पैसे देणारे वाघोबा… 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> यादव तरटे पाटील

वनाधारित पर्यटन व्यवसायात हळूहळू मोठे बदल झालेत. मानवहित जपताना जीवन देणाऱ्या जल, जमीन, जंगल व जैवविविधतेचा मात्र आपल्याला सपशेल विसर पडतो. वन्य प्राण्यांच्या बाबतीत आपण इतके निर्दयी झालो आहोत. व्याघ्र केंद्रित पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय. केवळ पर्यटनाच्या नावाखाली चाललेला हा गोरखधंदा अन् त्याचे अर्थकारण हे अनेक अंगांनी वाघाच्याच मुळावर उठलंय हे वास्तव नाकारून चालणार नाही.

अलीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात वनाधारित पर्यटन क्षेत्राचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सन 1966 मध्ये भारतीय पर्यटन महामंडळ तर 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. आता हिंदुस्थानच्या अर्थकारणात पर्यटनाचा हिस्सा वाढत आहे. व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने अन् अभयारण्ये यांनी आधुनिक पर्यटन व्यवसाय म्हणून भरारी घेतली आहे. हिंदुस्थान हा जगातील महत्त्वाच्या जैवविविधता असलेल्या देशात मोडतो. जगाच्या एकूण 8 टक्के जैवविविधता आपल्या देशात आहे. हिंदुस्थानात 105 राष्ट्रीय उद्याने, 50 व्याघ्र प्रकल्प तर 700 च्यावर अभयारण्ये आहेत. मध्य प्रदेशातील कान्हा, सातपुडा, बंदीपूर, पन्ना व पेंच, राजस्थानमधील रनथंबोर, उत्तराखंडमधील जिम कार्बेट, पश्चिम बंगालमधील बक्सा आणि महाराष्ट्रातील ताडोबा, पेंच, मेळघाट, सह्यान्द्री, बोर व नवेगाव नागझिरा आदी व्याघ्र प्रकल्प पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. विशेष म्हणजे एकटय़ा महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्याने, 6 व्याघ्र प्रकल्प, 50 अभयारण्ये व 14 संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. सहा राष्ट्रीय उद्याने व नरनाळा, वान, अंबाबरवा, उमरेड कराण्डला, देऊळगाव रेहेकुरी, भीमाशंकर, तानसा, कर्नाळा, ताम्हिणी, नान्नज, टिपेश्वर आदी अभयारण्यासकट सर्व जंगलामध्ये वनाधारित पर्यटनाचा पायंडा पडलाय. पर्यटन क्षेत्र हे फक्त थंड हवेची ठिकाणी केवळ हीच संकल्पना जनमानसात न राहता आता चित्र बदलले आहे.

वनाधारित पर्यटन व्यवसायात हळूहळू मोठे बदल झालेत. व्याघ्र केंद्रित पर्यटनाची दिशा निश्चित झाली, पण ज्या वाघाभोवती हे सर्व क्षेत्र उभं राहिलंय, त्या वाघोबाला याची पुसटशी कल्पनाही नसावी. एकीकडे आपण हिंदुस्थानी राज्य घटना ते थेट युनोच्या माध्यमातून वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संघर्ष करीत असतो. मानवी हक्क व त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील असताना कायदेशीर लढेही देतो. अशातून आपल्या पुढय़ात हवे ते पाडून घेतो. मानवहित जपताना जीवन देणाऱया जल, जमीन, जंगल व जैवविविधतेचा मात्र आपल्याला सपशेल विसर पडतो. वन्य प्राण्यांच्या बाबतीत आपण इतके निर्दयी कसे असू शकतो? केवळ पर्यटनाच्या नावाखाली चाललेला हा गोरखधंदा अन् त्याचे अर्थकारण हे अनेक अंगांनी वाघाच्याच मुळावर उठलंय.

