टिवल्या-बावल्या – पियो और पिने दो

1380

>> शिरीष कणेकर

दारू प्यायल्यामुळे जीभ खूप सैल सुटते ये तो सारी दुनिया जानती है. एरवी बायकोपुढे झाकलेल्या कोंबडय़ाप्रमाणे असणारा नवरादेखील दोन घोट पोटात गेले की सिंहासारखी गर्जना करायला लागतो. बायको जाणून असते की थोडी उतरली की वनराजाची मनीमाऊ होईल. घटकाभर सिंह झाल्यानं काय होतंय? उसनं अवसान किती काळ टिकणार? म्हणून हा शेर आहे.

‘न पिना हराम है, न पिलाना हराम है
पिने के बाद होश में आना हराम है’

बरोबरच आहे. दाहक वास्तवापासून पळभर सुटका करून घेण्यासाठी ही दारू मुखमार्गे पोटात सारायची. पोटात आग पडते, पण आयुष्याला वेढणारी आग तात्पुरती का होईना, विझते. नशा उतरली की दाहक वास्तव जास्तच प्रखर होतं. म्हणून शायर म्हणतो – ‘पिने के बाद होश में आना हराम है!’

एक शायर म्हणतो-

पिता हूँ इसलिये के जल जाये जवानी
वरना किसी शौक के मारे तो नहीं पिता

दारूमुळे इतरांची आतडी जळतात. हा बेटा जवानी जाळण्यासाठी पितो. जवानी काय जळावू लाकडांची वखार असते?
मजरुह सुलतानपुरीनं ‘दो गुंडे’ या चित्रपटासाठी एक गाणं लिहिलं होतं (साल 1979. संगीतकार गुलाम महंमद) ते असं-

‘मैं नशे में हूँ, मै नशे में हूँ
दोस्तों ने जबसे छोडा, मैं मजे में हूँ’

दोस्त सुटावेत असा वाटणारा हा कवी जगावेगळाच म्हणावा लागेल. याच्या वाटणीची दारू दोस्त पीत नव्हते ना?
दारू पिऊन माणूस कधी खोटं बोलत नाही असा एक लोकप्रिय समज आहे. म्हणून हा कल्पक शायर काय म्हणतो पाहा-

कर दो तब्दील अदालतों को मयखाने में साहब
सुना है नशे में कोई झूट नहीं बोलता

कोर्टाचा दारूचा गुत्ता करण्याची कल्पना भन्नाट म्हणावी लागेल. दारू पिऊन गुन्हेगार व साक्षीदार खरंच बोलतील. हेच हवंय ना तुम्हाला?
या उर्दू शायरांची लेखणीइतकीच मदिरेवर भक्ती दिसते. ते मशिदीत बसून पिण्याच्याही गोष्टी करतात. पण त्यांचा युक्तिवाद किती सुंदर व बिनतोड आहे बघा. मिर्झा गालिबपासून सुरू करूया. गालिब म्हणतो-

‘जाहीद, शराब पिने दो, मस्जिद में बैठकर
या वो जगह बता दे जहाँपर खुदा न हो’

आज एवढय़ा वर्षांनंतरही गालिबचा हा लाजवाब शेर तेवढाच ताजातवाना व टवटवीत आहे. मशिदीतल्या मौलाला गालिब म्हणतो की, मशिदीत दारू निषिद्ध आहे. कारण ती पवित्र वास्तू आहे; तिथं प्रत्यक्ष खुदा वास करतो. मान्य. नाही पीत मशिदीत. मग अशी जागा दाखव तिथं खुदा नाही. तिथं बसून पिऊ, म्हणजे खुदाचा अधिक्षेप होणार नाही. एकटय़ा मशिदीचं काय घेऊन बसलात, खुदा चराचरात भरून राहिलाय हे सांगणारा गालिबचा ढंग और आहे. म्हणून तर तो मिर्झा गालिब आहे.
जवळपास शंभर वर्षांनंतर मोहम्मद इकबालनं गालिबला उत्तर देण्याचं धाडस केलं. इकबालनं लिहिलं-

‘मस्जिद खुदा का घर है, पिने की जगह नहीं
काफिर के दिल में जा, वहाँ खुदा नहीं’

जिथे खुदा नाही अशी जागा तुम्ही पिण्यासाठी शोधताय व ती तुम्हाला मिळत नाही ना? मी सांगतो. ‘काफिर’ खुदाला न मानणारा, त्याच्या मनात डोकावा; तिथं खुदा नसतो. आहे का आता?

इकबालच्या या दाव्यानंतर सत्तर वर्षांनी अहमद फराजनं लिहिलं-

‘काफिर के दिल से आया हूँ मैं ये देखकर
खुदा मौजूद है वहाँ, पर उसे पता नहीं’

खुदा तिथं नाही कसं म्हणता? तिथंही आहे तो; फक्त ‘काफिर’ला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नाही.
यावर ‘वसी’नं बुद्धिमान भाष्य केलं. तो म्हणतो-

‘खुदा तो मौजूद दुनिया में हर जगह है
तू जन्नत में जा वहाँ पिना मना नहीं’

अरेच्चा! आयुष्यभर पृथ्वीवर पी पी प्यायल्यावर व उरलेल्या वेळात पिण्यासाठी ‘सेफ’ जागा शोधल्यावर आपल्याला स्वर्गात जागा मिळेल हा आत्मविश्वास कुठून येतो?
वलीसाहेब की शायरी का जवाब साकीनं दिया. साकी म्हणतो-

‘पिता हूँ गम-ए-दुनिया भुला ने के लिये
जन्नत में कौन सा गम है, इसलिये वहाँ पिने में मजा नहीं’

काळाच्या ओघात शायरीचा दर्जा ओसरत चाललेला दिसतो. यंदाच्या वर्षी एडमिन (हे माणसाचं नाव आहे की जाहिरात कंपनीचं?) साहब नामे शायरानं एक स्फोटक शेर लिहिलाय तो म्हणतो-

ला भाई, दारू पिला, बकवास न यूँ बांचो
जहाँ मर्जी वही पिएंगे, भाड में जाये ये पाँचो

वाचलंत? हा शायर कमी व पिवय्या जास्त दिसतो. तो आधी उल्लेखलेल्या पाच शायरांना- मिर्झा गालिब, मोहम्मद इकबाल, अहमद फराज, वसी, वलीसाहेब- यांना खुशाल खड्डय़ात जायला सांगतो (गालिबलादेखील?) आपण खड्डय़ाच्या बाहेर राहू हे त्याला कशामुळे वाटतं?दारू माणसाला जनावराच्या पातळीवर आणते असं म्हणतात ते खरं असावं.

– Shireesh.[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या