‘महाराजा’ला सरकारचा ‘टाटा’

>> कॅप्टन नीलेश गायकवाड

एअर एशियामध्ये भागीदारी असलेल्या आणि एअर इंडियाच्या मूळ मालक असलेल्या टाटा समुहाकडे अखेर एअर इंडियाची मालकी गेली आहे. या क्षेत्रातील अनुभवावरून आपण कंपनी फायद्यात आणू शकतो का आणि कंपनीची सध्याची मालमत्ता पाहता सौदा फायद्याचा ठरू शकतो का, याचा सारासार विचार करूनच टाटा समूहाने एअर इंडिया खरेदी करण्यासाठी मोठी बोली लावली होती. एअर एशियामध्ये असणारी 51 टक्क्यांची भागीदारी टाटांना याबाबतीत फायदेशीर ठरणार आहे. एअर इंडियाचे विलीनीकरण एअर एशियामध्ये झाल्यास टाटांना त्यापासून चांगला लाभ होऊ शकतो.

तोटय़ात असलेल्या एअर इंडियाची विक्री करण्यासाठी बोली लावण्याची मुदत केंद्र सरकारने वाढविली होती, परंतु बराच काळ कोणी खरेदीदार एअर इंडियाची खरेदी करण्यासाठी पुढे आला नव्हता. एअर इंडियाचा तोटा वाढून प्रचंड वाढला आहे. त्यामुळेच बोली लावण्यास कंपन्या कचरत होत्या. पण नंतरच्या काळात काही जणांकडून प्रस्ताव दाखल झाले. बोली लावण्यास इच्छुक असलेल्या इच्छुक खरेदीदारांमध्ये टाटा समूहाचे नाव अग्रक्रमाने घेतले गेले. आता सरकारने एअर इंडियाचा सौदा टाटा समूहासोबत करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे एअर इंडिया कंपनी पुन्हा आपल्या जुन्या मालकाच्या ताब्यात येत आहे.

टाटा हे हिंदुस्थानातील एक प्रतिष्ठत उद्योजक घराणे आहे. राष्ट्रीयीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत एअर इंडिया सरकारकडे सोपविल्यानंतर तब्बल 68 वर्षांनी टाटांना पुन्हा ही कंपनी आपल्या समूहात समाविष्ट करून घेण्यात यश आले आहे. टाटा सन्स ही कंपनी या प्रस्तावाचे मूल्यमापन करीत होती आणि योग्य विचारविनिमय झाल्यानंतरच योग्य वेळी बोली लावली गेली.

या पार्श्वभूमीवर सरकारने अखेर एअर इंडियामधील आपला सगळा वाटा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. थोडक्यात एअर इंडियाचे पूर्ण खासगीकरण करण्याचे ठरविले होते. त्यासाठीच बोली लावल्या गेल्या आणि अखेर एअर इंडियावर पुन्हा टाटा उद्योग समूहाचा झेंडा फडकला आहे.

एअर इंडियाची खरेदी केल्याने टाटा समूहाला बाजारपेठ मिळण्यात अजिबात अडचण असणार नाही. एअर इंडियाच्या सेवेचे अनेक लाभदायक रूट असून टाटा समूहसुद्धा आधीपासूनच विमान उड्डाण क्षेत्रात आहे. त्यामुळे एअर इंडिया विकत घेणे टाटांना सर्वांत सोपे गेले असे म्हणता येईल. टाटा सन्स सिंगापूर एअर लाइन्सबरोबर 51-49 टक्क्याच्या भागीदारी करार करून विमान उड्डाणाच्या व्यवसायात आहे. टाटा सन्सची एअर एशियामध्येही 51 टक्क्यांची भागीदारी आहे. या कंपनीत 49 टक्क्यांची भागीदारी मलेशियातील उद्योजकाची आहे. आता एअर इंडिया खरेदी करून टाटा तिचे विलीनीकरण एअर एशियात करू शकतात, अशीही चर्चा आहे.

