लेख – शिक्षण व्यवस्थेचे सक्षमीकरण कधी?

>> संतोष मुसळे

मागील संपूर्ण शैक्षणिक वर्षात कोराना आणि लॉक डाऊनमुळे पहिली ते चौथीचे वर्ग अजिबातच सुरू होऊ शकले नाहीत. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग शासनाच्या कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात आली. यावर्षीदेखील शाळा सुरू होतील की नाही हे सांगता येणार नाही. कोविडचा समाजाच्या सर्वच घटकांवर खूप मोठा परिणाम झाला, मात्र सर्वाधिक परिणाम झाला तो मुलांच्या शिक्षणावर. कोविड संपल्यानंतर आपल्याला खऱया अर्थाने शिक्षणाला उभारी देणे गरजेचे आहे. नाहीतर कोरोनाच्या लाटेप्रमाणे शिक्षणक्षेत्रात मुलांच्या गळतीच्या किंवा शाळा सोडण्याच्या लाटा येतील.

जून महिना उजाडला म्हणजे पक्ष्यांच्या किलबिलाटाप्रमाणे शाळाशाळांत मुलांचा किलबिलाट सुरू होतो. एकीकडे दीड महिना मुलांना सांभाळून हैराण झालेले पालक सुटकेचा निःश्वास सोडतात व मुले शाळा परिसरात रमायला लागतात. सोबतच ग्रामीण भागातील पालक शेतात लागवडीसाठी गुरुजींच्या भरवशावर आपली मुले सोडून निश्चिंतपणे लागवड करतात. मात्र मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशासह राज्यातदेखील लॉकडाऊन लागले. यामुळे मागील संपूर्ण शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीचे वर्ग अजिबातच सुरू होऊ शकले नाहीत. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग शासनाच्या कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात आली. यावर्षीदेखील शाळा सुरू होतील की नाही हे सांगता येणार नाही. कोविडचा समाजाच्या सर्वच घटकांवर खूप मोठा परिणाम झाला, मात्र सर्वाधिक परिणाम झाला तो मुलांच्या शिक्षणावर. कोविड संपल्यानंतर आपल्याला खऱया अर्थाने शिक्षणाला उभारी देणे गरजेचे आहे. नाहीतर कोरोनाच्या लाटेप्रमाणे शिक्षणक्षेत्रात मुलांच्या गळतीच्या किंवा शाळा सोडण्याच्या लाटा येतील.

कोविडच्या निमित्ताने आपल्या देशात एक मात्र झाले ते म्हणजे कधी नव्हे ते आरोग्य क्षेत्राकडे सर्वांचे लक्ष वेधले. कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक जिह्याच्या सामान्य रुग्णालय, तालुक्याच्या ठिकाणी असलेले ग्रामीण रुग्णालय याठिकाणी ऑक्सिजन बेड, सुसज्ज प्रयोगशाळा, आता ऑक्सिजन प्लांट उभे ठाकले. कोरोना आला नसता तर खरोखर आरोग्यविषयक सेवांचे व शासकीय रुग्णालयांचे रूपडे बदलले असते का? आज ना उद्या कोरोना जाईल, मात्र यामुळे सर्वाधिक परिणाम झालेले क्षेत्र म्हणजे शिक्षण. आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय, देश, राज्य शासन, स्वंयसेवी संस्था, समाजातील प्रत्येक घटकाने जे योगदान दिले तसेच योगदान आगामी काळात शिक्षणासाठी दिले तर कोरोनामुळे ज्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झालेला आहे ती शिक्षण प्रवाहात टिकून राहतील नाहीतर उद्या हीच मुलं वाईट मार्गाला लागू शकतील.

मागील व यावर्षी ग्रामीण व शहरी भागांतील मुलांच्या मानसिकतेचा विचार केल्यास असे जाणवते की, ग्रामीण भागातील मुलं अजूनही शहरी भागांतील मुलांपेक्षा मानसिकदृष्टया सक्षम आहेत. याचे कारण म्हणजे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव मोठय़ा प्रमाणात झाला नाही तसेच गावपातळीवरील परिसंस्था याचाही मोठा फायदा मुलांना झाला. शेतात जाणे, गावातील मित्रांसोबत खेळणे, आजी, आजोबा तसेच नातेसंबंधांमुळे ही मुलं सामाजिक व मानसिकदृष्टय़ा सक्षम राहिली. मात्र शालेय शिक्षणापासून ही मुलं कोसो दूर राहिलेली दिसतात. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सुरुवातीपासूनच शहरी भागात निघाले. सोबतच खेडय़ासारखी परिसंस्था शहरी भागात दिसत नाही, याचे कारण म्हणजे इथे राहणारी मंडळी ही गावांसाठी पिढय़ान्पिढय़ा एकमेकांच्या ओळखीची नसतात त्यामुळे त्यांचे ऋणानुबंध जास्त जुळलेले नसतात. दुसरे म्हणजे कोरोनाची दाहकता यामुळे शहरी भागातील मुले ही घरातच बंदिस्त आहेत. यांना ना बोलायला कोणी आहे की खेळायला? सोबतच सातत्याने टी. व्ही. व मोबाईल गेम यामुळे या मुलांची मानसिकता चिडचिडी झाल्याचे दिसून येते. एक मात्र झाले शहरी भागातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांनी ऑनलाइन पद्धतीने मुलांना शिकविले. तसेच पालक सुशिक्षित असल्याने त्यांनी आपापल्या मुलांना येणाऱया अडचणी थोडय़ा फार प्रमाणात होईना सोडवल्या.

