‘स्थान’ माहात्म्य- संगमेश्वर माहात्म्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

‘कर्णेश्वर’ हे शिवालय कसबा संगमेश्वर येथे वसलेले आहे. नद्यांच्या संगमावर वसलेले म्हणून ‘संगमेश्वर’ हे नाममाहात्म्य लाभलेला हा प्रांत आपली मूळ ओळख चालुक्य घराण्यापर्यंत निर्माण करणारा आहे. या परिसराचे स्थानमाहात्म्य ‘संगमेश्वरमाहात्म्य’ या ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगा माथ्याशी घेत समुद्राच्या लाटांसोबत पावले भिजवून निवांत पहुडलेला कोकणप्रांत आपले ‘देवभूमी’ हे विशेषण सार्थपणे मिरवतो. जटेवरून खळाळत वाहणारी गंगा अंगप्रत्यंगावर वागविणारा शंभूमहादेव आणि बेलाग कडेकपाऱयांतून धो धो वाहणारा जलप्रपात आपल्या हिरव्याशार देहावर धारण करणारा कोकणप्रांत यांच्यात बऱयाच अंशी साम्य आहे असे वाटणे साहजिकच आहे. वैराग्य धारण करणारे शंभूमहादेव आणि जन्मजात वैराग्यवृत्ती धारण केलेला कोकणी माणूस हे आणखी एक साम्य तसेच पराकोटीची उदारता व तत्त्वनिष्ठsचे पालन करण्याचा जबर अट्टहास ही शिवशंकरांमधील प्रमुख वैशिष्टय़े कोकणवासीयांच्या उपजत वृत्तीतही तीव्रतेने जाणवतात.

म्हणूनच की काय, हिंदुस्थानातील विविध प्रांतांतील शैवसांप्रदायिक रूपके कोकणामध्ये वेगळा बाज घेऊन अवतरतात. येथे प्रत्येक गावाचे ‘आराध्य दैवत’ असणारे शंभूमहादेव स्वतंत्र रूपस्वरूप आणि आख्यायिकांचे अद्भुत वलय घेऊन आपल्यातील ‘मूळ’तत्त्वाचा वेगळेपणा सर्वत्र प्रकट करताना दिसतात. बहुसंख्य शिवस्थानांचा उगम हा कुण्या गुराख्याची गाय जंगलात वा डोंगरकपारीत, झाडाझुडपात आपला पान्हा सोडत असे व तिच्यापाठी पाळत ठेवून असलेल्या गुराख्याने गोमातेच्या अपरोक्ष जात ते स्थान पाहिले असता त्याला तिथे शिवपिंडी आढळून येत असे. पुढे त्याजागी असलेले श्रीशिवशंकराचे स्वयंभू स्थानमाहात्म्य मान्य करून ग्रामस्थ त्याला आपले ग्रामदैवत मानीत असत. हे ग्रामदैवत पुढे त्या गावाचे रक्षणकर्ते, तारणहार होऊन त्या गावाला आपली ओळख बहाल करते झाले.

अन्य काही ठिकाणी वनवास किंवा अज्ञातवासादरम्यान सर्वदूर भ्रमंती करणाऱया पांडवांनी केवळ एका रात्रीत बांधून काढलेल्या देवस्थानांची आख्यायिका सांगितली जाते. त्यासोबतच अर्धवट बांधलेल्या अवस्थेतील मंदिराविषयी पांडवांनी रात्री सुरू केलेले मंदिर बांधकाम पहाटे पूर्ण न झाल्याने तसेच अर्धवट सोडून त्यांना पुढे जावे लागले, अशी कथा सांगण्यात येते. वनवासपर्वात पांडव सर्वत्र सर्वदूर भ्रमण करीत असल्याच्या नोंदीवरून या कथा ग्राह्य धरल्या जातात. कोकण प्रांतातही अशाच कथा व आख्यायिकांमधून निर्माण झालेली अनेक पूर्ण किंवा अपूर्ण मंदिरे पाहावयास मिळतात. मात्र प्राचीन आख्यायिकांचे संदर्भ ज्या देवस्थानांना लागू होतात त्यात बहुतांश ‘शिव’ मंदिरे पाहावयास मिळतात. कोकणप्रांताच्या संगमेश्वर तालुक्यातील श्रीदेव मार्लेश्वरांच्या देवस्थानासह कसबा संगमेश्वर, कर्णेश्वर, आमनायेश्वर, टिकलेश्वर, खडगेश्वर अशी अनेक पुरातन मंदिरे या प्रांताचे रक्षण करीत भक्तकल्याणार्थ उभी ठाकल्याचे दिसून येते.

मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण किनारपट्टी या दोहोंच्या मध्यावर वसलेल्या संगमेश्वर तालुक्याची प्रसिद्धी चिपळूण किंवा रत्नागिरी इतकी झाल्याचे दिसत नाही. वास्तविक पाहता शास्त्र्ााr नदीचे सानिध्य, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, डोंगरसदृश भूभाग, वळणावळणाचा रस्ता, गर्द वनराई, बेलाग डोंगरकडे, गरम पाण्याची कुंडे, प्राचीन मंदिरे, अमाप जैवविविधता, विविध जातीप्रजातींचे पशुपक्षी अशा श्रीमंती निसर्ग वैभवामुळे संगमेश्वर तालुका कोकणप्रांतात महत्त्वाचे स्थानमाहात्म्य राखून असला तरीही चिपळूण, रत्नागिरी तालुक्यांच्या तुलनेत काहीसा मागे असल्याचे दिसून येते. पर्यटनाच्या दृष्टीने संगमेश्वर तालुक्यामध्ये उत्तमोत्तम क्षेत्रस्थानांची रेलचेल आहे परंतु सार्वत्रिक औदासीन्यामुळे हा प्रांत झाकोळला गेला असावा असे वाटते. प्राचीनकाळी ‘महत्त्वाचे बंदर’ म्हणून प्रसिद्ध असलेला संगमेश्वर तालुका येथील खाडीपरिसर ओसरल्याने, जलवाहतूक बंद झाल्याने तसेच इथल्या जंगल परिसरात वणवे लागण्याचे प्रसंग वारंवार घडत राहिल्याने दुर्लक्षित राहिला. ब्रिटिशकाळात येथील अधिकाऱयांनी सरकारी कचेऱया व तालुका मुख्यालय जवळच असलेल्या देवरुख येथे हलविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे संगमेश्वर हा तालुका असला तरी त्याचे मुख्यालय मात्र ‘देवरुख’ येथे झाले.

नद्यांच्या संगमावर वसलेले म्हणून ‘संगमेश्वर’ हे नाममाहात्म्य लाभलेला हा प्रांत आपली मूळ ओळख चालुक्य घराण्यापर्यंत निर्माण करणारा आहे. या परिसराचे स्थानमाहात्म्य ‘संगमेश्वरमाहात्म्य’ या ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे. ‘कसबा’ म्हणजेच मूळ गाव शास्त्री नदीला साक्षी ठेवून वरुणा आणि अलकनंदा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. ‘कर्णेश्वर’ हे प्राचीन शिवालय या स्थानाची ओळख बनले आहे.

‘कर्णेश्वर’ हे शिवालय मुंबई-गोवा महामार्गापासून तीन कि.मी. आत कसबा संगमेश्वर येथे वसलेले आहे. कोकणात शिल्पसमृद्ध मंदिरे फारशी नाहीत त्यामुळे ‘कर्णेश्वर’ मंदिर कोकण पर्यटनामध्ये अधिक महत्त्व राखून आहे. या मंदिराच्या निर्मितीची कथा पुढीलप्रमाणे आहे. चालुक्य घराण्यातील धनुर्धारी राजाला नाग, कर्ण आणि सिंघण या नावाचे तीन शूर व पराक्रमी पुत्र होते. यांचा मांडलिक राजा मारसिंह हा शिलाहार वंशातील होता. करवीर कोल्हापूर येथील श्रीकेदारेश्वराचे अप्रतिम देवालय पाहिल्यावर कर्ण राजपुत्राच्या मनात आपणही अशाच एका भव्य मंदिराची निर्मिती करावी असा विचार आला आणि त्याने कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर बांधणाऱया स्थापतीकडून अमाप पैसा खर्च करून श्रीशिवालय बांधून घेतले. कर्णराजाची ही अप्रतिम निर्मिती पुढे त्याच्या नावाने अर्थात ‘कर्णेश्वर’ म्हणून आजपावेतो दृढ आहे. काही अभ्यासकांच्या मते, कर्णराजाला अभिप्रेत असलेले हे ‘कर्णेश्वर’ मंदिर त्याकाळी 10000 सुवर्णमुद्रा खर्चून बांधण्यात आले होते.

पूर्वी या परिसरात 350 मंदिरे होती असे सांगितले जाते. सध्या संगमावर असलेले संगमेश्वर तसेच कसब्यातील सोमेश्वर, बेडेश्वर, कालभैरव, कार्तिकेय, काशीविश्वेश्वर, सिद्धेश्वर आणि डोंगरावर असलेले सप्तेश्वर या मंदिरांसोबत नदीपलीकडे खंडोबा व टोळभैरव यांची मंदिरे पाहावयास मिळतात. ‘कर्णेश्वर’ शिवालय हे अंदाजे 400 चौरस मीटर फरसबंद आवारात काळ्या पाषाणातून घडवलेले आहे. चार फूट उंचीच्या जोत्यावर उभे राहिलेले हे शिवालय, वास्तुशिल्पसौंदर्याचा अप्रतिम नुमना मानले जाते. कोकणामध्ये शिल्पसमृद्ध मंदिरांची वानवा असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘कर्णेश्वर’ हे शिवालय का महत्त्वाचे ठरते याविषयी पुढील लेखामध्ये जाणून घेऊया.

[email protected]