
1992-93 ला रत्नागिरीमध्ये होणार्या स्टरलाईट प्रकल्पाच्या विरोधात एक जनआंदोलन उभे राहिले. या जनआंदोलनाचे नेतृत्व ऍड. केतन घाग यांनी केले. राजकरणविरहित असलेलं हे जनआंदोलन त्यांनी यशस्वी करून स्टरलाईट प्रकल्पाला गाशा गुंडाळायला लावला होता. या आंदोलनाबरोबरच एक ज्येष्ठ वकील म्हणून ऍड. केतन घाग यांची ओळख होती. नुकतेच त्यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. ऍड. घाग हे मूळचे चिपळूणचे होते. 1965 पासून त्यांनी चिपळूण कोर्टामध्ये वकिली सुरू केली. दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या वकिलीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. रत्नागिरीतील अनेक वकिलांना त्यांचे मार्गदर्शन होते. सर्वजण त्यांना काका या नावानेच संबोधत.
स्टरलाईट प्रकल्पाच्या विरोधात स्टरलाईट विरोधी समिती स्थापन झाली होती. त्या समितीचे अध्यक्षपद ऍड. केतन घाग यांनी भूषविले. त्यावेळी पर्यावरणतज्ञ डॉ. मयूर यांनी स्टरलाईट प्रकल्पविरोधी संघर्ष समितीला मार्गदर्शन केल होते. त्यामुळे हा लढा अगदी प्रबळ झाला होता. स्टरलाईट प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी ऍड.केतन घाग यांची अनपेक्षित निवड झाली होती. काही राजकीय पक्षाची मंडळी आपल्या राजकीय हालचाली करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचवेळी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन संघर्ष समिती विसर्जित करेन असा इशारा ऍड. घाग यांनी दिल्यामुळे हा लढा राजकारणविरहित सुरू राहिला. डिसेंबर 1993 मध्ये स्टरलाईट प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने महामोर्चा काढला होता. जिल्हाभरातून लाखो लोक रस्त्यावर आले. या आंदोलनाची दखल बीबीसीच्या वृत्तवाहिनीने घेतली होती. त्यामुळे हा लढा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. 31 डिसेंबर 1993 ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार रत्नागिरीत आले होते. त्यांनी स्टरलाईट प्रकल्पविरोधी संघर्ष समितीची भेट घेतली. त्यावेळी प्रकल्पाच्या सर्व परवानग्या रद्द करा आणि मगच चर्चा करा अशी भूमिका ऍड. केतन घाग यांनी स्टरलाईट प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या वतीने मांडली आणि त्यानंतर हा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा सरकारने केली. त्यावेळी स्टरलाईट प्रकल्पाच्या कामासाठी बाहेरून यंत्रसामग्री रत्नागिरीत येत होती. रत्नागिरीकरांनी गंजलेल्या यंत्रणेच्या खपल्या मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी जमा केल्या होत्या.






























































