लेख – अफगाणिस्तान : नार्को दहशतवाद कसा रोखणार?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

अफगाणिस्तानमधील ऑपियम दहशतवादी, तस्करी करणारे, क्राईम सिन्डिकेटद्वारे हिंदुस्थानातसुद्धा येत आहेत. गेल्या वर्षभराची आकडेवारी बघितली तर हजारो कोटी रुपयांचे ऑपियम, गांजा, चरस हे हिंदुस्थानच्या समुद्रामध्ये पकडले गेले. ड्रग्जवाले आशियातल्या देशांतसुद्धा जातात आणि तिथून वेगवेगळ्या मार्गाने ते हिंदुस्थानच्या आत प्रवेश करतात. असे मानले जाते की, नार्को टेरेरिझम किंवा अफू, गांजा, चरसचा दहशतवाद हा हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम सीमेवर असलेल्या पंजाब आणि कश्मीरवर याचा परिणाम मोठा आहे.

गेली 45 वर्षं अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे हिंसाचार सुरू आहे. हिंसाचाराची नावे आहेत – दहशतवाद, बंडखोरी, जगाच्या महाशक्तींची एकमेकाविरुद्ध चाललेली लढाई आणि जिहाद. या सगळ्यांना पैशाची गरज असते आणि हा पैसा वेगवेगळे देश वेगवेगळय़ा कारणांमुळे तिथल्या लढवय्या जमातींना पुरवतात. याशिवाय अफगाणिस्तान सरकारलासुद्धा मदत दिली जाते आणि त्यामधली पुष्कळशी मदत ही तालिबानच्या खिशात जाते. मात्र 45 वर्षांच्या हिंसाचाराचा सर्वात मोठा स्रोत आहे – ऑपियम अफू, गांजा, चरस, ड्रग्ज यामुळे मिळणारा पैसा. अमेरिका अफगाणिस्तानमध्ये 2001 मध्ये आली. त्यांनी तिथल्या सरकारला मदत केली. तरीपण अफूची शेती, त्याचे स्मगलिंग आणि व्यापार हा अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या सीमेवर नेहमीच चालू राहिला. महत्त्वाचे असे की, अफगाणिस्तानच्या जमिनीवर आणि वातावरणात उगवण्याकरता अफू सर्वात चांगले पीक आहे. कारण त्याला फारसे पाणी लागत नाही. शेत पिकवणे अशिक्षित शेतकरीसुद्धा करू शकतो. युनायटेड नेशन्स ऑफीस ऑन ड्रग्ज अँड क्राईमच्या माहितीप्रमाणे अफगाणिस्तानमधील 70 ते 80 टक्के शेती ही अफू, गांजा, चरस उगवून चालते. अफू हा तिथला सर्वात मोठा उद्योगधंदा आहे, नंबर दोन उद्योगधंदा आहे शस्त्रांची विक्री आणि नंबर तीन जिहादकरिता वेगवेगळ्या दहशतवाद्यांचे ट्रेनिंग. या सगळ्यामुळे मिळणाऱया पैशाचा हिंदुस्थानात दहशतवाद पसरवण्याकरिता वापर केला जातो.

या ‘ऑपियम’ उद्योगांमध्ये शेतकरी, त्यांना कर्ज देणारे व्यापारी, वेगवेगळ्या प्रयोगशाळेत या पिकाचे ड्रग्जमध्ये रूपांतर करणाऱया प्रयोगशाळा, त्यांचा व्यापार करणारे क्राईम सिंडिकेट अशी साखळी असते.

या साखळीत अफगाणिस्तान सरकारमधल्या महत्त्वाच्या व्यक्ती, सैन्यातले मोठे अधिकारी आणि इतर सामील आहेत. विकलेल्या ड्रग्जचे हवालामार्फत पैशामध्ये रूपांतर केले जाते. यामधला काही पैसा अफगाणिस्तानच्या सरकारलासुद्धा मिळतो, ज्याचा वापर काही क्षेत्रांमध्ये केला जातो. अफगाणिस्तानची लोकसंख्या दोन कोटींच्या आसपास आहे. युनायटेड नेशन्सच्या रिपोर्टप्रमाणे यामधील 31 दशलक्ष लोकसंख्या ड्रग्जचा वापर करते. ड्रग्ज अफगाणिस्तानमध्ये सर्वात महत्त्वाचा व्यापार आहे. 2020मध्ये 300 ते 400 मिलियन डॉलर्स इतके ड्रग्ज निर्यात केले असावे. ड्रग्जला अफगाणिस्तानच्या बाहेर पडण्याकरता अनेक मार्ग आहेत. यात इराण, पाकिस्तान, सेंट्रल एशियन रिपब्लिक आणि समुद्रमार्गे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. एका अंदाजाप्रमाणे 28 बिलियन डॉलर्स इतकी त्यांची किंमत बाहेर असावी.

