
>> डॉ. सरिता विनय भावे
‘छोटी काशी’ नावाने ओळखले जाणारे बूंदी अश्मयुगीन हत्यारे व प्रागैतिहासिक भित्तिचित्रे यांचे माहेरघर आहे. आलिशान महाल, भव्य किल्ले, सरोवरे याद्वारे आपली निराळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरत आहे. असे असले तरी ‘सिटी ऑफ स्टेपवेल्स’ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या बूंदीचे खरे वैशिष्टय़ आहे इथल्या पायविहिरी अथवा पुंडे!
बुंदी’ म्हटलं की सर्वसामान्य मराठी व मध्य/उत्तर हिंदुस्थानी जनतेच्या डोळय़ांसमोर खायची बुंदी उभी राहून मुखकमलावर स्मितहास्य विलसते! परंतु आज आपण ज्या ‘बूंदी’बद्दल जाणून घेणार आहोत ते आहे राजस्थान राज्यातील एक शहर! राजस्थान राज्याची मेवाड, मारवाड, शेखावती वगैरे प्रांतवार विभागणी केली आहे त्यातील ‘हाडा’ या राजपूत राजांनी निर्मिलेल्या ‘हाडोती’ प्रभागात बूंदी, बरन, कोटा आणि झालावाड जिह्यांचा समावेश होतो. मुंबईहून बूंदीला पोचण्यासाठी कोटा रेल्वे जंक्शन महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक आहे. कोटापासून साधारण 40 कि. मी. अंतरावर आणि जयपूर सर्वात जवळचे विमानतळ (साधारण 200 कि. मी.) असलेल्या बूंदीला चारचाकी वाहनाने पोहोचणे सोपे आहे.
तीन बाजूंनी अरावली पर्वतरांगांच्या कुशीत, चिंचोळय़ा दरीत वसलेल्या, देखणा ‘व्हय़ू’ लाभलेल्या बूंदी शहराला पूर्व राजस्थानची ‘ब्ल्यू सिटी’ असेही संबोधतात. मीणा जमातीतील ‘बूंदा नाला’ राजाच्या नावावरून या गावाला ‘बूंदी’ हे नामाभिधान मिळाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘राजपुताना’ क्षेत्रात ‘प्रिन्सली स्टेट’ म्हणून मिरवणारे बूंदी शहर वर्तमानकाळात ‘ऑफबीट’ पर्यटन स्थळ म्हणून हौशी पर्यटकांच्या ‘बकेटलिस्ट’ मध्ये वरच्या क्रमांकावर आले आहे. ‘छोटी काशी’ नावाने ओळखले जाणारे बूंदी अश्मयुगीन हत्यारे व प्रागैतिहासिक भित्तिचित्रे यांचे माहेरघर आहे. आलिशान महाल, भव्य किल्ले, सरोवरे याद्वारे आपली निराळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरत आहे. असे असले तरी ‘सिटी ऑफ स्टेपवेल्स’ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या बूंदीचे खरे वैशिष्टय़ आहे इथल्या पायविहिरी अथवा पुंडे! पायविहिरींना बारव, बाव, बावली, बावडी, वाव अशी विविध नावांनी आपल्याकडे ओळखले जाते.
धार्मिक कल असणाऱ्या समाजात ‘पुत्रधर्मा’चे पालन अन्नदान, विहिरी खणणे, पाण्याचे हौद बांधणे, झाडे लावणे, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे यांसारख्या पुण्यकर्मांतून साधले जाते. म्हणूनच राजस्थान, गुजरातसारख्या दुष्काळग्रस्त, पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या रेताड राज्यांत राजे-महाराजे, धनाढय़ सावकार यांनी प्रजेला, प्राण्यांना, शेतीला वर्षभर पुरेल असे पाणी पुरवणाऱ्या विहिरी, पुंडे जागोजागी बांधणे महत्त्वाचे कार्य मानले. जमिनीतील झिरपणाऱ्या पाण्याचा साठा करणाऱ्या आणि आपल्या विशिष्ट स्थापत्यामुळे भूगर्भ-धरा-स्वर्ग या तिन्ही ‘लोकांना’ जोडणाऱ्या या जीवनदायी पायविहिरींना साहजिकच पवित्रतेचे प्रतीक मानले गेले. या विहिरी नेहमीच स्त्र्ायांचे हक्काचे स्थान राहिल्या आहेत. गुजरात राज्यातील पायविहिरींचा अभ्यास केलेल्या लेखिका पुर्णिमा मेहता भट्ट यांच्या मते पायविहिरी बांधण्यामागच्या ‘स्फूर्तिस्थान’ ग्रामदेवता, दयाळू आई, सद्गुणी पत्नी तर कधी विशेष लाडकी प्रेयसी असायच्या. स्वतःची चटणी-भाकरी घेऊन प्रवासाला निघालेल्या वाटसरूंची पिण्याच्या पाण्यासाठी वाटेवरल्या या विहिरींवरतीच भिस्त असायची. प्रवाशांना खाली उतरून पाणी घेणे तसेच विहिरींची देखभाल करणेही सोपे जावे यासाठी वैशिष्टय़पूर्ण पायऱ्या-पायऱ्यांची रचना केली जायची.
