
>> श्रीकांत आंब्रे
‘कर्कविज्ञानाची गोष्ट’ हे डॉ. आनंद जोशी व शेखर देशमुख या दोघांनी लिहिलेले हे पुस्तक कर्करोग अर्थात कॅन्सर हा आजार, त्यांचे नेमके स्वरूप आणि कर्कविज्ञानाविषयी उपयुक्त माहिती असलेले पुस्तक आहे. कर्करोगाचे निदान एखाद्याबाबत झाले की तो रुग्ण आणि त्याचे नातेवाईक हादरून जातात. या रोगाविषयी नेमकी माहिती मिळाली तर त्यांच्या मनाला दिलासा मिळतो. समाजामध्ये कर्कविज्ञानाबद्दल जितकी माहिती असायला हवी, तितकी ती नाही. त्याबद्दल अनेक गैरसमजही आहेत. त्यामुळे कर्कविज्ञान म्हणजे नेमके काय, ते कसे विकसित झाले, त्याचे सध्याचे स्वरूप हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
विज्ञानाचे स्वरूप हे पुराव्यावर आधारित आहे, हे गृहीत धरूनच सद्यःस्थितीतल्या ज्ञानानुसार, माहितीनुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात. त्यात त्रुटीही राहतात. अशा त्रुटी का राहतात, हे सामान्यांना कळणे महत्त्वाचे असते. म्हणजे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक उपचारांबाबत रास्त अपेक्षा ठेवतात. अशा वेळी योग्य माहिती मिळाली तर रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय, नातेवाईक यांचे मन स्थिरावायला मदत होते. ही केवळ कर्करोगाची जुजबी माहिती पुरवणारी तोंडओळख नाही, तर ही कर्कविज्ञानाच्या इतिहासातील काही निर्णायक क्षणांची रोमांचक गाथा आहे. या क्षणांनी, घटनांनी आणि त्या घडवणाऱ्या कर्तबगार संशोधकांनी माणसाच्या जगण्याला सुखकारक वळण दिले. कर्कविज्ञानाशी संबंधित संकल्पना आणि उक्रांतिकारी शोध सुबोध आणि रंजक भाषेत मांडणारे हे पुस्तक वाचून प्रत्येकाचे कर्करोगाबद्दलचे आकलन नक्कीच विस्तारेल.
कर्करुग्णाची कौटुंबिक पार्श्वभूमी, आनुवंशिकता, त्याची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, वैयक्तिक जीवनशैली, व्यसने, लठ्ठपणा, त्याला असलेले इतर विकार, बालपणापासून आतापर्यंत त्याच्या तब्येतीचा इतिहास यात कोठेतरी रुग्णाच्या या प्रश्नाचे उत्तर दडलेले असण्याची शक्यता असते. रुग्णाला आज झालेल्या रोगाची पाळेमुळे इतकी खोलवर असतात की या सगळ्याचा आढावा घेणे डॉक्टरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. कारण प्रत्येक रुग्णाची कथा वेगळी असते. पण त्यात, काही भेद आणि साम्य असतात. म्हणूनच डॉक्टरांच्या मते प्रत्येक कथा विज्ञानात भर टाकणारी असते. म्हणूनच या पुस्तकाचे स्वरूप त्यांनी रुग्णकथा आणि त्याला अनुसरून कर्कविज्ञान असे ठेवलेले आहे. वाचकांनी त्या नजरेने या कथांकडे पाहावे, असे लेखकद्वयीला वाटते. या विषयाची वैज्ञानिक माहिती डॉ. आनंद जोशी यांनी लिहिली आहे तर त्याबाबतच्या गोष्टी त्यांचे सहलेखक शेखर देशमुख यांनी सांगितल्या आहेत. यातील चित्तवेधक गोष्टी माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे, संयम, जिद्द आणि सृजनशीलतेचे विहंगम दर्शन घडवणाऱ्या आहेत. त्यातून कर्कविज्ञानाचा मानवी चेहरा वाचकांच्या नजरेसमोर येण्यास मदत होईल, ही लेखकांची आशा फोल ठरणार नाही,
या पुस्तकात कर्करोगाचे काल आणि आजचे स्वरूप या रोगाविरुद्धच्या लढाईचा इतिहास, या रोगाच्या घटकांचा मागोवा, कर्करोगाची विविध रूपे, युवराजसारख्या झुंजार क्रिकेटपटूने व काही प्रसिद्ध व्यक्तींनी या रोगांशी दिलेली निकराची झुंज ‘लिंफोमा डे’चे महत्त्व, कर्करोगाचे जनुकविज्ञान, हॉलीवूड तारका अँजेलिना जोली हिने संभाव्य कर्करोगापासून बचाव करण्यासाठी करवून घेतलेली दोन्ही स्तन काढण्याच्या शस्त्र्ाक्रियेची कहाणी, पुरुषांनाही होणारा स्तनांचा कर्करोग, कर्करोग आणि म्हातारपण, कर्करोगाची जीवोतक चाचणी, कर्कपेशींची घुसखोरी, कर्करोगाचे गुप्त अडते (दलाल) विषाणू, कोंबडय़ांना होणारा कर्करोग, कर्करोग आणि संप्रेरके, स्तनाचा कर्करोग आणि संप्रेरके, कर्करोगाची किमोथेरपी, किमोथेरपीचे उपप्रभाव, रसायनांची जादुई मात्रा, किरणोत्सारी उपचारांचे उपप्रभाव, कर्करोगाची प्रतिक्षमताकेंद्री उपचारपद्धती, जगाच्या दोन टोकांवर राहून कर्कविज्ञानात समांतर दिशादर्शी योगदान दिलेले अमेरिकेचे डॉ. जेम्स ऍलिसन आणि जपानचे डॉ. तासुको होंजो या किमयागारांची कहाणी यासारखी अनेक माहितीपूर्ण प्रकरणे या पुस्तकातील विषयाला परिपूर्ण करण्यास सहाय्य करतात. एरवी कर्करोगाच्या अंगाने चरित्र-आत्मचरित्र वा निव्वळ माहितीपर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र या पुस्तकाच्या लेखकांनी कर्कविज्ञानात झालेल्या संशोधनपर प्रगतीवर प्रकाशझोत टाकत मानवी प्रज्ञा-प्रतिभेचे दर्शन घडवणाऱ्या संशोधन कथा मांडल्या आहेत. हा प्रयत्न रुग्णांना, त्यांच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
कर्कविज्ञानाची गोष्ट
लेखक ः डॉ. आनंद जोशी व शेखर देशमुख
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन
पृष्ठs ः 184, मूल्य ः रुपये 2




























































