ठसा – बालाजी तांबे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

आयुर्वेद हे केवळ हिंदुस्थानपुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार आणि त्याचे महत्त्व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले. आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. शास्त्र्ाशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीक औषधांची संशोधन-निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच त्यातून विविध समाजघटकांना आयुर्वेदाशी जोडले. पुणे जिह्यातील कार्ला येथे असलेल्या ‘आत्मसंतुलन व्हिलेज’चे ते संस्थापक होते. बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली. आयुर्वेदिक औषधी शास्त्र्ा आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले होते. हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात डॉ. बालाजी तांबे कार्यरत होते. त्यांनी  पुस्तकांच्या माध्यमातूनही आयुर्वेदाचा प्रसार केला. सोप्या भाषेत त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले. बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक हिंदुस्थानी उपचार पद्धतींचे पुनर्जीवन केले. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचं महत्त्वं घराघरात पोहचवलं. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गुण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेद, अध्यात्म, हिंदुस्थानी संगीत, हिंदुस्थानी  परंपरा आणि सण-उत्सव, ध्यानधारणा अशा अनेकविध विषयांत  बालाजी तांबे यांनी आपला लौकिक निर्माण केला. एवढेच नव्हे तर सातासमुद्रापार त्याचा प्रसार केला. युरोपात कार्यशाळा घेऊन हिंदुस्थानी विद्यांबाबत जागरूकता निर्माण केली. संगीताचे उपचारासाठी वापराचे चांगले परिणाम जगाला निदर्शनाला आणून दिले. ध्यानधारणा, ओमसाधना यांवरही त्यांनी मोठे संशोधन केले. गर्भसंस्काराचा त्यांनी प्रचार केला तसेच भगवतगीतेवरील त्यांची प्रवचने आणि लेखन खूप गाजले. त्यांची वीसहून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. यात प्रामुख्याने आत्मरामायण (गुजराती भाषेत), आयुर्वेद उवाच भाग 1, 2. (मराठी), आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराती, इंग्रजी), आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी), चक्र सुदर्शन (मराठी), मंत्र आरोग्याचा, मंत्र जीवनाचा, श्री गीता योग-शोध ब्रह्मविद्येचा (18 भाग) (प्रकाशनाधीन), श्री रामविश्वपंचायतन (मराठी), संतुलन क्रियायोग (मराठी), स्त्र्ााr आरोग्य, स्वास्थ्याचे 21 मंत्र यांचा समावेश आहे. बालाजी तांबे यांनी संतुलन ओम मेडिटेशन (एसओएम) आणि संतुलन क्रिया योग (एसकेवाय) ही तंत्रज्ञाने विकसित केली होती. अध्यात्माला प्रोत्साहन देणाऱया ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ या समग्र उपचार केंद्राची स्थापना केली. त्यांनी जगातील पहिल्या आणि एकमेव अशा ओम मंदिराची उभारणी केली. कार्ला हेच कार्यक्षेत्र असलेले  तांबे जर्मनीतील म्युनिक, फ्रँकफर्ट आणि ग्लिकेन येथेही वास्तव्यास असायचे. त्यांचा शिष्य परिवार साऱया जगभर पसरलेला आहे. त्यांनी व्यापक अभ्यास, चिंतन, संशोधन, अध्यात्माच्या बैठकीतून तसेच अभियांत्रिकी, आयुर्वेदिक यांच्या ज्ञानातून आपली स्वतःची वेगळी व प्रभावी शैली विकसित केली आहे. वेदातील स्तोत्र आणि मंत्र यांचा मनुष्याच्या शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम यावर चार दशकांहून अधिक काळ व्यापक संशोधन आणि तपश्चर्या केली आहे. त्यांच्या संशोधन आणि अभ्यासातून संगीताचे 25 अल्बम साकार झाले आहेत. त्यातील 13 अल्बम टाइम्स म्युझिकने आणलेले आहेत. गरोदर मातांना अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरलेल्या ‘गर्भसंस्कार’ या अल्बमच्या सात लाखांवर प्रती खपल्या आहेत.  बालाजी तांबे यांनी स्थापन केलेल्या उपचार केंद्रात हृदयाच्या समस्या, मधुमेह, मेंदूचे विकार तसेच अपत्यहीन दांपत्यावर उपचार केले गेले. याच केंद्रात तयार केलेली आयुर्वेदिक औषधे 1984पासून युरोपात निर्यात होत आहेत. त्यांनी आयुर्वेदातील दोनशेवर औषधींची निर्मिती केली असून त्यांची एफडीएकडे नोंदणी झालेली आहे. आयुर्वेदाच्या समृद्ध परंपरेचा दस्तावेज तयार करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी निर्माण केलेल्या दस्तावेजातून हिंदुस्थानी  आयुर्वेदाचं ज्ञान, महत्त्व भावी पिढय़ांसाठी चिरंतन राहणार आहे.