सामाजिक माध्यमांवर आपण अनेक चित्रफिती व छायाचित्र पाहतो. पाच पन्नास जिप्सी वाहने, हौशी पर्यटक अन् छायाचित्रकारांचे मोठमोठाले संच अन् हा सगळा लवाजमा जणू आसुसलेलाच असतो. वाघाचे छायाचित्र घेण्यासाठी स्पर्धा लागली असते. कधी छायाचित्र घेतो अन् कधी समाजमाध्यमावर टाकतो, किती लाईक अन् किती कमेंटस् मिळवितो याची घाई झालेली असते. वाघ दिसताच हा संवेदनाहीन तथाकथिक पर्यटक संप्रदाय सगळे नियम मोडून वाघाचा पाठलाग करतो. वाघाला पाहण्याची लालसा इतक्या स्थरावर जाते की, गाडीचा अमर्याद वेग अन् त्यातून उडणारा धूर पाहताना अशा प्रवृत्तीची कीव आल्याशिवाय राहत नाही. काही दिवसांपूर्वी एक व्हायरल झालेल्या चित्रफितीत वाघोबा शिकार करत होता. जसं एकाला दिसलं त्यांनी सगळ्यांना बोलावून घेतलं. पाहता पाहता पंचवीसच्या घरात जिप्सी गाडय़ा एकत्र आल्या. वाघाला सुचेनासं झालं. वाघाने चक्क त्यांच्या समोर शिकार केलेलं हरीण रस्त्यावरून ओढत ओढत सुरक्षित ठिकाणी एका झुडपात नेलं. हे सगळं होताना पर्यटक आणि छायाचित्रकारांची झुंबड जमली. हा सगळा तमाशा बिनदिक्कतपणे चालला होता. पाच वर्षांपूर्वी नागपूरजवळील उमरेड कऱ्हाडला अभयारण्यात एक जिप्सी वाघाच्या इतक्या जवळ गेली की, वाघोबा आलेत आणि जिप्सीचा साइड ग्लास चाटू लागले. स्वारी इतक्यावरच थांबली नाही तर जिप्सीमधील एका बाईच्या हातालाही चाटले. काही दिवसांपूर्वी ताडोबातील एक वाघीण आपल्या पिल्लांना शिकारीचे धडे देत असताना एक जिप्सी त्यांच्याजवळ गेली. जिप्सी पाहताच वाघीण चिडली. अनुचित प्रकार घडणार तितक्यात चालकाने वाहन मागे घेतले. जर अशा ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण?

दि. 2 जून 2011 च्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परिपत्रकामध्ये संरक्षित क्षेत्रातील पर्यटनासाठी मार्गदर्शक सूचनावजा नियमावली ठरवून दिलेली आहे. जंगलाला साजेसे कपडे, वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही अशी छायाचित्र घेणे, वन्य प्राण्यांपासून किमान 15 मीटर अंतर ठेवणे, मोठय़ाने न बोलणे, प्राणी आराम करीत असताना त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, वाहनाची वेग मर्यादा पाळणे हे सर्व बंधनकारक आहे, मात्र पर्यटक, मार्गदर्शक व जिप्सी चालक हे वन विभागासमोर बिनदिक्कतपणे या नियमांची बहुतेक वेळा पायमल्ली होताना दिसते. टाळी एका हाताने वाजत नाही, नाण्याला दोन बाजू असतात. पर्यटक वाघ दिसलाच पाहिजे याचा हट्ट करतात. प्रसंगी जिप्सी चालक व मार्गदर्शक यांना आमिषही दिले जाते. पर्यटकांना वाघ दिसला तर आपल्याला अधिक पर्यटक मिळतील व रोजगार मिळेल हा विचार तर दुसरीकडे वन विभाग व त्यांचे कायदे याची सर्वच ठिकाणी अधिक प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. यात आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या व्याघ्र केंद्रित पर्यटनात मोठमोठाले हॉटेल व्यावसायिक उतरले आहेत. वाघोबाच्या दर्शनावर यांचे व्यवसाय अवलंबून आहेत. काही हॉटेल व्यावसायिकांना तर व्याघ्र संवर्धनाचा अधिकच पुळका येतो. व्याघ्र प्रकल्पलगत जमिनी घ्यायच्या, तिथे हॉटेलवजा रिसॉर्ट उभारायचे आणि स्वयंसेवी संस्था स्थापन करायची व त्याच्या आड आपला धंदा करायचा. आता तर नाईट सफारी अन् मचाण थ्रिलिंगच्या नावाखाली महसूल गोळा करण्याचा नवीनच जावईशोध लावलाय. आणखीनच कळस म्हणजे हे वाघांचे बारसे करण्याची प्रथा केवळ हास्यास्पद आहे. वाघाचे बारसे केले की सगळ्यांना सांगायला हे मोकळे. ‘माया’ आज इकडे दिसली. ‘मटकासूर’ आज तिकडे होता.

