कुलू मनाली रे कुलू मनाली

>>शिरीष कणेकर

तसा विनायक पोंक्षे मला प्रथम कधी भेटला सांगता येणार नाही, पण मी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये असताना तो भेटायला आल्याचं मला अंधुक आठवतंय, आमच्याच ‘एक्सप्रेस टॉवर्स’मध्ये वर त्याचं ‘अॅडव्हर्टायझिंग’चं ऑफिस होतं. तो वाचक म्हणून आला होता. मी त्याला कँटीनमध्ये घेऊन गेलो. त्या काळी मी वाचकांची आवर्जून खातिरदारी करायचो. पुढला कधी येईल, येईल की नाही काय माहीत? पोंक्षेमधला वाचक कुठे गेला? (‘कुठे गेला तो लेखक?’ असं तो म्हणत असेल). एवढे ढीगभर वाचक पूर्वीही भेटायला यायचे व आजही येतात पण त्यांच्यातला मित्र केवळ पोंक्षे झाला आणि हो, उज्ज्वल वाडकर. पण तो माझा भक्त पुंडलिक आहे. प्राजक्ता माळी अतिसुंदर आहे त्यात गोड हे आलंच हे त्याच्या गळी उतरवण्यात मी यशस्वी झालोय. आता तो कुठून कुठून तिचे फोटो मिळवतो व मला पाठवतो. जणू मी मुंबईत तिच्या फोटोंचं प्रदर्शनच भरवणार होतो. आता सई ताम्हणकर, तेजस्वीनी पंडित व सोनाली कुलकर्णी (धाकटी पाती) या मराठीतल्या मधुबाला आहेत हे एकदा वाडकरच्या डोक्यात भरवलं की, तो माझा परमभक्त म्हणून ख्यातकीर्त होईल. मी शिष्यपरंपरा निर्माण करू इच्छितो. ‘आधी वाचक टिकव’ एक अज्ञात आवाज माझ्या कानात ओरडतो…