एअर इंडियाची सूत्रे खासगी क्षेत्राच्या हवाली करण्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती आणि आता त्यातील निर्गुंतवणूक निश्चित झाली आहे. टाटा समूहाने केवळ पूर्वी त्यांच्याकडेच या कंपनीची सूत्रे होती म्हणून ही कंपनी खरेदी करण्यात रस दाखविला असावा, असे म्हणता येणार नाही. या क्षेत्रातील त्यांचा अनुभव पाहता ते कंपनी फायद्यात आणू शकतात का आणि कंपनीची सध्याची मालमत्ता पाहता सौदा फायद्याचा ठरू शकतो का, याचा विचार टाटा समूहाने केला असणार हे निश्चित आहे. एअर एशियामध्ये असणारी 51 टक्क्यांची भागीदारी टाटांना याबाबतीत फायदेशीर ठरणार असून, एअर एशियामध्ये एअर इंडियाचे विलीनीकरण झाल्यास टाटांना त्यापासून चांगला लाभ होऊ शकतो. अर्थात सध्या जगातील सर्वच विमान कंपन्या तोटय़ातून वाटचाल करीत आहेत. कोविड-19 च्या महामारीने आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आणले गेल्यामुळे अनेक कंपन्यांना अडचणींमधून मार्ग काढावा लागत आहे. पर्यटन व्यवसायही या साथरोगामुळे संकटात आला. दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय प्रवास थांबल्याने या व्यवसायाला मोठा फटका बसला. सिंगापूर एअरलाइन्ससारख्या कंपनीने कोविड-19 चे कारण सांगूनच एअर इंडियाच्या खरेदीसाठी बोली लावण्यास नकार दिला होता, हे लक्षात घेतले पाहिजे.

अर्थात, कोरोना साथीमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये अडचणी उभ्या राहिल्या असून, विमान वाहतूक क्षेत्र मुळातच अडचणीत असताना कोरोनाच्या महामारीने आगीत तेल ओतण्याचे काम केले. नेमक्या अशाच काळातच एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू झाली. एअर एशिया इंडिया आणि विस्तारा या दोन महत्त्वपूर्ण एअरलाइन्समध्ये टाटांची भागीदारी आहे. या दोन्ही पंपन्या आपापली बिझनेस मॉडेल अवलंबून व्यवसाय करतात. विस्तारा कंपनीने बोइंग 737-800 एनजी विमाने आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतली आहेत. कंपनीकडील विमानांची संख्या 31 वर पोहोचली आहे आणि त्यामुळे कंपनीचे नेटवर्पही 50 टक्क्यांनी वाढले आहे. या पार्श्वभूमीवर टाटा समुहाला एअर इंडियाचा सौदा फायदेशीर ठरू शकतो, असे मानले जाते. याबाबत येत्या काळात काय घडते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सध्याच्या काळात एअर इंडियावर मोठे कर्ज आहे. कंपनीचे रोजचे नुकसान 20 ते 25 कोटींहून अधिक आहे. मात्र कंपनीच्या अनेक ठिकाणी जमिनी आणि इमारतीही आहेत आणि हा फार मोठा फायदा आहे. टाटांना या साऱ्याची जाण निश्चितपणे आहे आणि याबाबत लावल्या जात असलेल्या कयासांनुसार जर एअर एशियामध्ये एअर इंडिया विलीन करण्याची योजना टाटांच्या मनात खरोखर असेल तर त नक्कीच ‘महाराजा’ला नवं रूप देतील यात शंका नाही.

महाराजाचे बोधचिन्ह मिरवणारी एअर इंडिया एकेकाळी टाटा एअरलाइन्स म्हणून ओळखली जात असे. या कंपनीने 1932 मध्ये विमानसेवा सुरू केली होती. देशातील पहिले परवानाधारक पायलट जेआरडी टाटा यांनी स्वतः 15 ऑक्टोबर 1932 रोजी कराची ते मुंबई विमानाचे उड्डाण केले होते. 1946 मध्ये कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले. नंतर 1953 मध्ये राष्ट्रीयीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारने एअर इंडियाची खरेदी केली होती. सन 2000 पर्यंत एअर इंडिया फायद्यात चालली होती. 2001 मध्ये कंपनीला प्रथमच 57 कोटींचा तोटा झाला. नंतर 2007 मध्ये सरकारने इंडियन एअरलाइन्स ही कंपनी एअर इंडियामध्ये विलीन केली. त्यावेळी दोन्ही पंपन्यांचा एकत्रित तोटा 770 कोटी रुपये होता आणि नंतर तो 7200 कोटींपर्यंत वाढला. एअर इंडियाने आपला तोटा कमी करण्यासाठी तीन एअरबस 300 ची आणि एका बोइंग 747-300 विमानाची 2009 मध्ये विक्री केली. परंतु एअर इंडियाचा तोटा कमी झालाच नाही. मार्च 2011 मध्ये एअर इंडियावरील कर्ज वाढून 42,600 कोटी रुपये झाले तर परिचालन तोटा 22 हजार कोटी रुपये झाला. 2018-19 या आर्थिक वर्षात सुमारे 58 हजार कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबलेल्या एअर इंडियाला सुमारे 8400 कोटी रुपयांचा तोटा झाला. जास्त परिचालन मूल्य आणि परकीय चलनातील तूट यामुळे एअर इंडियाला मोठे नुकसान सहन करावे लागले. उरलीसुरली कसर कोरोनाने भरून काढली आणि केवळ एअर इंडियाच नव्हे तर जगातील सर्व विमान पंपन्यांना तोटा सहन करावा लागला.

(लेखक पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या