
>> संजय शेट्ये
प्रत्येक कुटुंबात एखादी तरी व्यक्ती सगळय़ांना आदर्श, प्रिय असतेच. प्रत्येकावर त्या व्यक्तीकडून कळत-नकळत संस्कार होत असतात. शिकवण मिळत असते. आमच्यापुरता विचार केला तर हेमा मावशी म्हणजे आम्हा आते-मामेभावंडांची सर्वात प्रिय व्यक्ती. तिचे विचार, तिचे लिखाण, तिची श्रीरामावरची भक्ती सर्वच उच्च कोटीचं आहे. आम्हा घरातील सर्वांना तिच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. हेमा मावशी पूर्वाश्रमाची हेमलता विठ्ठल वायकूळ व आताची सुनीता श्रीधर शिरगावकर. मराठी विषय घेऊन बीए झालेली. समाजात कसे वावरावे, संयमी कसे राहावे, शिक्षणाला सर्वात आधी महत्त्व द्यावे, हे सर्व आम्ही तिच्याकडून शिकलो. मला वाटते, मला वाचनाची आवड मावशीकडून आली आहे. नेहमी भेट ही वस्तू स्वरूपात असावी असे काही जरुरी नाही. चांगल्या शिकवणीची भेट आयुष्यभर पुरते व जीवन समृद्ध करून जाते. दुर्दैवाने मावशी 28 वर्षांची असतानाच माझ्या काकांना कंपनीच्या कामानिमित्त सुप्रीम कोर्टात असताना युनियनच्या वादात नाहक आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळेस माझ्या मावशीला तीन लहान मुली होत्या. सर्वात लहान मुलगी तीन वर्षांची होती. वायकूळ कुटुंबाचा हा जावई अतिशय हुशार, विद्वान व कर्तबगार होता, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. काकांचा मृत्यू हा समस्त परिवारासाठी खूपच दुःखद व भयानक होता.
शिरगावकर व वायकूळ कुटुंबीयांच्या सहकार्याने मावशीला मानसिक आधार मिळाला. मावशीने तिन्ही मुलींना चांगले शिक्षण, उत्तम संस्कार देऊन त्यांची व्यवस्थित लग्ने लावून दिली. तिने कधीही परिस्थितीपुढे हार मानली नाही. अनेक संकटांना ती पुरून उरली. मुलींच्या आजारपणात खस्ता काढल्या, पण शिक्षणाच्या बाबतीत आग्रही राहिली, शिस्त बिघडवू दिली नाही. मावशी श्रीरामाच्या भक्तीत व श्री स्वामी समर्थांच्या सेवेत स्वतःला विसरून गेली आहे. स्वतःचे स्वगत लिहिते, छोटे छोटे लेख लिहिते. श्रीरामाशी व श्री स्वामी समर्थांशी संवाद साधते, त्यांच्यात विलीन होते. तिचे हे कृतार्थ जीवन जगणे हीच माझ्यासाठी एक अविस्मरणीय भेट ठरली असे म्हणायला हवे.































