राज्यात अंदाजे पहिली ते बारावीपर्यंत सवा दोन कोटी विद्यार्थीसंख्या आहे. यातील दहावी व बारावीचे विद्यार्थी वगळता बाकीच्या वर्गांतील मुलांच्या शिक्षणात कोरोनाच्या निमित्ताने खंड पडला आहे. शासन, शाळा, पालक यांनी आपापल्या परीने मुलांना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याच्या प्रयत्न केला. मात्र ग्रामीण भागात जेथे केवळ शिक्षक हाच एकमेव ज्ञानाचा स्त्रोत असतो. कारण ग्रामीण भागातील पालक शैक्षणिक साक्षर नसतात त्यामुळे आपल्या मुलांना घरी ते योग्य ते मूलभूत शिक्षण देऊ शकत नाहीत. भागात ऑनलाइन पद्धतीने शिकणे म्हणजे खूपच कठीण काम. कारण जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱया बऱयाच मुलांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना मोबाईल रेंजची मोठी अडचण तसेच मोबाईल साक्षरता हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. अशातच लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे पालकांच्या हाताला काम नाही मग रिचार्जसाठी पैसे कोठून आणायचे या बाबींचा मुलांच्या शिक्षणावर खूप मोठा परिणाम झालेला दिसत आहे.

याची सर्वाधिक झळ पोहोचली ती इयत्ता पहिलीतील मुलांना. कारण आपल्याकडे आजही खेडेगावात म्हणावा तसा पूर्व प्राथमिक शिक्षणाचा विकास झालेला नाही. यामुळे ज्यावेळी अंगणवाडीतून इयत्ता पहिलीत मुले दाखल होतात त्यावेळी खरी कसोटी असते ते पहिली वर्गाला शिकविणाऱया शिक्षकांची. कारण या मुलांना शिक्षणासोबतच विविध शारीरिक सवयी लावण्याचे महत्त्वाचे काम करावे लागते. मागील वर्षी तेच झाले नाही. इयत्ता पहिलीतील मुले एकही दिवस शाळेत न जाता सरळ दुसरी प्रविष्ट झाली व याही वर्षी शाळा सुरू नाही झाल्या तर ही मुलं दुसरीतून तिसरीत जातील. मात्र दुसरीत किंवा तिसरीत गेल्यानंतर या मुलांना शिक्षक अंक व अक्षर ओळख शिकवतील की संबधित वर्गाचा अभ्यासक्रम. असेच यावर्षी शाळा नाही उघडल्या तर पहिलीच्या मुलांचे होऊ शकते. पुढील वर्गावरही यांचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. मात्र या वर्गातील मुलांना अक्षर व अंकासोबत भाषा, गणित, इंग्रजी या विषयातील बरेचशे मूलभूत संबोध माहिती असल्यामुळे त्यांना त्या त्या वर्गाचा अभ्यासक्रम थोडाफार का होईना आत्मसात होईल व प्रत्यक्ष शाळा ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी सुरुवाताचे किमान तीन महिने या वर्गातील मुलांसाठी मागील वर्षीच्या अभ्यासावर आधारित मुलभूत संबोध स्पष्टीकरणास दिले तरच ही मुले आहे त्या वर्गातील अभ्यासक्रम योग्यपणे आत्मसात करतील. सोबतच यावर्षी कदाचित शाळा सुरू नाही झाल्या तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकासोबतच स्वाध्याय पुस्तिका दिल्या तर ती अजून शिक्षणक्षम होतील. कोरोनानंतर खरोखर आरोग्य विभागाच्या धर्तीवरच शासनाने शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत केली तरच शिक्षणाचा हा अनुशेष भरून निघेल नाहीतर कोरोनाच्या लाटेत जसे अनेक जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले तसेच शिक्षणाला बळकटीकरण न दिल्यास या मुलांचे पण होईल.

आपली प्रतिक्रिया द्या