अमेरिकेतील हिंदुस्थानविरोधी तत्त्वे

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

अमेरिकेच्या काही भागांमध्ये हिंदुस्थानविरोधी अभियान राबवले जाते, कारण तिथे स्थायिक हिंदुस्थानी अशा तत्त्वांच्या विरोधामध्ये फारसे बोलत नाहीत, फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात. म्हणून काही हिंदुस्थानविरोधी आक्रमक संस्था अमेरिकेच्या प्रगतीसाठी काम करणाऱया हिंदुस्थानींना जड जातात. मग काय करायला पाहिजे? अर्थातच अमेरिकेमधील हिंदुस्थानीयांना एकत्रित आणि संघटित करण्याची गरज आहे. जर हिंदुस्थानी एकत्र आले तरच हिंदुस्थानविरोधी तत्त्वांना प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. अशाच प्रकारची हिंदुस्थानविरोधी तत्त्वे ही कॅनडा, इंग्लंडमध्येसुद्धा कार्यरत आहेत.

अमेरिकेच्या काही शहरांमध्ये, प्रांतांमध्ये हिंदुस्थानविरोधी तत्त्वे मोठय़ा प्रमाणात डोके बाहेर काढत आहेत. हिंदुस्थानप्रमाणे अमेरिकेतल्या शहरांमध्ये नगर विकास/नगराचा कारभार बघण्याकरता नगर परिषद किंवा महानगर परिषद काम करतात. गेल्या काही महिन्यांपासून शिकागो शहरांमध्ये एक मोठी घटना घडत आहे, याकडे हिंदुस्थानाच्या मीडियाचे फारसे लक्ष नाही. शिकागो नगर परिषद एक विधेयक पास करण्याचा प्रयत्न करत आहे की, हिंदुस्थानमध्ये मानव अधिकाराचा भंग होत आहे, हिंदुस्थानने 370 कलम काढायला नको होते. ‘सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट’ पास करायला नको होता, हिंदुस्थान एक हुकूमशाही देश बनत आहे.

खरेतर शहरातील नगर परिषदेचे काम दुसऱया देशाविषयी बोलण्याचे नसते. मग अचानक या शहरांमध्ये तिथल्या परिषदेने अशी विधेयके पास का केली? शिकागो सोडून सिएटल, सेंट पॉलमध्येसुद्धा अशी विधेयके आणण्याचा प्रयत्न केला गेला. ‘कौन्सिल फोर अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स’ ही हिंदुस्थानविरोधी संस्था आहे जी इतर अनेक हिंदुस्थानविरोधी संस्थांना एकत्रित करून हिंदुस्थानात चाललेल्या घडामोडींविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करते. हिंदुस्थानविरोधी विधेयक पास झाले की त्या शहराची वर्तमानपत्रे जसे मुस्लीम मिरर त्याला प्रसिद्धी देतात. यामुळे वर्तमानपत्रे वाचणाऱयांना वाटू लागते की, हिंदुस्थानात प्रचंड गडबड होत आहे.

शिकागोमध्ये झालेल्या घटनांचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, जे सहा महिने चालू आहे. हिंदुस्थानविरोधी विधेयक नगर परिषदेमध्ये आणले गेले. पहिल्या राऊंडमध्ये ठरवण्यात आले की, नगर परिषदेच्या मानव अधिकार, आरोग्य समितीने यावर अभ्यास करावा. नंतर या समितीवर दबाव टाकून तिला रिपोर्ट द्यायला भाग पाडण्यात आले की, हिंदुस्थानात मानव अधिकार भंग होत आहे, हिंदुस्थानातली मीडिया अजिबात स्वतंत्र नाही.
हिंदुस्थानविरोधी संस्थांनी अतिशय पद्धतशीरपणे, चुपचापपणे हिंदुस्थानविरोधी विधेयके पास करायचा प्रयत्न केला. मग तिथे असलेले हिंदुस्थानी जागरूक झाले आणि यांनी खरी परिस्थिती शहर परिषदेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकन हिंदुस्थानींनी एक सिग्नेचर कॅम्पेन सुरू केले. यात अनेक हिंदुस्थानी संस्था म्हणजे ‘फेडरेशन ऑफ इंडियन अमेरिकन्स’, ‘एशियन हॉटेल ओनर्स असोसिएशन’, ‘हिंदू कौन्सिल’ सामील झाल्या आणि सोशल मीडियावरती 3700 लोकांनी सहय़ा करून सांगितले की, हिंदुस्थानात राज्यकारभार चांगला चालला आहे.

