
आजही आम्ही भेटलो की, पहिले वाक्य, ‘‘अरे काहीतरी नवीन करून बघू या’’ हे वाक्य मला दरवेळी एक अनामिक ऊर्जा देऊन जाते, सांगतोय अभिनेता विराजस कुलकर्णी.
मला आठवते बरोबर बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. शाळा संपली होती नुकतीच. शाळेचे गॅदरिंग असेल, कॉम्पिटिशन असतील मी सगळय़ांमधून नाटक करायचो. आमचा धमाल ग्रुप होता. शाळा सुटल्यावर तो ग्रुपही सुटला, विखुरला. करीअरमध्ये काय करायचे याचा विचार सुरू झाला. कलाक्षेत्राची आवड होतीच त्यामुळे लेखन, ऑनिमेशन अशा गोष्टी हळूहळू करून शिकायला लागलो होतो. मिहीर कुलकर्णी या माझ्या बालमित्राने मला ‘वी वॉन्ट चार्ली’ या नाटकात काम करायला बोलवले. तिथे मला सूरज पारसनीस, शिवराज वायचळ भेटले. जुजबी ओळखीचे रूपांतर गाढ मैत्रीत झाले. आमचे सूर जुळले, विचार जुळले. इम्प्रोवायझेशन करताना एकमेकांच्या कल्पना आवडायला लागल्या. नंतर आम्ही आमचे नाटक बसवायला घेतले. त्या नाटकाशी संबंधित सगळय़ाच बाबींमध्ये आम्ही सक्रीय सहभागी झालो. एक एक गोष्ट नव्याने समजत गेली. मित्रांची साथ होतीच आणि माझ्या आयुष्यातले मी पहिले नाटक लिहिले.
त्या प्रक्रियेत माझ्या या मित्रांनी माझ्यावरती दाखवलेल्या विश्वासामुळे मी या क्षेत्राकडे करीअर म्हणून गंभीरपणे पाहायला सुरुवात केली. जर त्याक्षणी त्यांनी तो विश्वास दाखवला नसता तर कदाचित आज चित्र वेगळे असते. स्वतःच्या खिशातले पैसे गुंतवून विराजस आपला मित्र आहे आणि त्याच्या गुणवत्तेवरती आमचा विश्वास आहे या त्यांच्या एका विश्वासू भावनेने मला हजार नाही, तर अगणित हत्तींचे बळ मिळाले. त्या विश्वासाच्या जोरावरच माझी वाटचाल सुरू झाली. अर्थात कुटुंबातील माणसांचा पाठिंबा आणि शुभेच्छा असतातच, पण ‘मैत्र’ नावाच्या नात्याची खुमारी काही औरच.
मी लिहिलेल्या पहिल्या हॉरर कॉमेडी नाटकाची नुकतीच आम्ही बारावी ऑनिव्हर्सरी साजरी करतोय. ‘थेट्रोन एंटरटेन्मेंट’चे यश साजरे करताना आम्ही आमच्या सर्वात जास्त गाजलेल्या सहा नाटकांचे प्रयोग करतोय. या एका तपामध्ये आमची वीस-पंचवीस प्रॉडक्शने केली. इतक्या वर्षांमध्ये इतकी कम्फर्ट लेव्हल आली आहे की, काम करताना एक वेगळीच मजा येते. दररोज आम्हाला आम्ही नव्याने उमगतो. सगळीच प्रॉजेक्ट सक्सेसफुल नाही झाली. काही फसली, काही अर्धवट थांबवावी लागली, तर काही सुरूच झाली नाहीत, पण एकमेकांच्या गुणवत्तेवरती असलेल्या गाढ विश्वासामुळे आम्ही आजदेखील सातत्याने काम करतोय. असे होते की, बाहेर काम करताना समोरच्या सहकलाकाराची कधी कधी केमिस्ट्री नाही जुळत, दिग्दर्शक काय सांगतोय ते आपल्यापर्यंत नाही पोहोचत किंवा आपले त्याच्यापर्यंत नाही पोहोचत अशा वेळेला प्रकर्षाने मला आमच्या मित्रांची आठवण येते. एकमेकांना गुणदोषासकट स्वीकारून हातात हात धरून पुढे चालत राहणे हे मला आमच्या ग्रुपमुळे कळले मला.
आजही आम्ही भेटलो की पहिले वाक्य, ‘‘अरे काहीतरी नवीन करून बघू या’’ हे वाक्य मला दरवेळी एक अनामिक ऊर्जा देऊन जाते. मागल्या वर्षी माझी पहिली फिल्म दिग्दर्शित केली होती ‘विक्टोरिया’ तेव्हा हेच सारे मित्र त्या चित्रपटाच्या प्रक्रियेत सक्रिय होते. म्युझिक डिझायनिंग विक्रांतने केले. पहिला कट मी त्यांनाच दाखवला, तेव्हा झालेला आनंद व माझ्याविषयी वाटणारा अभिमान त्यांच्या डोळय़ांतून ओसंडून वाहत होता. जो मला कुठल्याही मानांकन आणि नामांकनापेक्षा भारी वाटला. प्राइज, व्हॅल्यू या शब्दांच्या पलीकडले त्याचे मोल होत, आहे आणि राहील.
























































