मुद्दा – शासकीय रुग्णालयातील गैरव्यवस्थापन व रुग्णांची गैरसोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकृष्ण हरचांदे

महाराष्ट्रात शहर व ग्रामीण विभागात असलेल्या रुग्णालयातील रुग्णसेवेच्या स्थितीबाबत व रुग्णालयात येणाऱया रुग्णांना मिळणाऱया आरोग्य सेवेबाबत सातत्याने तक्रारी असून अलीकडेच उपचारांदरम्यान व रुग्णालयात दाखल झाल्यानंतर झालेल्या मृत्यूच्या घटना घडल्यानंतर या घटनेकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष वेधल्यानंतर व वृत्तपत्रातून आलेल्या बातम्यांनंतर प्रशासन पुन्हा एकदा जागे झाले असून यामध्ये अधिक सुधारणा करण्याबाबत प्रयत्न सुरू झाले.

महाराष्ट्रात ग्रामीण भागात लोकसंखेच्या आधारावर ग्रामीण रुग्णालये असून यामध्ये सर्वच व गंभीर आजारांवर उपचार होत नाहीत. कारण त्या रुग्णालयांत सर्वच आजारांचे डॉक्टर्स उपलब्ध नसतात हे समजण्यासारखे आहे, परंतु जे डॉक्टर्स उपलब्ध आहेत त्यांच्याकडून तरी उपलब्ध असलेली वैद्यकीय सेवा मिळावी ही रुग्णांची व ग्रामस्थांची मागणी रास्त आहे. शासकीय रुग्णालयांतील अस्वच्छता, पाण्याची व्यवस्था, बाथरूम व शौचालयातील अस्वच्छता यामुळे रुग्णाची होणारी गैरसोय लक्षात घेण्यासारखी बाब होय व या बाबीकडे त्या रुग्णालयातील प्रमुखांनी तातडीने लक्ष दिल्यास सुधारणा होणे कठीण नाही.

ही झाली ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालयांची अवस्था, परंतु शहराबरोबरच जिह्यात असलेल्या मेडिकल कॉलेज व रुग्णालयांची अवस्था तरी कुठे चांगली आहे? मेडिकल कॉलेज व रुग्णालय म्हटल्यानंतर त्या रुग्णालयात प्रत्येक आजारांचे विभाग असणे गरजेचे आहे. कारण तेथूनच भविष्यातील डॉक्टर्स घडत असतात/तयार होत असतात. मुंबई, नागपूर, पुणे या मोठय़ा शहरात असलेल्या मेडिकल कॉलेज व रुग्णालयांतील आज अनेक विभाग डॉक्टर्स नसल्याने सुरू नाहीत. त्या विभागातून होणाऱया मोठय़ा व आवश्यक त्या शस्त्रक्रिया व उपचार न झाल्याने अनेकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. मोठय़ा अपेक्षेने मोठय़ा आजारांवर उपचार करण्यासाठी मुंबईत येणाऱयांची संख्या अधिक असून मुंबईकरांनाही शासकीय रुग्णालयांत सर्वच आजारांवरील सेवा उपलब्ध नसल्याने अखेर आर्थिक स्थिती नसतानाही खासगी रुग्णालयात जावे लागते. विविध आजार व रोगांबाबत शासकीय रुग्णालयांत जे विभाग बंद आहेत अथवा जे विभाग पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत ते विभाग सुरू करण्याची व त्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी कुणाची?

आज मुंबईसारख्या शहरात शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालयातून सुरू असलेल्या विभागातून डॉक्टर यांच्याकडून दर्जेदार सेवा मिळते हे नाकारता येत नाही, परंतु रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही वॉर्डमध्ये असलेली अस्वच्छता, पाण्याची नसलेली व्यवस्था, बाथरूम व शौचालयातील अस्वच्छता, बेडवर असलेल्या बेडशीट्स, यामुळे रुग्णाची गैरसोय होते या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

रुग्णालयात प्रत्येक विभागात कमी असलेला स्टाफ ही लक्ष वेधून घेणारी बाब आहे, एखादा विभाग डॉक्टर्सअभावी बंद असल्यास त्या विभागात मानद डॉक्टर्स म्हणून खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना आणून तो विभाग सुरू करता येतो, परंतु त्यासाठी कुणी प्रयत्न करायचे? यापूर्वी मुंबईतील शासकीय रुग्णालयांतील काही विभागप्रमुख डॉक्टरांनी अनेक मानद डॉक्टरांना विनंती करून आपले विभाग सुसज्ज करून व चांगले उपचार उपलब्ध करून दिले व देत आहेत विशेषतः त्यांच्या विभागातील वॉर्डमधील स्वच्छता, बाथरूम व शौचालयातील स्वच्छता लक्ष वेधून घेणारी होती व आहे. रुग्णालयातील प्रत्येक विभागातील विभागप्रमुखांनी आपले विभाग सुसज्ज करणे, स्वच्छता राखणे याकडे लक्ष दिल्यास उपचारासाठी येणाऱया रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नक्कीच दिलासा मिळेल. शहरी व ग्रामीण भागातील रुग्णालयात ओपीडीमधील कामे कशी सुरू आहेत? लांबून उपचारांसाठी येणाऱया रुग्णांची गैरसोय होणार नाही याकडे त्या रुग्णालयाच्या प्रमुखांनी नेहमी लक्ष देऊन नियंत्रण ठेवल्यास रुग्णांना नक्कीच दिलासा मिळेल. शासकीय रुग्णालयात विनामूल्य आरोग्य सेवा मिळेल ही कल्पना करूच नये. सर्व तऱहेच्या रक्त तपासणीपासून ते एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्पॅन, एमआरआयपर्यंतच्या सर्व विविध तपासण्यांसाठी चार्ज आकारला जातो. मग वॉर्डमधील टापटीपपणा व स्वच्छता यांसारख्या सुविधा का उपलब्ध होऊ शकत नाहीत? शासकीय रुग्णालयांतील वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा रुग्ण दाखल झाल्याने संबंधित स्टाफवर कामाचा ताण पडतो हे जरी सत्य असले तरी क्षमतेपर्यंत दाखल असलेल्या रुग्णांची गैरसोय होणार नाही हेही लक्षात घेतले पाहिजे.

शासकीय रुग्णालयात मेडिकल बोर्डासमोर पाठविल्यास फिटनेस अथवा अनफिट प्रमाणपत्र मिळण्यास अथवा दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी घालावे लागणारे हेलपाटे व लागणारा कालावधी हा तर मोठा चर्चेचा विषय असून मनोरुग्ण विभागातून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टय़ा आवश्यक असणारे प्रमाणपत्र मिळण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागत असल्याचीही उदाहरणे आहेत. प्रशासनातील दिरंगाईच्या या कामाचा अनेकांना फटका बसत असून या कामात सुधारणा कधी होणार?