मराठीचे संवर्धन

772

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

महाराष्ट्र शासनाने दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा केल्याने आता कोणत्याही बोर्डामध्ये या विषयाबाबत  जागरुकता निर्माण होईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याअनुषंगाने आपली शासकीय यंत्रणा काम करीत असून राज्य शासन सर्वतोपरी पाठपुरावा करत आहे, पण त्यासाठी केंद्राचे काही निकष, त्यांची पूर्तता लवकरच होईल आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात खऱया अर्थाने मराठी भाषेचे संवर्धन व जतन करताना भाषेचा वापर आणि विकास अधिक व्यापक होणे गरजेचे आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचा वापर अधिक वेगवान व विस्तृत होऊ लागला आहे. तरीसुद्धा या माध्यमातून मराठीचा वापर अधिक व्यापक होऊ लागला तर अमराठी भाषिकांना आपली भाषा हळूहळू अवगत होऊ लागेल. मराठी भाषा अभिजात, सर्वमान्य होण्यासाठी दैनंदिन व्यवहार, शासकीय यंत्रणा, मातृभाषेतून शिक्षण याचा प्रसार व प्रचार झाला पाहिजे. भाषावार प्रांतरचनेमध्ये मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि बोलीभाषा म्हणून फार पूर्वीपासून ती प्रचलित आहे. मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा आधार आहे. अशा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही मराठी माणसाच्या जीवनातील अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या भाषेचा प्रसार, प्रचार करणे गैर नाही. कारण भाषा ही सरस्वतीची देणगी आहे. त्यामुळे प्रत्येक भाषेचा मान हा राखला गेला पाहिजे. आपण सर्वांनी मराठी आचरणात आणली. तर मराठी भाषा अधिक व्यापक होईल.

आपली प्रतिक्रिया द्या