विशेष – दीपावलीचा सन्मान

>> सुनील हिंगणे

दीपावली हा भारतीय संस्कृतीच्या प्रकाशाचा मंगल सोहळा आहे. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश झाला आहे. युनेस्कोने घेतलेली ही नोंद जागतिक पातळीवर दीपावलीच्या सांस्कृतिक अर्थाला अधिक व्यापक करणारी आहे.

यंदाचे वर्ष भारतीय परंपरा, संस्कृती, हजारो वर्षांचा भारतभूमीचा इतिहास, समृद्ध व वैभवशाली वारसा या दृष्टीने ऐतिहासिक ठरले आहे. काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आठ गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ आता दीपावली या लोकोत्सवाचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.

भारतीय संस्कृती ही तेजाची उपासना करणारी आहे, प्रकाशाची उपासक आहे आणि दीप हा प्रकाशाचे प्रतीक आहे. हा केवळ उत्सव नाही, तर उत्सवांचे संमेलन आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा, भाऊबीज असे पाच उत्सव पाच विभिन्न विचारधारा एकत्र येऊन संमीलित झालेले असतात. प्रकाशाचे प्रत्येक रूप संस्कृतीची ओळख करून देणारे आहे. यापूर्वी युनेस्कोच्या यादीत कुंभमेळा, कोलकात्याची दुर्गापूजा, गुजरातचा गरबा, योग, वैदिक पठणाची परंपरा, रामलीला आदींना या यादीत स्थान मिळाले आहे.

दीपोत्सव हा सण आनंदाचा, उल्हासाचा, प्रसन्नतेचा, प्रकाशाचा उत्सव आहे. `तमह परिवृत्तम वेश्म यथा दीपेने दिप्यते’ अर्थात अंधाराने व्यापलेले घर जसे दिव्यामुळे उजळून निघते तसेच अज्ञानाचा, अविचाराचा, विकार-विकृतीचा मनामनातील अंधार घालवून शुद्ध ज्ञानाचा, शुद्ध विचारांचा उजेड निर्माण करणारा हा सण आहे. ज्ञानेश्वर माऊली एका सुंदर ओवीतून याचे वर्णन करतात. `सूर्ये अधिष्ठिली प्राची। जगा रणीवदे प्रकाशाची। तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।।’

अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया या काळाला दीपावलीचे पर्व म्हणतात. काही लोक कोजागिरी पौर्णिमेपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत दिवाळी असल्याचे मानतात. आपण प्रकाशाचे पूजक आहोत आणि नेहमीच अंधार नाकारला आहे. भारतीय संस्कृतीतल्या वेदातील पहिलेच वाक्य आहे `तमसो मां ज्योतिर्गमय’. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ही वाटचाल म्हणजेच दिवाळी होय. या सणाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा सर्वसमावेशक स्वभाव. हिंदू परंपरेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत पुनरागमनाचे प्रतीक असलेली दीपावली जैन धर्मात भगवान महावीरांच्या निर्वाण दिनाशी जोडली जाते. शीख, बौद्ध आणि आर्य समाजाच्या परंपरांमध्येही हा प्रकाशाचा, आत्मशुद्धीचा सण मानला जातो. देशभरातील विविध प्रांतांतील वेगवेगळ्या सणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱया आहेत.

अमूर्त सांस्कृतिक वारसा ही संकल्पना दगडधोंडे, वास्तू किंवा भौगोलिक स्थळांपुरती मर्यादित नाही. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या परंपरा, कौशल्ये, सामाजिक प्रथा, सण-उत्सव, लोककला आणि जीवनशैलीतील सामूहिक अभिव्यक्ती यांना ती केंद्रस्थानी ठेवते. तोंडी परंपरा, सादरीकरण कला, सामाजिक विधी व उत्सव, निसर्गाशी निगडित ज्ञान आणि पारंपरिक सण या पाच व्यापक क्षेत्रांत या वारशाचा विस्तार होतो. आज युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत सुमारे 140 देशांतील जवळपास 700 घटकांचा समावेश आहे. भारताचे स्थान त्यात लक्षणीय आहे. दीपावलीसह भारताच्या 15 परंपरांना प्रातिनिधिक अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे. येत्या काळात बिहारची छठपूजा या यादीसाठी प्रस्तावित असून हेही भारताच्या लोकपरंपरांची जागतिक दखल वाढत असल्याचे सूचित करते.

युनेस्कोची मान्यता सहजासहजी मिळत नाही. एखादी परंपरा सर्वसमावेशक असावी, समुदायाधारित असावी आणि केवळ एका गटापुरती मर्यादित नसावी ही त्यामागची मूलभूत अट आहे. काही वर्षांपूर्वी फ्रान्सच्या बॅगेट ब्रेड बनवण्याच्या पारंपरिक कलेचा यादीत समावेश करण्यात आला होता. त्यावेळी युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे अझुले यांनी बॅगेट ही फ्रेंच जीवनशैलीचे प्रतीक असून ती सामायीकरण आणि सौहार्दाचे प्रतीक आहे, असे सांगितले होते. दैनंदिन जीवनातील साध्या वाटणाऱया या परंपरेलाही युनेस्कोने मान्यता दिली आहे. याचे कारण ती `सामायिक जीवन पद्धती’चे प्रतीक आहे. जागतिकीकरण आणि संघर्षांनी ग्रस्त होत चाललेल्या जगात विविध समाजांची सांस्कृतिक स्मृती जपणे हे युनेस्कोचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच काही परंपरांना `तातडीच्या संरक्षणाची गरज’ असलेले घटक म्हणूनही ओळख दिली जाते.

दीपावलीच्या युनेस्को यादीतील समावेशामुळे पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि जागतिक उत्सुकता वाढेल हे निश्चित. त्याचबरोबर यातून पारंपरिक कलाकारांना शाश्वत उपजीविकेच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र या प्रािढयेत उत्सवाचा गाभा टिकवणे हेच आव्हान ठरेल.