टिवल्या-बावल्या : शिवी

2279

>> शिरीष कणेकर

शिवी किंवा अपशब्द म्हणजे काय? राग, संताप, विरोध या तीव्र भावनांचा उत्कटपणे प्रकट निचरा करणारा शिष्टसंमत नसलेला एक शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे शिवी किंवा अपशब्द.

शिवाजी पार्क कट्टय़ावरील प्रदीर्घ वास्तव्यानंतर प्रत्येक वाक्य अपशब्दाची फोडणी देऊन बोलण्याची स्तुत्य सवय लागली. त्यासाठी राग, संताप, उद्रेक यांची आवश्यकता नाही हा महत्त्वाचा भाषिक शोध आम्ही लावला. मात्र त्याचं श्रेय किंवा पेटंट घेण्याचा अप्पलपोटेपणा आम्ही केला नाही. घेऊ दे ज्या कोणा XXXXX ला या XXXX शोधाचं श्रेय घ्यायचं असेल त्या XXXX ला असा मानवतावादी आम्हा XXX चा दृष्टिकोन होता. सुमारे वीस वर्षे कट्टय़ावर रोज संध्याकाळी हे ‘शिवीसंस्कार’ झाल्यावर शिवीशिवाय नुसतं (शिवीरहीत) बोलणं आम्हाला अशक्यप्राय झालं होतं. शिवी हीच आमच्यासाठी ओवी झाली होती. ‘आज कामवाली आली नाही’ किंवा ‘पंधरा दिवस झाले फोन बंद आहे’ किंवा ‘जिन्यात पाय मुरगळला’ किंवा ‘गावी जायला साहेब रजा देत नाहीत’ किंवा ‘शेजारीण चांगली लाइन द्यायची, अलीकडे काय झालंय कळत नाही’ किंवा ‘दोडक्याची भजी कोणी केली होती का?’ ही विधानं योग्य ठिकाणी योग्य अशा वजनदार शिव्या पेरल्याशिवाय बोलताच कशी येतील? ती एकदमच पुचाट, पांचट, लेचीपेची, शेंबडी वाटणार नाहीत का? भाषेत व आमच्या शब्दसंग्रहात उत्तम, दर्जेदार व अणकुचीदार शिव्या असताना त्यांचा वापर टाळून आम्ही भाषाप्रेमी तिचं अवमूल्यन कसं होऊ देऊ?

कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त भावना पोहोचवणाऱया असा शिव्यांचा उल्लेख करावा लागेल. इतकं अर्थवाही दुसरं काहीही नाही. ऐकणाऱयाचा गैरसमज होण्याची शक्यता शून्य. सणसणीत शिवी बाणासारखी कानात शिरते व मेंदू हलवून सोडते. क्षमता असल्यास तोही तोडीस तोड शिवी घालतो. हे द्वंद्वयुद्ध ज्याच्याकडे शिव्यांचा साठा मोठा व अधिक प्रभावी तो जिंकतो. हरलेला जखमा चाटत निघून जातो, पण जाताना शिव्यांचा स्टॉक वाढवला पाहिजे अशी मनाशी खूणगाठ बांधतो. ‘एक शिवी देऊ बाई, दोन शिव्या देऊ’ असे या शिवीयुद्धातील दोन मल्लांचे शीर्षक गीत असले पाहिजे.

शिवी माहीतच नसलेला नरपुंगव विरळा. माहीत असूनही गरजेला ती तोंडातून काढू न शकणारा दुबळा. आपल्याकडे शिव्या या माणसाच्या सामाजिक स्थानाशी जोडल्या गेल्यात. सो सॅड, अफसोस! उच्चविद्याविभूषित, उच्चपदस्थ, उच्चवर्णीय, मालदार, लब्धप्रतिष्ठत बडय़ा माणसाला शिव्या वर्ज्य मानल्या जातात. तसं झालंय खरं. चकाचक गाडीतून खाली उतरणारा सुटाबुटातला माणूस धाडधाड शिव्या देत सुटलाय असं सहसा पाहायला मिळत नाही. अगदीच त्याच्या मनात शिव्या देण्याची ऊर्मी दाटून आली तर तो इंग्रजीतून शिव्या घालतो. व्हिच इज नॉट द सेम थिंग ऍज अवर गावरान, अस्सल शिव्या. ‘तुझ्या आयला रे’ अशी धिमी सुरुवात करून नंतर जो धमाका होतो, जो आगीचा डोंब उसळतो, जो तोंडाचा ढोल-ताशा वाजतो तो (शिव्या खाणारा सोडून) सगळय़ांनी सुपाएवढे कान करून ऐकण्यासारखा व हृदयात ठसवून घेण्यासारखा असतो. इंग्रजीतून दिलेल्या शिव्या ऐकणाऱयाला कळणारच नसतील तर उपयोग काय त्या शिव्यांचा? उलटून शिव्या देण्यासाठी लागणारी ऊर्जा तो बिचारा कुठून आणणार? शिव्या या मातृभाषेतून व फार तर राष्ट्रभाषेतून दिल्या जायला हव्यात असा सरकारने वटहुकूम काढायला हवा. वटहुकुमातही दोन-चार शिव्यांचा अंतर्भाव करून सरकारनं याबाबत किती गंभीर आहोत हे दाखवून द्यावे.

