ज्येष्ठ साहित्यिक

>> शिरीष कणेकर

ज्येष्ठ साहित्यिक’ ही उपाधी एखाद्याच्या नावाआधी वाचली की माझ्या धनुष्याकृती भुवया आश्चर्याने आपसूक उंचावल्या जातात. ‘साहित्यिक’ सोडा, पण जो लेखक असल्याचंच माहीत नाही, कानावर आलेलं नाही, डोळय़ांखालून गेलेलं नाही तो ज्येष्ठ साहित्यिक कधी व कसा झाला? कोणी केला? (अलीकडे अशी अक्षरशत्रू माणसं साहित्य संमेलनाची अध्यक्षही होतात. ज्याअर्थी ती मंडळी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झालीत त्याअर्थी ती साहित्यिक असली पाहिजेत असं सर्वसामान्य माणसं एकमेकांना सांगतात.) आधी साहित्यिक की आधी संमेलनाध्यक्ष हा आधी कोंबडी की आधी अंडं, यासमान गहन प्रश्न झाला. साहित्यिक आधी कोंबडं खातो की आधी अंडं हा मला पडलेला वैयक्तिक प्रश्न आहे.

मी ‘इंडियन एक्प्रेस’मध्ये इंटरह्यूसाठी गेलो होतो (1968) तेव्हा सोबत येडबंबूसारखा दोन-तीन मराठी लेखांची कात्रणे घेऊन गेलो होतो. ती पाहूनही त्या दाक्षिणात्य संपादकानं मला नोकरी कशी दिली हेच मला समजत नाही. त्यानंतर मात्र तो रोज कपाळाला हात लावून पश्चात्ताप करीत बसायचा. मी पत्रकारिता सोडली हे कानावर गेलं तेव्हा गुडघ्याचं प्रत्यारोपण झालेलं असतानाही हॉस्पिटलातच तो आनंदानं थयथया नाचल्याचं सांगतात. मग काय, तर ती मराठीतील लेखांची तीन कात्रणे मी योग्य ठिकाणी पोहोचती केली असती तर हू नोज, मी मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो असतो. पोटापाण्याला लागण्याआधी संमेलनाचा अध्यक्ष, तसा तीन लेखांनी मला साहित्यिक केलं होतंच. मी बायकोलाही सांगून ठेवलं होतं की येता-जाता माझा उल्लेख ‘साहित्यिक’ असा करायचा. उदाहरणार्थ, ‘येतीलच साहित्यिक एवढय़ात’ किंवा ‘तुम्हाला पाहून साहित्यिकांना आनंद होईल’ किंवा ‘साहित्यिकांची गोष्टच वेगळी’ किंवा ‘तिथं बसू नका, ते साहित्यिकांचं लिहिण्याचं टेबल आहे’. शेवटी एकदा ती कोणापाशी तरी ‘साहित्यिकांना सकाळपासून जुलाब होतायत’ असं म्हणाली तेव्हा मी हा साहित्यिक जुलाब आवरता घेतला.

ज्येष्ठ काय, कोणीही असू शकतो. जो देवाघरी गेला नाही व ज्याचा या शापित पृथ्वीवरचा मुक्काम लांबला तो झाला ज्येष्ठ. म्हणून मी ज्येष्ठ. पण ज्येष्ठच्या जोडीनं आणखी काय काय बिरुदं लावून कसं चालेल? मी स्वतःला ज्येष्ठ वैज्ञानिक, ज्येष्ठ अंतराळवीर, ज्येष्ठ मुष्टियोद्धा, ज्येष्ठ संस्कृत वाङ्मय अभ्यासक म्हणवून घ्यायला लागलो तर संबंधित माणसं मला बुकलून काढणार नाहीत का? मग ज्येष्ठ साहित्यिक म्हटल्यावर समाज इतका अनुत्साही व क्षमाशील कसा असू शकतो? याचाच अर्थ साहित्यिक या गौरवाला चारचौघांत काहीच किंमत नसावी. साहित्यिक म्हणून ओळखलं जाण्यासाठी साहित्य प्रसवण्याचीही गरज नाही. जयवंत दळवी प्रभृती थोर साहित्यिक आज आपल्यात असते तर साहित्यिक म्हणवून घ्यायला त्यांनी सपशेल नकार दिला असता. जयवंत दळवी व शुभंकर धुमाळ यांना एकाच पंक्तीत मांडीला मांडी लावून ज्येष्ठ साहित्यिक म्हणून कसं बसवता आलं असतं? शुभंकर धुमाळ हे काल्पनिक नाव घेतलंय. खरं नाव तुम्ही थोडंच ओळखणार आहात? पण होतं काय, लेखाचा ‘फोकस’ भरकटतो. फलाण्या फलाण्याला सोलून काढलंय असं वाचक म्हणतात. ज्येष्ठ साहित्यिक हा बहुमान खिरापतीसारखा वाटला जातोय, हा मुख्य मुद्दा बाजूलाच राहतो. म्हणून (नाव नसलेल्याचं) नाव बदलायचं. आयी बात समझ में?

