
>> दिलीप देशपांडे
मागील काळाचा विचार केला तर त्यावेळी पत्रकारिता, वृत्तपत्र, हे व्रत होते, परंतु आता बदलत्या काळात त्याने व्यवसायाचे स्वरूप घेतले आहे. आता प्रिंट मीडिया-वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे दूरसंचारसारखी माध्यमे प्रगत झालेली आहेत, पण त्या प्रगतीबरोबरच त्यांच्यावर अनेक बंधने आली आहेत. तरीदेखील ही सर्व माध्यमे आपली जबाबदारी आणि कर्तव्ये व्यवस्थित निभावत आहेत. कालानुरुप इतर क्षेत्रांप्रमाणे पत्रकारितेचे स्वरूपही आता बदलले आहे. पत्रकारितेचा आजचा प्रवाह बदलला असला तरी तोदेखील समाजमनाचा आरसा म्हणूनच कार्य करीत आहे.
वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास
असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारातून जवळपास 183 वर्षांपूर्वी म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. मराठीतील पहिले संपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रात ‘दर्पण दिन’ साजरा करतो. त्या काळी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपला देश असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रीना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ची सुरुवात मुंबई येथे केली. त्या काळी सुरू झालेल्या मुद्रणालयाचा त्यांनी समाज प्रबोधनासाठी उपयोग करून घेतला.25 जून 1840 साली ‘दर्पण’चा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
‘दर्पण’च्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, मनोरंजन आणि समाज प्रबोधनाचा हेतू साध्य केला. ‘दर्पण’मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वतःचे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र सुरू ठेवले. यावरूनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू आणि तळमळ स्पष्ट होते. त्यावेळी गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी ‘जस्टिस ऑफ पीस’ असा किताब देऊन बाळशास्त्रीचा गौरव केला. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल न्यायमूर्ती ना.ग.चंदावरकर यांनी म्हटले आहे की, बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रांत लीलया संचार करणारे पंडित होते.
आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे, तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रीनी आपल्या ‘दर्पण’मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. दादाभाई नौरोजी हे आचार्य बाळशास्त्री विद्यार्थी होते. बाळशास्त्रीजांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते. त्यांचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढय़ांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहे.
आचार्य जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रीच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार. बाळशास्त्रीनी या विषयांवर विपुल लेखन केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले.
साधारणपणे 1830 ते 1846 या काळात बाळशास्त्रीनी आपले योगदान देशाला दिले. या काळात समाज बहुसंख्येने निरक्षर, अंधश्रद्धाळू व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या 34 वर्षांच्या आयुष्यात विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले प्रचंड कार्य मोलाचे ठरते. 6 जानेवारी रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रीचाही जन्मदिवस आहे. तोच स्मृती दिवस पत्रकार दिन म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला. त्याचबरोबर जातीभेद निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांचा उल्लेख आद्य समाजसुधारक असा केला जातो. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले येथे 1812 च्या उत्तरार्धात जन्म झालेल्या बाळशास्त्री यांचे वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी 1846 मध्ये निधन झाले.
मागील काळाचा विचार केला तर त्यावेळी पत्रकारिता, वृत्तपत्र, हे व्रत होते, परंतु आता बदलत्या काळात त्याने व्यवसायाचे स्वरूप घेतले आहे. आता प्रिंट मीडिया-वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे दूरसंचारसारखी माध्यमे प्रगत झालेली आहेत, पण त्या प्रगतीबरोबरच त्यांच्यावर अनेक बंधने आली आहेत. कारण बहुतेक मोठी वृत्तपत्रे आणि दूरसंचार वाहिन्या हे कोणाच्यातरी अधिपत्याखाली आहेत. त्यांची वेगवेगळे मालक आहेत. अर्थातच ही भांडवलदार मंडळी आहेत आणि आज ही सर्व भांडवलदार मंडळी राजकीय अर्थात सत्ताधारी पक्षांच्या अंकित आहेत.
आताच्या काळात चर्चेमध्ये नेहमीच प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रोनिक मीडिया यांच्यावर आरोप केला जातो की, ते प्रवाहाच्या दिशेने जात असतात किंवा आपल्या मालकांच्या विचाराच्या दिशेने जात असतात, त्यांना त्यांच्याशी जुळवून घ्यावेच लागते. आता वृत्तपत्र व्यवसाय म्हणजे मोठय़ा भांडवली गुंतवणूक हे समीकरण झाले आहे. त्यामुळे त्यासाठी जाहिराती हेच मोठं माध्यम आहे.
लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी माध्यम हा एक महत्त्वाचा चौथा स्तंभ मानला जात आहे. वृत्तपत्रांना समाजमनाचा आरसाही म्हणतात, परंतु सध्याच्या परिस्थितीत तो स्तंभ डळमळीत झाला आहे काय? त्या आरशात स्पष्ट असे काही दिसत नाही का? अशी शंका निर्माण होत आहे. अर्थातच वृत्त माध्यमांचे मनोरंजनीकरण झाले आहे, असा सूर अनेकदा होणाऱया चर्चांमधून वाचायला ऐकायला मिळतो. अनेकदा अनेक सत्य समोर आणताना पत्रकारांवर हल्ले होतात. त्यादृष्टीने अशा पत्रकारांसाठी सुरक्षितता ही आवश्यक आहे. आपले विचार निर्भीडपणे मांडणे आणि आपली विवेकबुद्धी जागृत ठेवणे हे पत्रकारांसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी पत्रकारांनी प्रवाहाच्याच दिशेने वाहत न जाता विरुद्ध दिशेलाही जाण्याचा प्रयत्न करायला हवा आहे. अर्थात केवळ विरोधासाठी विरोध म्हणून नाही. विचार करायची अवस्था निर्माण झालेली आहे आणि तो झाला तरच अशी समाजमनाचे प्रबोधन करणारी पत्रकारिता, शोध पत्रकारिता टिकणार आहे. आज महाराष्ट्रात ‘दर्पण’कार बाळशाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘दर्पण दिन’ साजरा करतो. या दिवशी आपण या सर्व गोष्टींचा विचार एकूणच सामाजिक, राजकीय, आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व पातळीवर करण्याची गरज निर्माण झाली आहे असे वाटते. ती होईल तेव्हाच आपण खऱया अर्थाने ‘दर्पण दिन’ साजरा केला असे म्हणता येईल.