हिंदुस्थानात ड्रग्ज येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ईशान्य हिंदुस्थानच्या जमिनी मार्गातून, खास तर म्यानमार आणि बांगलादेशमधून हे हिंदुस्थानात प्रवेश करतात. यानंतर वेगवेगळ्या मार्गाने हिंदुस्थानच्या मोठय़ा शहरांमध्ये ड्रग्ज पाठवले जाते. ईशान्य हिंदुस्थानातल्या सीमावर्ती भागात अनेक युवक ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. हिंदुस्थानच्या शहरांमध्ये ड्रग्ज घेण्याचे प्रमाण किती वाढले आहे हे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने सिद्ध केले आहे. क्राईम सिंडिकेट, व्यापाऱयांचे कुरियर, त्यातून त्यांना मिळणारा पैसा याचा वापर अतिशय पद्धतशीरपणे नार्को टेरेरिझमकरिता केला जातो. थोडक्यातच बॉम्बस्फोट किंवा शस्त्राच्या दहशतवादाचा हिंदुस्थानवर फारसा परिणाम झालेला नाही. त्यापेक्षा अफू, गांजा, चरसचा दहशतवाद हिंदुस्थानात वेगाने पसरत आहे.

नार्को टेरेरिझममुळे हिंदुस्थानी तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढून देशाचे अतोनात नुकसान होत आहे. याशिवाय दहशतवाद्यांना उत्पन्नाचे एक फार मोठे साधन मिळाले आहे. यामुळे दहशतवाद वाढण्यात मदत होते आहे. नशा आणि आनंदाच्या नावाखाली पार्टीत घुसखोरी केलेले ड्रग्ज दहशतवादाचे रूप घेत आहे. पाकिस्तान आणि आयएसआय हिंदुस्थानी तरुणांमध्ये ड्रग्जचे व्यसन वाढावे म्हणून आटोकाट प्रयत्न करत आहेत. देशातीलच अनेक विघातक शक्तीही यात उतरल्याने हा दहशतवाद विक्राळ रूप धारण करत आहे. नार्को टेरेरिझममुळे सरकारी आकडेवारीप्रमाणे 40 लाखांहून जास्त तरुण व्यसनाधीन झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अहवालानुसार दक्षिण आशियात तयार होणाऱया 40 टन ब्राऊन शुगरपैकी 14 टन ब्राऊन शुगर ही केवळ हिंदुस्थानात व्यसनासाठी वापरली जाते.

प्रश्न असा आहे की, हा दहशतवाद कसा थांबवायचा? सर्वात महत्त्वाचे आपल्याला हिंदुस्थान-पाकिस्तान सीमा, हिंदुस्थान-नेपाळ सीमा, हिंदुस्थान-म्यानमार सीमा आणि हिंदुस्थान-बांगलादेश सीमा पूर्णपणे सील कराव्या लागतील. याकरिता हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला, हिंदुस्थान-नेपाळ सीमेवर सीमा सुरक्षा बलाला उच्च दर्जाची सुरक्षितता पुरवावी लागेल.

समुद्राकडून प्रचंड प्रमाणात अफू, गांजा, चरस आणला जातो. पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टीवरसुद्धा अफू, गांजा, चरसचा व्यापार मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. सागरी सुरक्षेकरिता जबाबदार असणाऱया संस्था म्हणजेच हिंदुस्थानी नौदल, हिंदुस्थानी तटरक्षक दल, पोलीस आणि इतर सुरक्षा एजन्सीजना डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल.

याशिवाय देशाच्या आत आलेला अफू, गांजा, चरस आपल्याला पकडावा लागेल. देशाच्या आपल्या सगळ्या सुरक्षा एजन्सीज म्हणजेच गुप्तहेर संघटना, पोलीस, अर्धसैनिक दल यांना एकत्रितरीत्या काम करावे लागेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या