विनू भावजींचे (तो 377 की कुठला न्यायालयाचा सेक्शन अस्तित्वात येण्यापूर्वीचं हे लाडाचं नाव आहे) आणि माझे तात्काळ सूर जुळले. मैत्री झाली (लेखक-वाचक हे नातं तसं तकलादूच होतं). मैत्री वाढली, अधिक घट्ट झाली. प्यार किया नही जाता, हो जाता है! तशीच मैत्री केली जात नाही, होते. आमची झाली. एकमेकांकडे जाणं वाढलं. गप्पांच्या मैफली झडू लागल्या. या गप्पांमुळे आपली एनर्जीच नव्हे तर आयुष्य वाढतं असा आम्हा उभयतांचा रास्त ग्रह झाला.
आपलं व्यावसायिक नैपुण्य पणाला लावून त्यानं ‘एकला बोलो रे’ या माझ्या एकपात्रींचे अनुभव कथन करणाऱया पुस्तकाचं ‘कव्हर’ केलं. (अर्थातच फुकट). बघता क्षणी आवडावं असच ते ‘कव्हर’ होतं. पुस्तकाच्या पुढे तीन आवृत्त्या निघाल्या, पण ‘कव्हर’ बदलण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही.
तो माझ्या एकपात्री प्रयोगात ‘स्लाइडस्’ दाखवणं, त्या अनुषंगानं टेपरेकॉर्डरवर गाणी वाजवणं ही कामं हौसेनं करायचा. एकदोनदा त्यात गडबड झाली तर चेहरा पाडून, मान खाली घालून तो तिथून निघून गेला. त्याच्या ‘इन्व्हॉल्व्हमेंट’नं मी भारावलो होतो. माझा कार्यक्रम त्यानं आपला मानला होता. कारण मुळात मलाच त्यानं आपलं मानलं होतं.
‘माझी फिल्लमबाजी’च्या 91व्या प्रयोगाला ऋषी कपूर प्रमुख पाहुणा होता. नेमका पोंक्षे कोकणात गेला होता. मी एकटाच होतो. मला टेन्शन आलं होतं. परीक्षेच्या वेळी आपण नेहमीपेक्षा लवकर जेवतो व घास घशाखाली उतरत नाही, तसंच काहीसं माझं झालं होतं. मी मान खाली घालून तुकडे तोडत होतो तोच दारावरची बेल वाजली. मी उष्टय़ा हातानंच जाऊन दार उघडलं. समोर पोंक्षे. त्याला पाहून त्या क्षणी मला काय वाटलं मला सांगता येणार नाही. रत्नागिरी की चिपळूणहून तो थेट माझ्या घरी आला होता. अब किस चीज का डर? माझ्यात हत्तीचं बळ आलं. प्रयोग उत्तम झाला हे सांगायला नकोच. तो केला असेल मीच एकटय़ानं, पण मनोमन माझं हित चिंतणारं कोणीतरी पाठीशी आहे हा दिलासा मला पुरेसा होता. आयुष्यात नेहमीच मला हा दिलासा मिळाला नाही म्हणून मला त्याची किंमत आहे.
एकदा लता मंगेशकर माझ्याकडे आलेली असताना पोंक्षेनं ‘टूटे हुवे अरमानोंकी इक दुनिया बसाये’ या लताच्याच त्याच्या अत्यंत आवडत्या गाण्याची लकेर छेडत प्रवेश केला. समोर साक्षात लताला पाहून त्याचा पुतळा झाला. थांबावं की थांबू नये हेच बिचाऱयाला कळेना. मलाही काही सुधरेना. ‘काम आहे’ असं काहीतरी पुटपुटत तो पसार झाला.
‘‘हे काही लिहीत नाहीत ना?’’ लतानं मंजूळ आवाजात विचारलं.
‘‘नाही.’’ मी भसाडय़ा आवाजात म्हणालो, ‘‘तो चेकवर सहीदेखील करीत नाही.’’ अडचणीच्या वेळी विनोद कामाला येतो तो असा.
तो लिहीत नाही असं मी म्हणालो खरा, पण माझा कोथळा काढणारं एक पोस्टकार्ड त्यानं मला पाठवलं. त्याचं काय बिनसलं होतं, मी कुठं त्याच्या शेपटावर पाय दिला होता, मला कधीच कळलं नाही. आजही नाही. माझा पारा चढला. मीही त्याला ओरबाडणारं, बोचकारणारं, रक्तबंबाळ करणारं पत्र लिहिलं. मी लेखक असल्यानं माझं पत्र जास्त विषारी झालं असावं. आम्ही दोघंही दुखावलो व दुरावलो. आम्ही आपापल्या मुलांच्या लग्नालाही एकमेकांना बोलावलं नाही. जब रिश्तेही टूट गये तो तकल्लुफ किस बात का? पण जाणीवपूर्वक डायरीतील त्याचं नाव व नंबर मी खोडले नाहीत. किती मस्त आठवणी त्या नावाशी निगडित होत्या. मला त्याची व त्याच्या खुमासदार बोलण्याची सतत आठवण यायची. दारूचा घोट घशातून खाली उतरला की, कुंडलिनी जागृत होऊन तो अत्यानंदानं म्हणायचा- ‘कुलू-मनाली रे, कुलू मनाली’. त्याचा देहच नाही तर आत्मा थंड व्हायचा. असे असंख्य किस्से होते. त्याच्याकडेही माझे असतील का? नक्कीच असतील. आमच्या एका कॉमन डॉक्टर मित्राचा मी ‘ठाकुरद्वारची xx’ असा केलेला उल्लेख नुसता आठवला तरी त्याला असेल तिथं हसू लोटायचं.
आमचा दोघांचाही ताब आमच्या ‘इगो’ने घेतला होता. तो आम्हाला माणसासारखा वागू देत नव्हता, विचार करू देत नव्हता. ज्वालामुखी उसळला होता. लाव्हारस थंड होण्याचं नाव काढत नव्हता. अशी थोडीथोडकी नाहीत तर सतरा वर्षे गेली. आल्यागेल्यांना मी पोंक्षेचे किस्से सांगून हसवायचो. ‘कुठे असतात ते सध्या?’ असं ऐकणाऱयानं हसत हसत विचारले की, मी चाबकाचा फटका बसल्यागत गप्प व्हायचो.
अन् एके दिवशी मला त्याचा फोन आला. अत्यंत अनपेक्षितपणे काहीतरी फुटकळ काम होतं. जसा धागा तुटला होता तसाच सांधला गेला. आम्ही भेटलो. परत भेटलो. भरपूर बोललो. सतरा वर्षांचा ‘बॅकलॉग’ आम्हाला भरून काढायचा होता. मुळात हे काय तुटणारं नातं होतं का? पण हे आमच्या ‘इगो’ला कोण सांगणार? त्याला कुठे आमच्या भावभावनांची पर्वा होती? आजही तो ‘इगो’ पूर्णपणे रसातळाला गेलाय असं म्हणायला मी धजावणार नाही, पण तो आता इतका क्षीण, शक्तीहीन व निप्रभ झालाय की, तो आमच्या पुनरुज्जीवित मैत्रीत खो घालू शकणार नाही. म्हणा रे एकदा- ‘कुलू मनाली रे, कुलू मनाली…’
देवा, आता नवीन कोणाशी माझं फाटू देऊ नकोस बाबा. ते सांधण्याइतका वेळ माझ्याकडे नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या