मुद्दा – अग्नी सुरक्षेवर उपाय

576

>> सुनील कुवरे

मुंबईतील माझगाव परिसरात सोमवारी जीएसटी भवनात भीषण आगीचा भडका उडाला. त्याआधीही आगीच्या दुर्घटना घडतच होत्या. मागील महिन्यात राजधानी दिल्लीतील एका वसाहतीमधील पेपर कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 43 निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. हा कारखाना बेकायदेशीररीत्या चालवला जात होता असे समोर आले. आपत्तीनिवारणाच्या सक्षम उपाययोजना नसल्या की केवढा अनर्थ घडू शकतो याचे प्रत्यंतर दिल्लीतील घटनेने दिले. यापूर्वी दिल्लीतील ‘उपहार’ चित्रपटगृहात चित्रपट पाहताना 59 जण जिवंत जळाले होते. 2016 मधील महाराष्ट्रात पुलगाव येथे दारूगोळा भंडारामध्ये लागलेल्या आगीत सुमारे वीस जणांचा मृत्यू झाला. दोन-तीन वर्षांपूर्वी केरळमध्ये एका मंदिराच्या आतषबाजीत शंभर भाविक मरण पावले. तसेच मुंबईत कमला मिलमध्ये लागलेल्या आगीत चौदाजण तर अलीकडे सुरत येथे नुकत्याच एका खासगी क्लासला लागलेल्या भीषण आगीत वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जेथे कारखाने, क्लासेस असतात त्या ठिकाणी सुरक्षेबाबत खबरदारी घेतली जाते. तरीही अशा घटना घडतात. म्हणजे आग लागली तेथे संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग नसणे, कामगारांच्या सुरक्षेची चिंता नसणे. जेव्हा अशा प्रकारचे भीषण प्रसंग निर्माण होतात तेव्हा सर्वजण खडबडून जागे होतात. आताही याची प्रचीती येत आहे. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली जाईल. परंतु नुकसानभरपाई देऊन प्राण परत आणता येत नाहीत. जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. कारण ही घटना अतिशय बोलकी आहे. आपत्ती ओढवल्यावर आपल्याकडे उपाययोजनांची सोय नसणे. आपत्ती नैसर्गिक असो की मानवनिर्मित त्यात कोणाचीही जीवितहानी होऊ नये. त्यासाठी अग्नी सुरक्षेवर ठोस उपाययोजना आवश्यक आहे. महाराष्ट्रातदेखील आग लागल्याच्या अनेक घटना घडत असतात. त्यादृष्टीने सुद्धा उपाययोजना आवश्यक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या