‘टॅक्सी ड्रायव्हर’मध्ये देव आनंद येताजाता ‘साला’ म्हणत असतो. नायिका कल्पना कार्तिकला ते खटकते. ती त्याला हटकते. तो म्हणतो, ‘ही कसली शिवी? तू देऊन दाखव मला एखादी शिवी.’

कल्पना कार्तिक कर कर विचार करते आणि शिवी देते – ‘पापी’. देव आनंद थाडकन कपाळावर हात मारून घेतो. शिवाजी पार्कवरच्या नसला तरी कुठल्या तरी कट्टय़ावर देव आनंद नक्की बसत असला पाहिजे.

माझ्या माहितीत एक सुशिक्षित, सुखवस्तू (सुसंस्कृत नाही म्हणू शकत) कुटुंब आहे. त्यातले बाप व लेक देवपूजा करावी त्या नियमीतपणे एकमेकांना छप्परतोड शिव्या देतात. विशेष म्हणजे पोटचा पोरगा आपल्याशी इतक्या शिवराळ भाषेत बोलतोय याचं बापाला यत्किंचितही दुःख किंवा वैषम्य वाटत नाही. बापाला राग याचा येतो की, आपणच जन्माला घातलेल्या मुलाचा शिवीसंग्रह आपल्यापेक्षा जास्त कसा? मुलगा नवीन नवीन भारी शिव्या शिकत असताना आपण काय करत होतो? कामावर जायचं असल्यामुळे किंवा नळाचं पाणी जाण्यापूर्वी आंघोळ करायची असल्यानं हे शिवीयुद्ध तात्पुरतं स्थगित करण्यात येतं. शस्त्र्ासंधी. रात्री जेवूनबिवून फुरसतीनं भरल्या पोटी हे रक्तविरहित द्वंद्व सुरू होतं. एक योद्धा माघार घेत नाही. एक तलवार म्यान होत नाही. एक साप बिळात परतत नाही. रुस्तुम तडकलेला, सोहराब भडकलेला. फर्निचरची फेकाफेक होते. त्यात त्याचं स्थलांतर होतं. खुर्ची पलंगावर गेल्यामुळे खुर्चीवरही बसता येत नाही व पलंगावरही पहुडता येत नाही. आता वापरून वापरून शिव्या गुळगुळीत व गुळमुळीत झाल्यात. आता पुढे?… माझे कान निवलेत. मनुष्यदेहाचं सार्थक झालंय. आयुष्याचं सोनं झालंय. ज्ञानात नव्या शिव्यांची भर पडलीय. आम्ही जन्मदात्याला देव मानून वाढलो. त्यांनीही आमच्या पुढे चुकूनही कधी अपशब्द उच्चारला नाही. दोन्ही पिढय़ा मूर्खच म्हणायच्या. बापात देव पाहतात XX.

‘शायर-ए-आझम’ मिर्झा गालिबकडे एकदा त्याचा शिष्य हली गेला होता. गालिब त्याला आलेलं पत्र वाचत होता. पत्र वाचून खाली ठेवून तो म्हणाला, ‘काय दिवस आलेत, लोकांना धड शिव्याही देता येत नाहीत. लहान मुलाला आईवरून दिलेली शिवी फार लागते. मोठय़ा मुलाला बहिणीवरून दिलेली शिवी लागते. तरुणाला बायकोवरून दिलेली शिवी लागते. म्हाताऱयाला मुलीवरून दिलेली शिवी लागते आणि हा माणूस मला म्हाताऱयाला आईवरून शिवी देतोय. कसं कळत नाही यांना?’

गालिब आजच्या काळात असता तर मी त्याला कट्टय़ावर ओढून घेऊन गेलो असतो आणि म्हणालो असतो, ‘मियाँ, जरा हमारी गालिया भी तो सुनो.’
दोन माणसं रस्त्यात एकमेकांना शिव्या देत होती.

मी तिथं गेलो.

त्यांना थांबवलं, समजावलं.

तेव्हा कुठे ते मारामारी करू लागले.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या