टिवल्या-बावल्या – सी.के.पी.

>> शिरीष कणेकर

खूप प पूर्वी सी.के.पीं.चा ‘सरताज’ सी. डी. देशमुख पेणला आले होते. (तसे ते मूळचे रोह्याचे!) त्यांना जेवायला बोलावण्याची कायस्थात अहमहमिका लागली. त्यांनी सरळ बोलून दाखवलं, ‘मला वालाचं बिरडं खायला आवडेल.’ दिल्लीत पं. नेहरूंच्या पंक्तीत बिरडं कुठून मिळायला? सी. डीं.च्यात दडलेला अस्सल सी.के.पी. बिरडय़ासाठी तळमळत होता. अर्थातच त्यांच्यासाठी अमसूल घालून पेणच्याच प्रसिद्ध कडव्या वालांचे बिरडे करण्यात आले. निनावं, शेवळाची कणी, वांगी-सोडा, पुरणाची तेलपोळी, कोलंबीची खिचडी, पुदिना घालून केलेली तीन थरांची बिर्याणी – त्यात नारळाचं दूध हवंच हं. कटाची आमटी, वडीचं सांबारं, बोंबलाची भजी, पापलेटची कटलेटस्, तळला मसाला घातलेली मसूरची आमटी यातलं काय काय होतं कळू शकलं नाही. जेवायला बोलावलेला पाहुणा सर्वभक्षक काळ आहे ही आमची सैद्धांतिक भावना असते. एखाद्या मगरीप्रमाणे त्यानं एकापाठोपाठ एक पदार्थ गिळत सुटावेत अशी आमची अपेक्षा असते. वर मगरीनं म्हणायला हवं, ‘शेवळाची कणी कशी करतात हो?’…

सी. डी. देशमुखांनी म्हणे बिरडं ओरपून प्यायलं. ते काही ‘अग्ग बाई सासूबाई’मधल्या आसावरीनं केलेलं बिरडं नव्हतं. तिला आदल्या दिवशी वाल भिजत घालण्याचीही गरज भासली नव्हती. विशेष म्हणजे राजे हे सी.के.पी. आडनाव लावणाऱया आमच्या डॉ. गिरीश ओकांनाही ते बिरडं उत्तम लागलं होतं. जशी करणारी, तसा खाणारा. सी.के.पी. बायकांना बोलवा ना चाखायला. त्यांनी ते मोरीत ओतून टाकलं असतं-मोरीची हरकत नसेल तर. भांडय़ाच्या तळाशी असलेलं रसरशीत वालाचं बिरडं! यांनी बोंबिल तळले असते तर ते चकलीसारखे नाही तर शेवेसारखे दिसले असते. ज्याचं काम त्यानं करावं, बिजा करे सो गोता खाय…

सी.के.पी. गृहिणींचं पाकनैपुण्य ही काळाच्या कसोटीवर उतरलेली वादातीत गोष्ट आहे. कायस्थांकडे जेवायला गेलो व तोंडात मारून घेत परत आलो, असं संभवतच नाही. लावता चॅलेंज? म्हणजे लगेच उठून आमच्याकडे जेवायला यायचं असं नाही हं. जरा हरबऱयाच्या झाडावर चढवलं की सी.के.पी. सुगरणी लगेच कंबर कसून कामाला लागतात. भरपूर हादडून झाल्यावर फक्त ‘वहिनी, तुम्हाला तोड नाही’ हे परवलीचे शब्द उच्चारायचे. वहिनी चेकाळून लगेच म्हणतात, ‘उद्या या, खिमा पॅटिस करते.’

बायकोचे श्रम, नवऱयाचं दिवाळं!

एकेकाळी हिंदुस्थानी क्रिकेट संघात एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच खेळाडू सी.के.पी. होते. काय म्हणणं आहे? (आता एकही का नाही, असले छिद्रान्वेशी प्रश्न विचारू नका.) सांगू नावं? नरेंद्र ताम्हाणे, सुभाष गुप्ते, दत्तू फडकर, हेमू अधिकारी व चंदू गडकरी. माझ्यावर अभ्यासाची सक्ती करण्यात आली नसती तर सहावा सी.के.पी. खेळाडू संघात आला असता. क्रिकेटही गेलं व शिक्षणही गेलं, हाती टाइपरायटर आला. तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात येसाजी कणेकर नावाचा एक शूर सरदार होता असं मी वाचलंय. याचा अर्थ सर्वच कणेकर माझ्यासारखे ढेरपोटे, डरपोक नसतात.

देवयानी चौबळनं सी.के.पीं.वर एक मोठा लेख ‘इलस्ट्रेटेड विकली’मध्ये लिहिला होता. त्यात तिनं एक मार्मिक निरीक्षण केलं होतं. सी.के.पी. माणूस कधीही वॉचमन, लिफ्टमन, झाडूवाला, भाजीवाला आढळणार नाही. सामाजिक व आर्थिक स्तरावर तो नेहमीच तोल सांभाळून राहात आलाय.

एक सोडय़ाची खिचडी करू तो दुनिया गुलाम हो जाय. म्हणूनच बहुसंख्य सी.के.पी. पुरुष त्यांच्या सहधर्मचारिणीचे गुलाम असतात. त्यांनी करायचं व यांनी हादडायचं. लवकरच ‘हादडे’ हे आडनाव सी.के.पीं.च्यात रूढ होईल.

सी.के.पी. मुली सहसा देखण्या असतात. देखण्या व सुगरण हे ‘डेडली काँबिनेशन’ आहे. ‘फिगर व नऊवारी’ आहे तसं. मिथिला पालकरनं डोक्यावरच्या जंगलाची मशागत केली तर तीही सुंदरच दिसेल. (पण जंगले वाचवा या मोहिमेची ती सूत्रधार का झाली?) नूतन व नलिनी जयवंत कशा होत्या? यंव रे यंव! मधुबाला व साधना सी.के.पी. का झाल्या नाहीत, हा मला छळणारा प्रश्न आहे. तसे दिलीपकुमार व लता मंगेशकर मला सी.के.पी.च असायला हवे होते म्हणा!

माझे वडील टेलिफोनवर स्वतःची ओळख करून देताना, ‘डॉ. काणेकर हिअर’ असे म्हणत.

अखेर एक दिवशी मी त्यांना छेडले, ‘तुम्ही स्वतःला डॉ. काणेकर का म्हणता?’

‘अरे, कंटाळलो मी. मी कणेकर म्हणायचो, ते काणेकर म्हणायचे. शेवटी वैतागून मी म्हटलं काणेकर तर काणेकर काय फरक पडतो?’

‘फरक पडतो तर.’ मी चेव येऊन म्हणालो, ‘काणेकर सारस्वत, कणेकर सी.के.पी.’

‘अशी भानगड आहे काय?’ डॉ. कणेकर म्हणाले, ‘मिस्टर शिरीष, तुम्हीही सी.के.पी. का?’

इथे थिजला एक सी.के.पी.

माझ्या वडिलांना दोनच जाती-जमाती माहीत होत्या. डॉक्टर व पेशंट.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या