चौकशीअंती समजले की शुभंकर राव (बघा बघा किती आदरानं बोलतोय. मुळातच आदर कमी असेल तर त्याला मी काय करणार?) ग्रंथ प्रसारक आहेत म्हणजे त्यांचं रद्दीचं दुकान आहे का? मग तसं स्पष्ट म्हणा की, ग्रंथ प्रसारण करता करता ते स्वतःच ग्रंथकार कसे, कुठे व केव्हा झाले? गाईचं दूध काढून काढून भय्या स्वतःच गाय होण्यासारखं आहे हे. मध्यंतरी शुभंकर धुमाळ यांचा मी पेपरात ‘ज्येष्ठ साहित्यिक’ असा उल्लेख वाचला आणि माझं पित्त खवळलं. त्यांनी केलेली वाण सामानाची यादी वाचून त्यांना साहित्यिक ठरविण्यात आले असावे का? त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या गोष्टीला विरोध का करू नये? ‘मी कसला बोडक्याचा साहित्यिक?’ असं त्यांनी का म्हणू नये? त्यांचं मौन बोलकं आहे. आपसूक मांडीवर पडलेला हा किताब त्यांना हवाय. योग्यता नसताना हवाय. ‘ज्येष्ठ साहित्यिक’ऐवजी ‘साहित्य शिरोमणी’, ‘साहित्यमार्तंड’, ‘साहित्यशुण्ड’, ‘साहित्यदुंदुभी’ अशी विशेषणे विविधतेसाठी का नाही वापरत? लिहिणाऱयांना कदाचित ती माहीत नसतील. शुभंकर रावांनी किती काळ ‘ज्येष्ठ साहित्यिक’ या बुळबुळीत उपाधीवर भागवून न्यावं? निदान पक्षी गेला बाजार ‘साहित्यभैरव’ तरी नको?

पत्रकार म्हणून चौफेर लेखनबाजी करणाऱया ह. रा. महाजनी, गोविंदराव तळवलकर, निळूभाऊ खाडिलकर, ना. भि. परुळेकर, प्रभाकर पाध्ये, कुमार केतकर, द्वा. भ. कर्णिक यांनी आम्हाला साहित्यिक म्हणा असा अट्टहास धरला नाही. (अट्टहास कै. माधव गडकरी) आपल्या क्षेत्रातील आपल्या कर्तृत्वावर ते संतुष्ट होते. वाचकांनाही ते त्याच भूमिकेत भावत. (ह. रा. महाजनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नुसते दिसले तरी मंत्रिमंडळात घबराहट पसरे, असे जुने पत्रकार सांगत.) दांडपट्टय़ासारखी चौफेर लेखणी चालविणाऱया दिग्गज पत्रकारांना साहित्यिकाचा मुकुट घालून घेण्याचा मोह पडला नाही मग जे मुळात लेखकच नाहीत ते साहित्यिक कसे?

अकबराच्या काळात ‘पंडित’ या उपाधीला खूप मान होता. एका सामान्य माणसाची फार इच्छा होती की आपल्याला सगळय़ांनी ‘पंडित’ म्हणून ओळखावं. ‘पंडित’ म्हणून संबोधावं.
‘काय करू?’ त्यानं बिरबलाला सल्ला विचारला.

तू गल्लीतल्या पोरांना ‘पंडित पंडित’ असं चिडवत तुझ्यामागे यायला सांग.

त्या माणसानं तेच केलं व बघता बघता त्याचं नाव ‘पंडित’ पडलं.

म्हटलं आयडिया मी सोसायटीतल्या पोरांना ‘ज्येष्ठ साहित्यिक’ असं चिडवत माझ्यामागे धावायला सांगितले. वाटलं तर लहान लहान खडे मारायलाही सांगितले. पण त्यांनी धोंडे उचलले तेव्हा हा ‘ज्येष्ठ साहित्यिक’ हरला. ‘पत्थर से ना मारो मेरे दिवाने को’ असं माझ्यासाठी गाणारं तरी कोण होतं?…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या