मुद्दा – कृत्रिम पाऊस

935

>> विनायक रा. वीरकर

ढगांमध्ये विमानाद्वारे केमिकल्स (सिल्व्हर आयोडाईड, मीठ व ड्राय आईस) फवारून कृत्रिम पावसाचे प्रयत्न महाराष्ट्रात यापूर्वी झाले, पण त्यांना तसे यश आले नाही. विमानाचा व पायलट खर्च तसेच एअरपोर्टचे भाडे अवाढव्य असल्यामुळे आपल्याला खर्च परवडणारा नाही. त्यासाठी मी खालील स्वस्त उपाय सुचवत आहे. विदर्भ व मराठवाड्याच्या कमी पावसाच्या क्षेत्रात वरील उपाय करावेत. रॉकेट लाँचरने कृत्रिम पाऊस पाडता येतो. ही पद्धत चीनमध्ये वापरत आहेत. जीपवर रॉकेटस बसवून ग्रामपंचायतींच्या ऑफिसमधून रॉकेट लाँचरमधून रॉकेटस उडवून ढगांमध्ये केमिकल फवारून कृत्रिम पाऊस पाडता येईल. तसेच जीप योग्य ठिकाणी फिरविता येतील. सध्या कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्व्हर आयोडाईड, ड्राय आईस व मीठ ढगात फवारून कृत्रिम पाऊस पाडतात. सहा ते आठ फुटांच्या प्लॅस्टिक फुग्यामध्ये हायड्रोजन गॅस भरून फुग्याला वरील केमिकलची पिशवी बांधून फुगे ढगामध्ये सोडावेत व फुगे ढगात पोहोचल्यावर रिमोट कंट्रोलने फुग्याला बांधलेली केमिकलची पिशवी फोडावी. म्हणजे कृत्रिम पाऊस पडू लागेल. ड्रोनला केमिकलची पिशवी बांधून रिमोट कंट्रोलने पिशवी फोडावी तसेच रिमोट कंट्रोलने ड्रोन योग्य ठिकाणी फिरवून कृत्रिम पाऊस पाडावा. पायलटविना (स्मार्ट जेट) विमान वरील केमिकलच्या सहाय्याने कृत्रिम पाऊस पाडावा. महाराष्ट्र सरकार, नगरपालिका व ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर प्रयत्न करून कृत्रिम पाऊस पाडावा. म्हणजे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे विहिरी आटणार नाहीत. युद्धपातळीवर बीजारोपण करावे म्हणजे जंगलवृद्धी होऊन पाऊस पडण्यास मदत होईल व उन्हाळा कमी होण्यास मदत होईल. ढगांची दिशा व लोकेशनची माहिती मिळण्यासाठी हवामान खात्याच्या डॉप्लर व रडार यांची मदत घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत स्वस्त कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न बंद करू नयेत. जरूर वाटल्यास रॉकेट लाँचरची मशिनरी चीनहून आयात करावी.

आपली प्रतिक्रिया द्या