
>> तरंग वैद्य
आपल्या कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी आई-वडील काय करू शकतात, कुठल्या थराला जाऊ शकतात हे कथासूत्र असणारी ‘टब्बर’ ही मालिका. परिवारातील प्रेम, समाजमूल्यं याच्याभोवती कथेचं गुंफण करत ही रहस्यमयी मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली.
पंजाबी भाषेत परिवार किंवा फॅमिलीला ‘टब्बर’ म्हणतात. आपल्या टब्बरला संकटातून वाचवण्यासाठी आई-वडील काय करू शकतात, कुठल्या थराला जाऊ शकतात हे कथासूत्र घेऊन 15 ऑक्टोबर 2021 ला सोनी लिव्हवर ‘टब्बर’ याच नावाने 40-42 मिनिटांचे आठ भाग असणारी वेबसीरिज आली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
ओंकार सिंग पंजाब पोलीस सेवेतून निवृत्त झाला असून आपल्या बायको आणि दोन मुलांसह समाधानी आयुष्य जगत असतो. त्याचा मोठा मुलगा हाप्पी बाहेरगावाहून परत येतो. घरी आल्यावर त्याला कळतं की, त्याच्या बॅगेची अदलाबदल झाली आहे. त्यात त्याला अमली पदार्थ दिसतात, ज्यामुळे तो हादरतो. पुढे ज्याची ती बॅग असते तो महिप, बाग परत घेण्यासाठी ओंकारच्या घरी येतो. इथे त्यांची बाचाबाची होते आणि ओंकारच्या मुलाच्या हातून गोळी झाडली जाते आणि आलेल्याचा मृत्यू होतो. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी ओंकार मृत शरीराची विल्हेवाट लावतो. पण महिप शहरातील एका बडय़ा नेत्याचा भाऊ असल्यामुळे केस ‘हाय-प्रोफाईल’ होऊन जाते. महिपचा शोध जोरात सुरू होतो. ज्याला कोणाला काही धागादोरा सापडला असं ओंकारच्या लक्षात आलं की, तो त्यालाही मारून टाकतो आणि खुनांची मालिका सुरू होते.
कथेत रहस्य आहे, रोमांच आहे, रक्तपात आहे, ओंकारचं कृत्य चुकीचं आहे हे समजूनही प्रेक्षक मात्र त्याच्या बाजूने उभा असतो. प्रत्येक प्रसंग घडताना ओंकार यातून वाचावा असंच प्रेक्षकांना वाटत राहतं. कारण प्रेक्षकांनाही दिसत असतं की, हा साधाभोळा माणूस आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी हे सर्व करत आहे. कथेची गुंफण करताना परिवारातील प्रेम, समाजमूल्यं जपणारी दृश्यं आहेत, मैत्रीचे प्रसंग आहेत, पंजाबात अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांबद्दल भाष्य आहे आणि राजकारणाचा प्रभाव दाखवणारी दृश्यंही आहेत. ज्यामुळे सर्व आठ भाग आपल्याला पकडून ठेवतात. ‘रिमोट’च्या जमान्यात रिमोटकडे लक्ष न जाणं म्हणजे वेबसीरिज उत्तम असल्याची ही पावती नाही का!
कथा तर उत्तम आहेच, पण ती साकारणारे कलावंतही तेवढेच उमदीचे आहेत. पवन मल्होत्रा, हे टीव्ही, चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव, टीव्ही जेव्हा बाल्यावस्थेत होता तेव्हापासून त्यांचा तिथे वावर आहे. ऐंशीच्या दशकातील ‘ये जो है ज़िन्दगी’, ‘नुक्कड’सारख्या गाजलेल्या मालिकांपासून त्यांचा यशस्वी प्रवास सुरू आहे. ‘टब्बर’ची संपूर्ण कथा त्यांच्या अवतीभवती फिरते. आणखी एक मोठं नाव सुप्रिया पाठक त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या अभिनयाची ताकद सगळ्यांनाच माहीत आहे. पवन आणि सुप्रिया दोघांनी आपापल्या भूमिकेत जीव ओतला आहे. मालिकेतील शेवटचा प्रसंग अंगावर शहारे आणतो आणि आपल्याला रडवतोही. आपल्याला रडवत असतानाही अनेक वेळा उत्कंठा वाढवणारी दृश्यंही दोघांनी तेवढय़ाच ताकदीने निभावली आहेत.
पवन-सुप्रियाच्या मुलांच्या भूमिकेत गगन अरोरा आणि साहिल मेहता आहेत. दोघांचे काम छान आहे. कंवलजित सिंग आणि रणवीर शौरीसारखे नामवंत अभिनेतेही दिलेल्या भूमिकेत चपखल बसले आहेत.
असे म्हणतात की, पहिल्यांदा वाईट गोष्ट करताना खूप धाडस लागतं. पण एकदा का ती केलं की, भीड चेपते. हेच ‘टब्बर’चे कथाबीज आहे. नकळत झालेली हत्या आणि ते सत्य लपवण्यासाठी हत्यांची मालिका दाखवताना दिग्दर्शकाने या बाबीवर लक्ष दिलं आहे. अभिनेत्यांकडूनही तशाच पद्धतीचा अभिनय करवून घेतला आहे. परिवारातील नाती किती घट्ट विणलेली आहेत हे दाखवताना दिग्दर्शकाचं कसब दिसून येतं.
कथा पंजाब प्रांतात घडते. त्यामुळे पंजाबी भाषेचा बऱयापैकी वापर केला आहे. त्याने प्रसंगांना उठाव आला आहे. भाषेमुळे अडचण किंवा न समजणं असं अजिबात होत नाही. उलट हिंदीबरोबर एका दुसऱया भाषेचे मिश्रण ऐकताना छानच वाटतं आणि आपण पंजाबमध्येच आहोत असं वाटतं. परिवारातील एकोपा, नीतिमूल्यं दाखवणारी ही मालिका आपण जरूर बघा आणि हो, आपल्या ‘टब्बर’सोबत बघा. =
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)





























































