवाक् झाला. म्हणाला, साब दो रुपये के तो सिर्फ बटन है! तो शांतपणे म्हणाला, फिर उसको निकाल के दो. पोत्यानेही ती बटन्स काढून दिली. आणि तीन रुपये खिशात टाकले. आम्ही त्याला विचारलं, आता कसा वापरणार? शिलाई मारणार पुढे वरपासून खालपर्यंत आणि डोक्यातून चढवणार, हसून त्याने उत्तर दिलं. पुढे वर्षभर तो शर्ट टाटा समेळ वापरत होता. वयात आल्यानंतर सगळ्यांचं लग्न झालं. टर्रेबाजी करत फिरणाऱया मित्रांच्या हातात यथावकाश भाजीच्या पिशव्या आणि इतर गृहोपयोगी वस्तूंच्या थैल्या दिसायला लागल्या.रविवारी सकाळी सुट्टी असायची म्हणून आठ वाजता फिरायला जाऊन अकराच्या सुमारास घरी येऊन आईच्या डोक्याला ताप देणारे मित्र नऊ वाजता बाजारहाट करायला (मांसाहारी मासे, चिकन किंवा मटणाच्या भ्रमंतीत फिरायला लागले.) मान खाली घालून फिरत बसले. काही सुदैवी जीव, ज्यांनी लग्नाच्या बंधनात अडकायला विरोध केला (मी तेव्हा त्यातलाच एक होतो.) ते त्याच मित्रांच्या घरी जेवायला वार लावू लागले. टाटा समेळ मात्र या सगळ्यांच्या पेक्षा वेगळा होता. त्याच्या घरी त्याही काळात मांसाहारी पदार्थ विकणारे दारात यायचे. त्याचे ते बांधलेले पोते होते. कदाचित त्यामुळेच त्याच्या बायकोचं त्याच्यावर अगाढ प्रेम होतं. तिच्या हाताला अमृताची चव होती. त्यामुळे आम्ही सगळे त्याच्या घरी लोंबकळत असायचो.
तिही फार प्रेमळ होई. कोणीही आणि कितीही मित्र जेवायला आले तरीही तिच्या गोंडस चेहऱयावर कधीही नाराजीची रेषा उमटली नाही. हळूहळू आम्ही सगळे वयाने वाढत होतो. कोणी इंजिनीअर होऊन नोकरीला लागले, कोणी शेअर बाजारात सट्टा खेळू लागले, कोणी वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागले, कोणी बँकेत नोकरीला लागून पदोन्नती झाल्याने बाहेरच्या शहरात गेले, मी नाटक, सिनेमा आणि मालिकांच्या गर्तेत पडलो. काही आयुष्यभर फक्त खरं बोलत होते ते वकीलही झाले. एखाद् दुसरा आगळ्या मार्गाला लागून गुन्हेगार ते राजकारणी असा हल्ली झालेला सहज सोपा मार्ग अवलंबत मार्गी लागला. आम्ही मित्र नित्यनियमित भेटत असायचो. टाटा समेळ क्वचितच यायचा. कारण तो काही ना काही विकायच्या मागे असायचा. घाऊक भावात वस्तू आणून आमच्यासारख्या आळशी लोकांना वर्षभराचं वाणसामान आणून दे, वह्या विकून झाल्या. दिवाळीचा फराळ म्हणजे त्याच्यासाठी घसघशीत नफा मिळवून देणारी खाणच होती. या सगळ्यात त्याला भरपूर पैसे सुटायचे. नंतर त्याची मुलं उत्तम शिकली. भरपूर पैसे कमवू लागली. टाटाचं असं दारोदार हिंडून पी करणं त्यांच्या व्हाईट कॉलर इमेजला पटत नाहीसं झालं. त्यामुळे त्यांच्यात एकदोनदा वादही झाले. अचानक एक दिवस त्याने आमच्या नेहमी भेटण्याच्या ठिकाणी आपला मानस व्यक्त केला. तो सगळं सोडून त्याच्या तळकोकणातल्या गावी स्थायिक होणार होता. आम्ही सगळ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो आणि त्याची बायको यांचं ठरलेलं होतं. मुलाला आणि सुनेला त्याने एक घर घेऊन दिलं. मुलीच्या नावाने एक रक्कम ठेवून दिली आणि स्वत गावाला टुमदार बंगला बांधला. इतके पैसे टाटा समेळ मिळवत होता हे तेव्हा आमच्या लक्षात आलं. तसे आम्ही मित्र बहुतेक मूळ गाव कोकणातले होतो. वर्षाकाठी जाणं येणं असायचं. त्यामुळे आलात तर माझ्या घरी या आणि राहायला या. उगाच एसी आहे म्हणून कुठेही हॉटेलात राहू नका. आपल्या घरी पण गेल्याबरोबर एसी असणार आहे, असं दरडावून सांगितल्यावर आमची भेट संपली.
आता कोकणातल्या हायवेवर एक मस्त तगडा माणूस उन्हाळ्यात ताक, शहाळ्याचं पाणी विकतो, कोकम सरबत विकतो. पावसाळ्यात गरमागरम भाजी, बटाटेवडे, मिसळपाव विकतो. थंडीच्या मोसमात (कोकणात आता थंडी हा ऋतू बाद झालाय.) हळद दूध विकतो. जेवणाच्या वेळेला गेलात तर तुम्हाला उत्तम शाकाहारी आणि मांसाहारी जेवण पुरवतो. (तुम्ही आपली गाडी उभी करायची, तो त्याच्या बाजूलाच उभ्या केलेल्या गाडीतून तुम्हाला आपल्या स्वतच्या घरी नेतो. पोटभर जेवू घालतो आणि तुम्ही द्याल तेवढेच पैसे घेतो. मागत नाही. शिवाय जाताना कोकणचा मेवा भेट म्हणून देतो.)
टाटाला नाटक, सिनेमा, टी.व्ही. बघणे असा शौक करायला परवडत नाही. कारण त्याच्याकडे तेवढा वेळच नसतो. यातून प्राप्ती किती? तर भरपूर. वर्षातून एकदा तो सपत्नीक परदेश प्रवास करतो. त्याचे बहुतेक सगळे खंड पार करून झाले आहेत. अगदी फर्स्टक्लासचं विमानाचं तिकीट काढून जातो. (जे आमच्यापैकी कुणालाही शक्य नाही.) आता टाटा समेळ 75 च्या वर आहे. बायको त्याच्याहून 3 महिन्यांनी मोठी आहे, पण दोघे जेमतेम 62-65 वर्षांचे असावेत असा संशय येतो. रस्त्याच्या कडेला उभं राहून धंदा करायला त्याला अजिबात लाज वाटत नाही. आपण कोणाला तरी त्यांना हवं ते वेळेला पुरवतो, त्यात काय लाज बाळगायची? एवढाच त्याचा आम्हाला निरुत्तर करणारा प्रश्न असतो… आणि निरुत्तर म्हटल्यावर त्या प्रश्नाला उत्तर नाही.
कधी कोकणात गेलात आणि रस्त्याच्या कडेला काही विकणारा एखादा म्हातारा तरणाबांड इसम पाहिलात तर तो आमचा टाटा समेळ. जाता जाता… टाटा समेळ कोकणातला नाही. निदान मागच्या चार-पाच पिढय़ा तरी. पण आता तो मस्त कोकण्या झाला आहे टाटा समेळ.




























































