ऍटलास धूमकेतूची शेपटी सापडली!!!

>> सुजाता बाबर

सेरेंडीपिटी हे विज्ञानाला मिळालेले एक वरदान आहे! सेरेंडीपिटी म्हणजे अचानक गवसणे, शोध लागणे! अशा प्रक्रियांमधून अनेक वैज्ञानिक शोध लागलेले आहेत. याला ‘सायन्स बाय चान्स’ असेही म्हटले जाते. अर्थातच शास्त्रज्ञांच्या डोक्यात विचार घोळत असतातच. परंतु अचानक काहीतरी घडते आणि लख्खपणे शोध समोर येतो. चहाचा शोध, वेक्रोचा शोध किंवा बेन्झीनची रचना अशी अनेक उदाहरणे देता येतील. शास्त्रज्ञ शोध लावताना त्यांची संशोधनाची विशिष्ट शास्त्राrय पद्धत असते. यात त्यांना एक ध्येय किंवा नेमका कशाचा शोध लावायचा आहे याची स्पष्टता असते. पण अनेक वेळा असे घडते की, जे अगदी अनपेक्षित असते आणि योगायोगाने घडते. हा योगायोग एक सुखद धक्का देऊन जातो आणि त्यातून एक नवीनच शोध लागतो. ‘सायन्स बाय चान्स’ अगदी अभ्यासण्यासारखे आहे. योगायोगाने व अनपेक्षितपणे उदयास येणाऱया गोष्टींचा शोध लावण्याची शक्ती म्हणजे सेरेंडीपिटी. याचा मराठी शब्द कोणता हे सांगणे अवघड आहे.

खगोलशास्त्रामध्ये सेरेंडीपिटीच्या जवळ जाणारा एक शोध समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिटनमधील एका राष्ट्रीय खगोलशास्त्र परिषदेमध्ये एक शोधनिबंध सादर करण्यात आला. या शोधनिबंधामध्ये ऍटलास धूमकेतूची शेपटी सापडल्याचा उल्लेख आहे. ऍटलास धूमकेतू मागील वर्षी पृथ्वीच्या जवळ आला होता, परंतु त्याचे तुकडे होऊन तो विघटन पावला होता. या नवीन आणि अचानक लागलेल्या शोधामध्ये ऍटलास धूमकेतूची मागे राहिलेली शेपटी सापडली आहे. यामुळे शास्त्रज्ञांना शेपटीच्या उल्लेखनीय रचनेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे.

ऍटलास धूमकेतू डिसेंबर 2019 मध्ये शोधला गेला. हा गेल्या दोन दशकांतील आलेल्या धूमकेतूंपैकी सर्वात मोठा धूमकेतू होता. परंतु एप्रिल 2020 मध्ये हबल अंतराळ दुर्बिणीने त्याचे विघटन नोंदवले. जोस डी क्विरोझ या हौशी खगोल अभ्यासकाने या धूमकेतूच्या केंद्रकाचे तीन तुकडे त्याच्या छायाचित्रात पकडले होते. धूमकेतूंच्या केंद्रकाचे विघटन होणे ही काही नवीन प्रक्रिया नाही. विघटनानंतर त्याची शेपटी मात्र अवकाशातच राहिली आणि सापडली हे मात्र नवीन आहे. धूळ आणि भारीत कणांच्या एक अंधुकशा मेघाच्या स्वरूपात ती अवकाशात फिरत आहे. हबल अंतराळ दुर्बिणीने विघटन जरी नोंदवले असले तरी युरोपियन स्पेस एजन्सीचे सोलर ऑर्बिटर अवकाशयान नुकतेच या शेपटीच्या अवशेषांच्या जवळून गेले. सोलर ऑर्बिटरच्या विविध उपकरणांनी मिळवलेल्या माहितीला एकत्र करून हे संशोधन लक्षात आले आहे. ही माहिती सांगते की, धूमकेतूच्या भोवती सौर वाऱयाने वाहून आणलेल्या आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्राचे सैलसर आवरण असावे आणि शेपटीच्या मधल्या भागाभोवती त्याचे कमकुवत चुंबकीय क्षेत्र आहे.

धूमकेतू जसजसा सूर्याच्या जवळ येतो त्यातील द्रव्य सूर्याच्या उष्णतेने वितळायला लागते आणि शेपटीच्या रूपामध्ये बाहेर पडते. ते दोन शेपटय़ांच्या स्वरूपात दिसते. एक म्हणजे तेजस्वी चमकदार धुळीची शेपटी (डस्ट टेल) आणि दुसरी म्हणजे फिकट दिसणारी भारीत कणांची शेपटी (आयन टेल). धूमकेतूंमधील वायू आणि सौर वारे यांच्या आंतरक्रियांमधून भारीत कणांची शेपटी तयार होते. जेव्हा सौर वारे धूमकेतूसारख्या घन वस्तूशी आंतरक्रिया करतात तेव्हा त्याचे चुंबकीय क्षेत्र वाकते आणि त्याचे त्या वस्तूच्या भोवती सैलसर आवरण तयार करते. अशा चुंबकीय क्षेत्राचे आवरण आणि धूमकेतूच्या केंद्रकातील बर्फ वितळून त्यातून बाहेर पडलेले भारीत कण एकत्र येऊन वैशिष्टय़पूर्ण दुसरी भारीत कणांची शेपटी तयार होते. ही केंद्रकापासून प्रचंड लांब अंतरावर दूरपर्यंत पसरलेली असते.

सध्या मिळालेली ऍटलास धूमकेतूची शेपटी हे कधीही अभ्यास न केलेल्या गोष्टी समोर आणेल. पार्कर सोलार प्रोब आणि सोलार ऑर्बिटर आता सूर्याभोवती पूर्वीपेक्षा अधिक जवळून परिभ्रमण करीत आहेत. त्यामुळे भविष्यात या घटना अधिक सामान्य होऊ शकतात!

सूर्याच्या जवळ सापडलेली ही पहिलीच धूमकेतूची शेपटी आहे. शुक्र ग्रहाच्या परिभ्रमण कक्षेच्या आतमध्ये ती सापडली आहे. विघटित धूमकेतूचे थेट अभ्यास करण्याच्या संधी दुर्मिळ असतात. आता मिळालेल्या डेटामधून भारीत कणांच्या शेपटीची निर्मिती कशी होते, तिची रचना कशी असते आणि धूमकेतू व सौर वारे यांच्या आंतरक्रिया कशा असतात याविषयी नवीन माहिती मिळण्याची शक्यता आहे.

धूमकेतू हे शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा महत्त्वाचा विषय आहे. पृथ्वीवरील जीवन कदाचित धूमकेतूंमुळे निर्माण झाले असावे असे मानले जाते. त्यामुळे धूमकेतूंचा अभ्यास हा सौरमालेच्या निर्मितीमधील सुरुवातीची स्थिती अभ्यासण्यासाठीदेखील महत्त्वाचा असतो. अचानक मिळालेल्या ऍटलास धूमकेतूच्या शेपटीने नवीन आशा पल्लवित केल्या आहेत!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या