विहिरी बांधण्यामागचा मुख्य उद्देश जलसंवर्धन आणि पुनर्भरण (रिचार्जिंग) असतो. भौगोलिक रचनेचा फायदा मिळालेल्या तसेच भूपृष्ठाखालील जलाचा स्तर चांगला असलेल्या बूंदी शहरात म्हणूनच अशा विहिरी जोपासल्या गेल्या. या विहिरी/पुंडे चौरस अथवा इंग्रजी भाषेतील आय, एल, टी, यू, व्ही, झेड या आकारात असत. विहिरींच्या बाजूंवर भक्तीचे प्रतीक म्हणून कोरलेल्या देव-देवतांमुळे त्यांचे स्थापत्यसौंदर्य वाढायचे. पूर्वी बूंदी शहरात पायविहिरींची संख्या शंभरावर होती. आता साधारण पन्नास विहिरी अस्तित्वात असून त्यातील काही मोडकळीस आल्या आहेत. पायविहिरींतील पाणी अस्वच्छ/दूषित असून रोगराई फैलावण्यास कारणीभूत ठरेल या अनाठायी भीतीने बऱ्याच विहिरी इंग्रजांनी भराव घालून झाकून टाकल्या आहेत. संरक्षित स्मारक असलेल्या काही विहिरींच्या पायऱ्यांवर असलेला केरकचरा, देखभालीतील हयगय मन खट्टू करते. ‘नगर सागर’ ही जोडपुंडे भरचौकात असल्याने गर्दीत मिसळून गेली आहेत. अस्वच्छ असूनही त्यांचे मूळ सौंदर्य लपत नाही. दुसऱ्या एका बावडीची रचना बघून ‘हम्पी’च्या ‘पुष्करिणी’ची आठवण होते. ‘धाभाई का पुंड’ बूंदीतील सर्वात प्रेक्षणीय पुंड मानले जाते. 18 व्या शतकात दोन व्यापारी बंधूंनी बांधलेल्या या पुंडाच्या दोन बाजूंना गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे पुंड सर्वात मोठे तर आहेच ढखोली 53 मीटर (173 फूट)ल शिवाय त्याचा उलटय़ा पिरॅमिडसारखा आकारसुद्धा विशेष वाटतो. पुंडाची तीन बाजूंची पायऱ्या-पायऱ्यांची (साधारण 700) भौमितीय रचना तर नजर अक्षरशः खिळवून ठेवते. त्या ‘लाटांवरून’ चढता-उतरताना एका गूढ विश्वातून मार्गक्रमण करत आहोत असा ‘फील’ येतो! या पुंडाच्या एका बाजूला विश्रांतीसाठीचे अलंकृत बांधकाम केलेले दिसते. पुंडाजवळ उंच चौथऱ्यावर उभारलेली दोन विशाल छत्रीवजा स्मारके अफलातून आहेत. त्यांच्या मधोमध असलेली भव्य शिवलिंगे तसेच घुमटाच्या आतील कोरीवकाम लक्षवेधक आहेत. दुष्काळग्रस्त राजस्थानी जनतेच्या हितासाठी बांधलेले हे पुंड हेतू, स्थापत्य, भव्यता, सुंदरतेमुळे ‘हाडोतीची राणी’ असलेल्या बूंदीची ‘गोड’ आठवण आपल्या हृदयात कायम जागृत ठेवते!




























































