दिल्ली डायरी – उमा भारती नेमके काय करणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी  

 ‘‘पार्टी कार्यकर्ता के नाते में बीजेपी को वोट देने की अपील करनी पडती है. लेकिन वोट देना न देना आपके उपर है. बीजेपी को ही वोट देना चाहिये, ऐसा कही नही है,’’ असे म्हणत साध्वी उमा भारती यांनी सध्या खळबळ उडवून दिली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये उमा यांच्या लोधी समाजाची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. लोधी समाजाच्या मेळाव्यातच साध्वींनी भाजपविरोधात आरोळी ठोकली आहे. मध्य प्रदेशात वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे भाजपचे टेन्शन दुपटीने वाढले आहे. साध्वी उमा या पुनर्वसनाने समाधानी होतात की बंडाचा झेंडा फडकवत ठेवतात, यावर पुढची बरीच गणिते अवलंबून असतील.

मध्य प्रदेशच्या एकेकाळच्या फायरब्रॅण्ड भाजप नेत्या साध्वी उमा भारती गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात आहेत. राममंदिर उभारणीच्या आंदोलनात त्यांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. सुंदरलाल पटवा व कैलाश जोशी यांच्यानंतर त्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या खऱ्या, मात्र हे पद औटघटकेचेच ठरले. शिवराजमामांनी त्यानंतर मध्य प्रदेश व भाजपच्या सत्तेवर मांड ठोकल्याने उमा भारती तशा अडगळीतच पडल्या. मात्र संघपरिवाराने त्यांचे 2014 मध्ये राजकीय पुनर्वसन केले. त्यांना केंद्रात मंत्री केले. स्वच्छ गंगा अभियानाचे महत्कार्य त्यांच्याकडे सोपविले. मात्र स्वच्छ गंगा अभियान ही निव्वळ जुमलेबाजी आहे, लोकांना सपशेल मूर्खात काढले जात आहे, असे आपल्या स्वभावानानुसार फटकळपणाने उमा यांनी सांगितल्याने त्यांना बाजूला केले गेले. उमा यांचे बंड लोकसभेचे तिकीट व राजकीय पुनर्वसनासाठी आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

एकीकडे दारूच्या धोरणावरून शिवराजमामांना त्राही भगवान करायचे आणि दुसरीकडे लोधी समाजाच्या मेळाव्यात भाजपला मत देणे तुमच्यासाठी बंधनकारक नाही, असे स्पष्टपणे सांगत भाजपचे टेन्शन वाढवायचे, असा पेच उमा भारती सध्या टाकत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे प्रीतम लोधी नावाच्या लोधी समाजाच्या एका नेत्याने मध्यंतरी उच्चवर्णीयांविरोधात टिकाटिप्पणी केल्याने त्यांची भाजपतून हाकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता या प्रीतम यांच्या माध्यमातूनच उमा भारती लोधी समाजाचे कार्ड खेळत आहेत. वास्तविक एकेकाळी हिंदुत्वाच्या ‘फायरब्रँड’ नेत्या असलेल्या उमा भारती यांनी अशा पद्धतीने जातीय राजकारणावर उतरावे ही अधोगतीच म्हणावी लागेल! मध्य प्रदेशात लोधी समाजाच्या मतांचा टक्का मोठा आहे. त्यातच शिवराज सरकारविरोधात असलेली अँटीइन्कबन्सीदेखील आहे. शिवाय मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये आतूर असणारे सतराशे साठ दावेदार. त्यामुळे एकंदरीतच मध्य प्रदेशची निवडणूक भाजपसाठी सत्त्वपरीक्षा पाहणारी असेल. पुन्हा शिवराज हे सत्तेतून बेदखल होणार असतील तर दिल्लीकरांसाठी सुंठीवाचून खोकला जाण्यासारखे होणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात विलक्षण गुंतागुंत होऊ शकते. समजा विधानसभा गमावली तरी पुन्हा लोकसभेला पक्षाची कामगिरी उंचावणे हेही मोठे आव्हान भाजपपुढे असेल. त्यामुळे दिल्लीकरांचीही दुहेरी कोंडी झाली आहे.