स्थानिक समुदायाला रोजगार, वन संवर्धनात स्थानिकांचं हातभार, वन विभाग व स्थानिक समुदाय यांच्यात समन्वय, मानव वन्य जीव संघर्ष कमी होण्यास मदत अशा व्यापक दृष्टीने वन पर्यटन सुरू झालेले असताना हे सर्व महत्त्वपूर्ण असताना, नेमकी इथेच दिशाभूल झालेली दिसतेय. एकूणच वन विभाग, स्थानिक समुदाय व वन पर्यटनातून मिळणारे उत्पन्न याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उपयोग होणे अपेक्षित असताना व्याघ्र पर्यटनाची दिशा भरकटली आहे. एकीकडे वाघाला मिळालेले अधिक महत्त्व व त्याभोवती असणारे अर्थकारण तर दुसरीकडे उपेक्षित असलेले वन्य जीवन अशा वेगळ्याच वळणावर हे पर्यटन येऊन स्थिरावले आहे. वाघाव्यतिरिक्त असलेले इतर वन्य जीव मात्र यामध्ये उपेक्षितच आहे. व्याघ्र केंद्रित पर्यटन अन् व्याघ्र केंद्रित संवर्धन अशा दोन्ही बाजूने इतर वन्य जीवन उपेक्षित आहे. वाघ जंगलाचा राजा आहे. अन्नसाखळीमध्ये शिखर प्रजाती म्हणून महत्त्वपूर्ण आहे, मात्र जंगलामधील ‘वाघ ते वाळवी’ अशी संपूर्ण अन्नसाखळीसुद्धा महत्त्वाची आहे. सस्तन प्राणी, पक्षी, साप व इतर सरीसृप, कीटक व फुलपाखरे, कोळी, नाकतोडे व इतर सूक्ष्मजीव असा जंगलातील अन्नसाखळीचा डोलारा उभा राहतो. त्या त्या परिसंस्थेच्या अन्नसाखळी व अन्नजाळ्यातील प्रत्येक सजीव महत्त्वाचा असतो, मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसते आहे. तरस, रानकुत्री, लांडगा, कोल्हा यासारखे मांसाहारी प्राणी, चौसिंगा, काळवीटसारखे शाकाहारी प्राणी मात्र संवर्धनाच्या चळवळीत मागे पडलेले दिसत आहेत. कारण पर्यटन व संवर्धन चळवळीचे मूळ अर्थकारणात दडले आहे.

वन विभाग व स्थानिक मार्गदर्शकांची भूमिका यात महत्त्वाची आहे. पर्यटकांना फिरवताना घ्यावयाची काळजी, शिस्त, वाघ व इतर जंगलातील जैवविविधतेला पर्यटन करताना त्रास होणार नाही हे पाहणे गरजेचे आहे. जंगलात येणाऱ्या पर्यटकाला वाघ पाहायचा असतो. व्याघ्र दर्शन झाले नाही तर तो हिरमुसला होतो. प्राणी, पक्षी, फुलपाखरे व वृक्षसंपदा यांचंही एक सुंदर विश्व दडलेलं आहे. व्याघ्र दर्शन न झाल्यास इतर जैवविविधतेबद्दल मार्गदर्शकांनी पर्यटकांना माहिती दिली तर येणारा पर्यटक नक्की आनंदी व समाधानाने घरी परतेल. केवळ जंगलातील वाघ व इतर प्राणी विश्वच महत्त्वाचं नाही तर पर्यटन व वन्य जिवांचा विचार करता पक्षी, सरीसृप, फुलपाखरे, कोळी व इतर वन्य जिवांचं विश्व अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. वन विभागाच्या अशा प्रयत्नांना वन मार्गदर्शक व पर्यटकांनी सहकार्य करून भविष्यातील आपले स्वकल्याण साधने अभाप्रेत आहे.

[email protected]
(लेखक वन्य जीव अभ्यासक आहेत.)