हिंदुस्थानविरोधी संस्थांना 123 लोकांचे समर्थन मिळाले. हिंदुस्थानात अल्पसंख्याकांवर तथाकथित गैरव्यवहार झाला अशा 200 घटना नगर परिषदेसमोर मांडल्या गेल्या. अमेरिकन हिंदुस्थानीयांनी शिकागो शहराला लागू माहिती गोळा केली. शिकागो शहरामध्ये 2020मध्ये 740 खून झाले. त्यांची लोकसंख्या 30 लाख आहे. 130 कोटी हिंदुस्थानात जर 200 तथाकथित अत्याचाराच्या घटना घडल्या असतील तर शिकागो शहराच्या तुलनेत ते प्रमाण किती कमी आहे हे लक्षात यावे.

यामध्ये काही हिंदुस्थानींनी माहिती गोळा करून इतर हिंदुस्थानी संस्थांना एकत्रित करण्यात मोलाची कामगिरी बजावली. यात कश्मीरमध्ये 370 कलम काढल्यानंतर झालेली आर्थिक प्रगती, हिंसाचारामध्ये झालेली घट सर्वांसमोर मांडण्यात आली. ‘सेंटर फोर अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स’ या संस्थेला उघडे पाडण्यात आले. या संस्थेने त्यांना अमेरिकेतील 24 संस्थांनी विधेयकाला होकार दिला म्हणून त्यांची नावे प्रकाशित केली. संशोधनानंतर कळाले की, त्यात सात संस्था अस्तित्वातच नव्हत्या, दोन संस्था या अमेरिकेच्या बाहेर यूएईमध्ये कार्यरत होत्या. काही संस्थांच्या बाहेर पाटय़ा लागल्या होत्या; पण त्या काहीच काम करत नव्हत्या. म्हणजेच त्यांना फारसा सपोर्ट नव्हता.

याच लॉबीने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केलेल्या भाषणामधला त्यांना सोयीस्कर काही भाग पुढे आणला. मात्र ते सांगायला विसरले की, अमेरिकन सरकारने हिंदुस्थानच्या शेतकरी बिलाला आपले समर्थन दिलेले आहे. शिकागोमधल्या हिंदुस्थानींनी केलेल्या विरोधामुळे गेले सहा महिने शिकागोमध्ये हिंदुस्थानविरोधी विधेयक पास करायला अजून यश मिळालेले नाही. परंतु यापुढे काय होईल?
अमेरिकेमध्ये असलेले हिंदुस्थानी पहिले आपले राज्य, जात-जमातीमध्ये विभागले गेले होते. काही वर्षांपूर्वी आपली प्रांतीय ओळख मागे ठेवून हिंदुस्थानी म्हणून तिथल्या हिंदुस्थानीयांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. परंतु अजून पुष्कळ जास्त काम करण्याची गरज आहे .
तसे म्हटले तर परदेशातील एका शहराने त्यांच्या नगर परिषदेमध्ये पास केलेल्या विधेयकाचा हिंदुस्थानवरती काहीच परिणाम होत नाही. परंतु हिंदुस्थानविरोधी तत्त्वांचे हिंदुस्थानात असलेले हस्तक हीच बातमी मोठय़ा मथळ्याखाली हिंदुस्थानच्या वर्तमानपत्रांमध्ये पुढे आणतात.
हिंदुस्थानातील काहींना हिंदुस्थानात काहीही चांगले झालेले बघवत नाही. काहीतरी करून हिंदुस्थानला वेगवेगळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती बदनाम करण्याचा ते प्रयत्न करतात. उदाहरणार्थ सध्या हिंदुस्थानच्या स्मशानभूमीचे फोटो नेटवर हजारो रुपयांना विकले जात आहेत.
हिंदुस्थानच्या बाहेर अमेरिकेत, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये राहणाऱया हिंदुस्थानींना आपल्या मूळ देशाकरता एकत्रित येऊन हिंदुस्थानविरोधी तत्त्वांना पराभूत करणे गरजेचे आहे.
परदेशातील हिंदुस्थानी दूतावासाने त्या देशांमध्ये चाललेल्या हिंदुस्थानविरोधी कारवाईवर लक्ष ठेवावे आणि त्याची माहिती त्या त्या भागातील स्थायिक हिंदुस्थानीयांना द्यावी, ज्यामुळे तिथल्या हिंदुस्थानी संघटना हिंदुस्थानी तत्त्वांच्या विरुद्ध त्या देशात स्थित हिंदुस्थानीयांचे अभियान सुरू करू शकतील . हिंदुस्थानच्या सुरक्षेकरता, देशाच्या प्रगतीकरिता सगळ्या हिंदुस्थानीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण प्रथम हिंदुस्थानी आहोत आणि आपल्या सगळ्यांना हिंदुस्थानची आर्थिक प्रगती व्हावी, हिंदुस्थान सुरक्षित रहावा असेच वाटते. मात्र हे आपल्या कृतीतसुद्धा उतरले पाहिजे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या