
डॉ.मंजिरी भालेराव << [email protected] >>
अंगकोरवॅट या कंबोडियातील सर्वात मोठय़ा मंदिराचे आणखी एक आकर्षण म्हणजे इथे कोरलेले कमी उठावाचे असंख्य शिल्पपट. शेकडो मानवाकृती यामध्ये पाहायला मिळतात. पुराणातील आणि ऐतिहासिक प्रसंगावर आधारित वेगवेगळ्या गोष्टींची कथनशिल्पे इथे कोरली आहेत.
अंगकोरवॅट या कंबोडियातील सर्वात मोठे तसेच जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेल्या मंदिराची माहिती पाहण्यास आपण मागच्या भागात सुरुवात केली. मंदिराचा शोध कसा लागला आणि त्याचबरोबर कंबोडियामधली अनेक वारसा स्थळे कशी उजेडात आली हेही आपण पहिले. पण मुळात हे मंदिर एकात एका अशा तीन तटबंदींच्या आत बांधले आहे. पश्चिम दिशेला प्रवेशद्वार असलेल्या मंदिराच्या भोवती मोठय़ा प्रदक्षिणा पथाची योजना केली आहे. हा पथ यामध्ये एका बाजूला छत तोलून धरणाऱ्या खांबांची ओळ आहे तर दुसऱ्या बाजूला जी भिंत आहे त्यावर अगदी कमी उठावाचे शिल्पपट कोरले आहेत. हे शिल्पपट म्हणजे या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण आहे. शेकडो मानवाकृती यामध्ये पाहायला मिळतात. पुराणातील आणि ऐतिहासिक प्रसंगावर आधारित वेगवेगळ्या गोष्टींची कथनशिल्पे इथे कोरली आहेत. शेकडो वर्षे देश-विदेशातील प्रवासी, भक्त या मंदिरात येऊन त्यांनी या शिल्पांवर आपले हात घासल्यामुळे ते खूप गुळगुळीत झाले आहेत आणि काहींना झिलई (पॉलिश) केली आहे असा आभास होतो.
पश्चिम दिशेच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर साधारणपणे उजवीकडे म्हणजे दक्षिणेकडून ही प्रदक्षिणा घालतात किंवा या शिल्पांचा आस्वाद घेतात. वरील रेखाचित्रात कोणते शिल्पपट कुठे आहेत यांचा थोडक्यात आराखडा दिला आहे. हे शिल्पपट पुढील विषयांवर आधारित आणि पुढील क्रमाने कोरलेले पाहायला मिळतात. 1)महाभारतात वर्णलेले कुरुक्षेत्रातील युद्ध, 2) राजा सूर्यवर्मन (दुसरा) याची मिरवणूक, 3) स्वर्ग आणि नरकातील चित्रण, 4) समुद्रमंथन, 5) कृष्णाचा असुरांवर विजय, 6) कृष्णाचा बाणासुरावर विजय, 7) देव आणि असुर यांच्यामधील युद्ध आणि 8) रामायणातील राम आणि रावण यांचे घनघोर युद्ध, असा हा क्रम आहे.
1) यामध्ये सर्वात आधी कुरुक्षेत्रात झालेले महायुद्ध शिल्पांकित केलेलं आहे. महाभारतावर आधारित हे शिल्प 48 मीटर लांब भिंतीवर कोरले आहे. त्याची रचना अशा प्रकारे केली आहे की, डावीकडून किंवा उजवीकडून, कुठूनही पहिले तरी महत्त्वाचे प्रसंग मधोमध येतात. या शिल्पपटात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा कृष्ण, शरपंजरी भीष्म या महत्त्वाच्या प्रसंगांबरोबरच युद्धात शेकडो सैनिक लढताना दाखवले आहेत. एकमेकांच्या अंगावर पडलेले, त्यांना पायदळी तुडवून पुढे जाणारे असे हे सैनिक, अशी अनेक गुंतागुंतीची शिल्पे इथे कोरलेली आहेत. तसेच फरश्यांचे अनेक शिल्पांकित तुकडे एकासमोर एक बसवून हा आणि बाकीच्या सर्व ओवऱ्या किंवा व्हरांडय़ामधल्या शिल्पपटांची निर्मिती झालेली आहे. एकमेकांशेजारी ते इतके बेमालूमपणे बसवले आहेत की त्यांच्यामध्ये जोड आहे हे लक्षातसुद्धा येत नाही. हे ख्मेर शिल्पकारांचे काwशल्य सर्व मंदिरांमध्ये पाहायला मिळते. इथे तर त्यांनी आपल्या या काwशल्याचा परमोच्च बिंदू गाठला आहे. अनेको मीटर लांब अशा भिंतींवर ही शिल्पे कोरलेली आहेत.
