सन्मान अशोकपर्वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सोनम परब

हिंदुस्थानी चित्रपट क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ऊर्फ मामा यांना 19व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पीआयएफएफ विशेष पुरस्कार’ देण्यात आला. भूमिका कोणतीही असली, तरी त्यात काहीतरी नवीन प्रयोग करायचा आणि ती भूमिका लोकांच्या कायम स्मरणात राहील अशीच करायची ही मामांची खासीयत. प्रत्येक भूमिका अविस्मरणीय करणाऱ्या या अभिनयाच्या बादशहाला मिळालेला सन्मान प्रत्येक मराठी माणसाला अभिमानास्पद आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पीआयएफएफ) संचालक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी यंदाच्या ‘पीआयएफएफ विशेष पुरस्कारा’ची घोषणा करताच प्रत्येक मराठी मन रोमांचित झाले. हिंदुस्थानी चित्रपट क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार ज्यांना दिला जाणार आहे, ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे प्रत्येक मराठी माणसाला नेहमी आपल्या घरातील व्यक्तीच वाटत आले आहेत. कितीही विशेषणे दिली तरी अपुरीच पडतील हे ठाऊक असलेला मराठी चित्रपट रसिक अशोक सराफ यांना ‘मामा’ या दोन अक्षरांनी बांधतो आणि सराफ यांना मिळालेल्या अलोट प्रेमाचे प्रतिबिंब याच संबोधनात स्पष्ट दिसते.

भूमिका कोणतीही असली तरी त्यात काहीतरी नवीन प्रयोग करायचा आणि ती भूमिका लोकांच्या कायम स्मरणात राहील अशीच करायची ही मामांची खासीयत. ‘मामा’ हे लाडके नाव हीसुद्धा सराफ यांना मिळालेली प्रेमाची भेटच आहे. कोल्हापूरमध्ये चित्रीकरण करीत असताना कॅमेरामन आपल्या छोट्या मुलीला घेऊन सेटवर आला होता आणि त्याने मुलीला सराफ यांची ओळख ‘मामा’ अशी करून दिली होती. तेव्हापासून सेटवरचे आणि नंतर चित्रपट उद्योगातील सगळेच लोक त्यांना ‘मामा’ म्हणू लागले. 4 जून 1947 रोजी मुंबईत जन्मलेल्या सराफ यांचे मूळ गाव बेळगाव, परंतु वडिलांच्या व्यवसायामुळे ते मुंबईत आले. मुंबईतच शिक्षण घेतले. अभिनयाची आवड आधीपासूनच त्यांना होती; परंतु कोणत्याही मराठी माणसाप्रमाणेच शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नोकरी करावी असे मामांच्या वडिलांनाही वाटत होते. वडिलांचा शब्द मानून मामांनी बँकेत नोकरी पत्करली, परंतु नोकरी करत करत संधी मिळेल तेव्हा ते नाटकात भाग घेतच राहिले. ‘ययाती आणि देवयानी’ नाटकापासून त्यांनी अभिनय क्षेत्रातील वाटचालीचा श्रीगणेशा केला तर ‘दोन्ही घरचा पाहुणा’ त्यांचा पहिला चित्रपट ठरला.

मामांना कोणत्याही भूमिकेचे वावडे नाही. त्यांनी विनोदी भूमिका सगळ्यात जास्त केल्या हे खरे; परंतु जेव्हा गंभीर भूमिका केली तेव्हा प्रेक्षक अंतर्मुख झाले; हळहळले. त्यांनी खलनायकसुद्धा त्याच ताकदीने रंगवला. विनोदी अभिनेता ही त्यांची खरी ओळख आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीला तेच त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. 1980 च्या दशकात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याखेरीज मराठी चित्रपट असूच शकत नाही, अशी धारणा तयार झाली होती. यशाचे हुकमी एक्के असेच हे दोन विनोदवीर!

‘दोन्ही घरचा पाहुणा’मधून मामांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले असले तरी ‘पांडू हवालदार’ हा त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला. दादा कोंडके यांच्यासारखा लोकप्रिय विनोदवीर जोडीला असताना प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी भूमिका करणे हे मोठे आव्हान होते आणि मामांनी ते समर्थपणे पेलले. तेव्हापासून मामांची कारकीर्द उत्तरोत्तर बहरतच गेली.

‘कॅरिकेचर’ म्हणजे अर्कचित्र प्रेक्षकांसमोर उभे करणे याबाबतीत मामांचा हात धरणारा दुसरा अभिनेता आजमितीस तरी दिसत नाही. अर्कचित्रासाठी निरीक्षणशक्ती जबरदस्त असावी लागते. लकबींना गडद स्वरूप देऊन अशी पात्रे उभी करावी लागतात. प्रचंड एकाग्रतेने काम करावे लागते. एकदा पकडलेली लकब संपूर्ण चित्रीकरणादरम्यान कायम ठेवावी लागते. ही गोष्ट सोपी नाही. ‘धूमधडाका’मधील नवकोटनारायण यदुनाथ जवळकर किंवा ‘गुपचूप गुपचूप’मधील गोव्यातला प्रोफेसर ही काही ठळक उदाहरणे आहेत. निरीक्षणशक्ती आणि एकाग्रतेबरोबरच विनोदासाठी आवश्यक असणाऱ्या ‘टायमिंग’ आणि ‘प्लेसिंग’ या दोन्ही गोष्टी मामांकडे भरभरून आहेत. नवोदित अभिनेत्यांनी टायमिंग सेन्सचा अभ्यास करताना नेहमीच अशोकमामांना आदर्श मानले आहे.

टायमिंग चुकले की, विनोदाचा फज्जा उडतो आणि म्हणूनच ती तारेवरची कसरत असते. ‘अशी ही बनवाबनवी’मधील धनंजय माने असो वा ‘माझा पती करोडपती’मधला लुकतुके असो, या भूमिका अस्सल मराठी चित्रपट रसिकाच्या विस्मृतीत जाणेच शक्य नाही. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे ही नावे चित्रपटाशी जोडलेली असणे म्हणजे हमखास ‘हाऊसफुल’ची गॅरंटीच! मराठी चित्रपटसृष्टीला पडत्या काळात ज्यांनी खऱ्या अर्थाने सावरले अशी ही चार नावे होत.

अशोक सराफ हे मराठी चित्रपटातील सुपरस्टार आहेतच; परंतु हिंदी चित्रपटांतसुद्धा त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या. मराठी नाटकांमधील मामांचे योगदान कधीच विसरता येत नाही. ‘अशा चतुरस्र अभिनेत्याला पीआयएफएफचा मानाचा ‘विशेष पुरस्कार’ मिळणे तमाम मराठी जनांसाठी अभिमानास्पद आहे.