‘राजकीय’ बेरोजगार

गुजरातच्या निवडणुका पार पडल्या. भूपेंद्रभाई पटेल हे दुसऱयांदा मुख्यमंत्री झाले. त्याचा फाफडा जिलेबी भाजपाई मंडळीने आनंदाने खाल्ला. मात्र हा फाफडा जिलेबी गुजरातमध्येच राजकीय बेरोजगार झालेल्या मंडळींच्या काही केल्या घशाखाली उतरेनासा झाला आहे. ‘आपले पुढे काय?’ हा सर्वांच्याच पुढचा प्रश्न आहे. गुजरातच्या निवडणुकीपूर्वीच अनपेक्षितपणे दिल्लीकर जोडीने विजय रूपाणींसह त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळच बदलून कोणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या भूपेंद्र पटेलांसह नवेकोरे मंत्रिमंडळ आकाराला आणले. त्याचा अर्थातच फायदा भाजपला झाला. 27 वर्षांची अँटीइन्कबन्सी असतानाही भाजपला विजय मिळाला. तेच ते चेहरे देण्याऐवजी भाजपने वेगळे चेहरे दिले. हीच बाब ‘गेम चेंजर’ ठरली. मात्र आता या प्रकियेत भरडल्या गेलेल्या दिग्गज नेत्यांसमोर आपण आता करायचे काय? असा एक नवाच प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील, माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, सौरभ पटेल या राजकीय दिग्गजांपुढे राजकीय बेरोजगारीची मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. यापैकी पाटील यांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय बेरोजगारीच्या कचाटय़ातून ते सुटणार असले तरी इतरांचे काय? मुळातच गुजरातमधल्या दुसऱ्या कोणा नेत्याला गरजेपेक्षा फार मोठे होऊ द्यायचे नाही, असे दिल्लीकरांचे धोरण आहे. त्यामुळे आनंदीबेन पटेल यांचा अपवाद वगळता इतरांचे राजकीय पुनर्वसन झालेले नाही. रूपाणी आणि दोन पटेलांचे वय राज्यपाल होण्याएवढेही झालेले नाही. त्यामुळे आता काय करायचे, हा प्रश्न या नेत्यांपुढे आहे.

सच्चा समाजवादी

शरद यादवांच्या निधनामुळे देशाने राम मनोहर लोहिया व जयप्रकाश नारायण यांच्या मुशीत तयार झालेला एक सच्चा समाजवादी गमावला. शरद यादवांच्या व्यक्तिमत्त्वावर मधु लिमयेंचा मोठा प्रभाव होता. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या झुंजार नेत्यासोबत त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. ‘रोम मे पोप और मधेपुरा मे गोप’ हा गर्विष्ठ नारा देणाऱ्या लालू यादवांना शरदबाबूंनी 1999 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत केले. मध्य प्रदेशात जन्मलेल्या शरदबाबूंसाठी बिहार ही कर्मभूमी ठरली. लालू यादवांना त्यांनीच मुख्यमंत्री बनवले; तर लालू यादवांचा भ्रष्टाचारी कारभार संपविण्यासाठी नितीश यांना महत्त्वाकांक्षेचे बळ याच शरद यादवांनी दिले. संसदेतील त्यांची भाषणे ही नेहमीच गाजली. बाकी स्वयंघोषित समाजवादी नेत्यांनी समाजवादी जपमाळ ओढत केवळ कुटुंबकबिल्याचे कल्याण केले. मात्र शरद यादव या तथाकथित समाजवाद्यांपेक्षा वेगळे नेते ठरले. त्यामुळेच की काय त्यांच्या आयुष्याची अखेर ही अत्यंत दुर्दैवी ठरली. दिल्लीत निवासासाठी एखादे घर मिळावे, यासाठी शरदबाबूंना खटपटी कराव्या लागल्या. त्यामुळेच शरदबाबूंच्या निधनानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी केलेल्या ट्विटवर उपेंद्र कुशवाह यांनी केलेली टिप्पणी अधिक महत्त्वाची आहे. सच्चे समाजवादी असलेल्या शरदबाबूंची अखेर दुर्दैवी झाली हे खरे असले तरी त्यांनी सच्चेपणा कधीच सोडला नाही. त्यामुळेच बाकी ‘यादवां’मध्ये शरदबाबू हे कायमच उजवे आणि प्रामाणिक नेते ठरले!

[email protected]