प्राणी दिवसाच्या शुभेच्छा कमी सांत्वना अधिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

4 ऑक्टोबर जगभरात प्राणी दिवस साजरा होतो आहे, वनविभागाने अनेक ठिकाणी वन्यजीव सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करुन वन्यजीवांच्या सुरक्षे प्रति जनजागृती करण्याचा संकल्प करुन कार्यक्रम पार पडताहेत. वन्यप्रेमी नागरिक, वनविभाग, संस्था, विद्यार्थी इत्यादी अनेकांचा यात उत्सफूर्त सहभाग आहे हे मानव वन्यजीवांतील ऋणानुबंधाची प्रचीती देणारे आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणात आणि आनंदात प्राणी दिवस साजरा होत असतो. यंदाच्या जागतिक प्राणी दिवसाला अनेक प्राण्यांवर विशेषकरून वन्यजीवांवर ओढवलेल्या आणि अनैसर्गिक लादलेल्या संकटांनी वेढलेल्या दुखाची किनार आहे. वर्तमानपत्रात प्रकाशित बातम्यांवरून या लादलेल्या संकटांचा अंदाज येऊ शकतो. नुकतंच एका मराठी वर्तमान पत्रात माळढोक शेतकऱ्यांचा मित्र असलेला पक्षी नामशेष झाल्याचे प्रकाशित झाले आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात माळढोक पक्षी दिसला नसल्याने त्याच्या नामशेष होण्याच्या निष्कर्षावर येण्याला नक्कीच महत्व आहे कारण अनेक तज्ज्ञांनी याबाबत अनेक वर्षांपासून सूचना दिल्या आहेत.  त्याबाबतीत काय उपाययोजना झाल्या हे कुणाला ज्ञात नाही, पण त्याच्या नामशेष होण्याच्या शक्यता मात्र सर्वश्रुत आहेत हा मोठा विरोधाभास आहे. माळढोकची संख्या इतकी खालवली आहे की आता त्यांचे संवर्धन होण्याची शक्यता दुरापास्त असल्याचे बीएनएचएसचे सहायक संचालक डॉ. गिरीश जठार यांचा निष्कर्ष आहे. इतकेच नाही तर जवळपास 100 पक्ष्यांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे तज्ञ्जांचे म्हणणे लादलेल्या संकटात अजून भर घालणारे आहे.  त्यात तणमोर सारख्या पक्ष्यांची गणना झाल्याने भविष्यातील एका गंभीर पर्यावरण संकटाचे संकेत देणाऱ्या ह्या घटना आहेत, पण याची नोंद प्राणी मित्र, वन्यजीव संस्था, संवर्धक यांच्या पुरती मर्यादित असल्याने अधिकच चिंतेत भर चालणारी आहे.

पांढरकवडा येथील नरभक्षक वाघीणीने परिसरातील 12 नागरिकांचा जीव घेतल्याने नागरिक आणि वाघीणीच्या हल्ल्यात दुर्दैवाने जीव गेलेल्यांचे कुटुंबीय शोक संतप्त आहेत. त्याभागात दहशतीची परिस्थिती उद्भवल्याने  वनविभागाने वाघिणीला गोळ्या घालण्याचे आदेश दिल्याने त्यावर कायदेशीर लढाई होवून सर्वोच्च न्यायालयात वाद पोहचला, अखेर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत वाघीण आणि तिच्या पिल्लांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत, या सर्व मानव वन्यजीव संघर्षात मात्र वनविभागाचा बळी जाण्याची वेळ आली आहे. यात भर म्हणून वाघीणीला शोधण्यासाठी आणलेल्या हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवाने एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले. प्राणी दिवसाच्या अगोदर घडलेल्या प्राण्यांच्या हल्ल्याची झळ नागरिकांना बसणे हे सुध्दा प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्या इतकेच दुख:द आहे. दिवसागणिक कमी होत चाललेल्या वनक्षेत्राचे हे द्योतक आहे.

महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा एकूण वनक्षेत्र हे 64 हजार चौ कि.मी इतके होते ते आज 50 हजार चौ कि.मी झाले आहे. गेल्या पाच दशकात १४ हजार चौ कि.मी वनक्षेत्रात झालेली घट आणि तुलनेने वन्यजीवांच्या संख्येतील वाढ ही या सर्व दुर्दैवी घटनांना कारणीभूत ठरते आहे.

गुजरातच्या गिर अभयारण्यात सिंहांचा संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाने रोज मृत्यू होतो आहे. गेल्या 20-22 दिवसात 23 सिंहांच्या मृत्यूने आशियातील सिंहांचा एकमात्र अधिवास असलेले गिर अभयारण्यातील सिंहांची सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या व्यतिरिक्त देशभरात नामशेष होत चालेल्या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातून कुठे मेट्रो शेड, रेल्वे तर कुठे महामार्गांचे तर कुठे निसर्गाचे वरदान लाभलेल्या क्षेत्रात औद्योगीकरणाचे नसते उद्योग आणून अडथळे उभे करुन अगोदरच कमी होत चाललेल्या वनक्षेत्रांना आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या सुपीक जमीनींना भकास करण्याचे नवीन मार्ग विकासाच्या नावावर लादल्या जाताहेत. हे उद्योग कमी पडले म्हणून प्राणी दिवसाच्या पूर्वसंध्येला मानव आणि वन्यजीवांच्या जखमांवर मीठ चोळणारे वक्तव्य राज्याच्या वनमंत्र्यांनी करुन त्यात अधिकच भर घातली आहे. आरे वसाहतीत वृक्ष तोडणाऱ्या मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना हाकलून लावणाऱ्या नागरिकांचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि राज्याच्या वनमंत्र्यांनी “आरे” हे वनक्षेत्र असल्याचा पुरावा मागितला आहे. तिथे आढळणारे जवळपास 40 बिबट्यांचे वास्तव्य वनमंत्री नाकारताहेत का? तिथली नैसर्गिक परिस्थिती, हिरवळ, प्राण्यांचे वास्तव्य ही मुंबईकरांना प्राणवायुचा पुरवठा करणारी आहे ह्या वास्तवाचे भान वनमंत्र्यांना असायला हवे, ते स्वतः राज्याचे वनमंत्री आहेत, त्यामुळे आपल्या विधानाचा अर्थ त्यांनी लावून बघितला तर त्यांना त्यांनीच विचरलेल्या अर्थहीन प्रश्नांची उत्तरे मिळतील. वनक्षेत्र हे निसर्गाने आणि वन्यजीवांनी बहरते शेती ही शेतकऱ्यांच्या घामाने आणि अथक परिश्रमाने फुलते तिथे बुध्दिबळाचा पट मांडून खेळ करण्यात उपयोग नसतो म्हणून वनमंत्र्यांनी आपल्या विधानाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.

मानव वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही घटना घडताहेत त्या निश्चितपणे दुख:द आणि दुर्दैवी आहेत. अनेक नागरिक वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी मृत्यूमुखी पडूनही मानवाचा प्राणी दिवस साजरा करण्याच्या उत्साहात कुठेच कमतरता नाही ह्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. जागतिक प्राणी दिवसाच्या पूर्वसंध्येला व अगोदरच्या घटना या मानव व प्राण्यांना शुभेच्छा देणाऱ्या कमी आणि सांत्वन देणाऱ्या अधिक आहेत!