2) त्यानंतर आहे ते म्हणजे दक्षिणेकडच्या भिंतीवरील पहिल्या भागात कोरलेले राजा सूर्यवर्मन (दुसरा) याच्या मिरवणुकीचे शिल्प. या मंदिराचा निर्माता आणि भगवान विष्णू याचा परमभक्त असलेला राजा सूर्यवर्मन (दुसरा) याचे सामर्थ्य दाखवणारी ही भव्य मिरवणूक 90 मीटर लांब भिंतीवर कोरलेली आहे. अशा प्रकारचे शिल्पातून दर्शन देणारा हा कंबोडियातील पहिलाच राजा होता. या मिरवणुकीत राजाचे विविध अधिकारी, सैन्याच्या तुकडय़ा, हत्ती, धर्मगुरू, घोडेस्वार, राजाची छत्र-चामरे, ध्वज इ. सविस्तर दाखवले आहे. राजा स्वतः हाता-पायात, गळ्यात दागिने, डोक्यावर मुकुट, हातात बहुतेक मेलेला साप अशा थाटात एका आसनावर बसला आहे. या आसनाचे पाय अनेक फणे असलेल्या नागासारखे आहेत. काही पालख्या राण्या आणि राजकुमारी यांनाही घेऊन येत आहेत असे दखवले आहे. अतिशय सविस्तरपाने कोरलेल्या या शिल्पामधून राजा सूर्यवर्मन (दुसरा) याचे एक गंभीर, शांत व्यक्तिमत्त्व प्रतीत होताना दिसते. आजच्या कंबोडियातील अनेक कलाकुसरीच्या वस्तू विकणारे लोक निरनिराळ्या माध्यमात तयार केलेल्या या राजाच्या अंगकोरवॅट येथील या शिल्पाच्या अनेक प्रतिकृती विकताना दिसतात. काळ्या तसेच गडद लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगाने दाखवलेल्या राजा आणि त्याच्या छत्र, चामर, ध्वज दर्शवणाऱ्या या शोभिवंत वस्तू अतिशय देखण्या आणि आकर्षक दिसतात. शिल्पांमधून दिसणारे वैभव जिवंत करण्याचा हा एक प्रयत्न आहे हे लक्षात येते.
3) यानंतर या ओवरीच्या पुढच्या भागात स्वर्ग आणि नरक यामधले चित्रण केलेले दिसते. 63 मीटर लांब असलेल्या या भिंतीवर 37 स्वर्ग आणि 32 नरकांमधील जीवनाचे चित्रण पाहयला मिळते. मृत व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात केलेल्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरक यामध्ये जागा मिळते. तिथे चांगली कर्मे करणाऱ्या लोकांना स्वर्गातील सुखाचे जीवन आणि वाईट कर्मे करणाऱ्या लोकांना नरकातील दुःखप्रद जीवन कसे जगायला मिळते हे अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवले आहे. मधोमध रेडय़ावर बसलेल्या मृत्यूच्या देवाचे म्हणजे यमराजाचे अनेक हात असलेले आणि त्यात विविध आयुधे धरलेले शिल्प पाहायला मिळते. यामध्ये नरकातील जीवन अक्षरशः अंगावर काटा आणणारे, विविध प्रकारचे छळ दाखवणारे आहे. हे सगळे पाहिल्यावर प्रजेला चांगले वागणे कसे महत्त्वाचे आहे हे समजेल या अपेक्षेने यांची योजना इथे केली असावी. भारतीय परंपरेत चक्रवर्ती राजाचे हे कर्तव्य सांगितले आहे की, त्याने त्याच्या प्रजेचे फक्त इहलोकात, भौतिक जीवनात भले करावे असे नाही तर मृत्यूनंतर परलोकातही त्यांचे भले व्हावे याची काळजी घ्यावी. चक्रवर्ती सम्राट अशोकही त्याच्या लेखांमधून हेच सांगताना दिसतो. या सगळ्या वैचारिक पार्श्वभूमीवर जेव्हा या शिल्पांकडे आपण पाहतो तेव्हा त्यांचे वेगळे संदर्भही लक्षात येतात. राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने किती विचार करून या मंदिराची आणि त्यामधल्या शिल्पपटांची योजना केली होती, हे पाहून आपण अचंबित होतो.
असे अजून पाच शिल्पपट या मंदिरात आहेत. त्यामध्येही अनेक उल्लेखनीय गोष्टी कोरल्या आहेत. जागेअभावी त्यांच्याबद्दल पुढच्या आणि शेवटच्या भागात माहिती घेऊया.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत.)





























































