आपला माणूस – गजमित्र आनंद

>> शुभांगी बागडे

आपण ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटातून हत्तीविषयी नायकाला असलेलं ममत्त्व, त्यांच्यातली मैत्री पाहिली आहे. हत्तीबाबत आपल्याला लहानपणापासून आकर्षण असतंच परंतु या प्राण्याचं संवर्धन केलं जातंय का किंवा सध्या यांची संख्या झपाटय़ानं का कमी होत आहे, अशा गोष्टींशी आपलं देणंघेणं नसतं. मात्र काही लोक अशा प्राणीपक्ष्यांच्या संवर्धनाच्या वेडाने झपाटलेले असतात. त्यांपैकीच एक म्हणजे आनंद शिंदे. हत्तीचा खराखुरा मित्र असलेले आनंद यांचं जग हत्तींनी व्यापून टाकलं आहे.

पर्यावरणाविषयी आपसूक असलेलं प्रेम आणि त्यातून लागलेली फोटोग्राफीची आवड आनंद शिंदे यांना वृत्तपत्र छायाचित्रकार पेशापर्यंत घेऊन आली आणि याच वाटेने वळसा घेत आनंद शिंदे यांची वेगळी ओळख रुजवली. आनंद शिंदे यांना जग ‘द एलिफन्ट व्हिस्परर’ या नावाने ओळखते. आनंद मुळात छायाचित्रकार. याबरोबरच भटकंतीची खूप आवड. वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करत असताना हिंदुस्थानभर त्यांची भ्रमंती होत असे. अनेक वृत्तपत्रांतून त्यांची छायाचित्रं प्रसिद्ध होत. यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले. केरळमधील कलरीपयट्टू आणि कथकली या कलाप्रकारांवर फिचर स्टोरी करण्यासाठी गेले असता तिथल्या त्रिचूर फेस्टिवलमध्ये त्यांनी पहिल्यांदा हत्तीचे फोटो काढले. उत्सवाची धामधूम असतानाही एका रांगेतील शिस्तबद्ध हत्ती पाहून आनंद यांना उत्सुकता निर्माण झाली. तिथे अनेक फोटो त्यांनी शूट केले. ज्यातून या महाकाय प्राण्याच्या कोमल हृदयाचे दर्शन झाले आणि आनंद आणि हत्ती यांच्यात वेगळे बंध निर्माण झाले.
तेव्हापासून आनंद यांनी हत्तीविषयी अभ्यास सुरू केला. हत्ती मित्रत्वाचं नातं कसं जपतात, वेगवेगळे आवाज कसे काढतात, ते मनातील भावना कशी व्यक्त करतात, ते गप्पिष्ट असतात, त्यांना बोलायला, मस्करी करायला खूप आवडतं, ते अगदी गंभीरपणे बोलणं ऐकतात, सहसा रागावत नाहीत अशा अनेक गोष्टी आनंद यांनी जाणून घेतल्या. हत्ती संवाद साधण्यासाठी जी हंमलिंगची भाषा वापरतो ती शिकण्याचा प्रयत्नही आनंद यांनी केला आणि आता सरावाने ती जमतेही. ते सांगतात, ‘हत्ती माणसांना खूप लळा लावतात. हत्तीच्या आकाराप्रमाणेच त्याचं मनही खूप मोठं असतं. हत्ती खरी माणुसकी जपतात’. अशीच एक कृष्णा हत्तीची आठवणही त्यांनी सांगितली. एक हत्तीचे पिल्लू होते कृष्णा. त्याचा पाय मोडला होता. कृष्णाला त्याच्या आईची आठवण येत होती. आनंद आणि या कृष्णामध्ये अतूट नातं तयार झालं होतं. आनंद कृष्णाशी संवाद साधू लागला की कृष्णाही कान हलवून प्रतिसाद देत असे. दीड महिन्यानंतर आनंद जेव्हा तिथून परतू लागले तेव्हा कृष्णा त्यांना सोडण्यास तयारच नव्हता. आनंद मुंबईला आल्यानंतर दोनच दिवसांनी कृष्णाचा मृत्यू झाला. प्राणी खरी ओढ लावतात हे शिकवणाराच हा प्रसंग आहे.

आनंद यांचा हत्तीविषयीचा ओढा जाणून त्रिवेंद्रम प्राणिसंग्रहालयाचे डॉक्टर जेकब अलेक्झांडर यांनी आनंद यांना हत्तीबाबत मार्गदर्शन केलं. पत्नी श्रियाच्या साथीने आपल्या नोकरीचा राजीनामा देत आनंद यांनी पूर्णवेळ हत्तींसाठी काम करण्याचं ठरवलं. आनंद यांच्या सहभागाने `ट्रंक कॉल वाईल्ड लाईफ फाउंडेशन’ ही संस्था सुरू झाली. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही संस्था हत्तींसाठी काम करते. ही संस्था कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, महाराष्ट्र आणि गोवा येथे काम करीत आहे. हत्तींची कमी होणारी संख्या, हत्तींचं जतन, हत्तींशी संवाद, हत्तींचं नैराश्य यांच्यावर तिथं काम केलं जातं. हत्तीसाठीचे अनेक खेळ आनंद यांनी तयार केले आहेत.

हत्तींबरोबर काम करताना आनंद यांना विलक्षण अनुभव आले आहेत. आनंद सांगतात, ‘जगात दर 15 मिनिटाला कुठे ना कुठे तरी हत्तींचा मृत्यू होत आहे. हे असेच सुरू राहिले तर 2025 नंतर या भूतलावर हत्तीच नसेल अशी नोंद अभ्यासकांनी केली आहे. हे कोलमडणारं निसर्गचक्र वाचवायचं असेल तर हत्तींच्या जतन, संवर्धनाबत जागरूकता निर्माण व्हायला हवी.’ आनंद सारखं गजमित्र, निसर्गमित्र होत आपण प्रत्येकाने ही जाण जपली पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या