लेख – वेब न्यूज – अंतराळात बनवले सिमेंट

523

>> स्पायडरमॅन

भविष्यात पृथ्वी मानवी निवासासाठी अयोग्य होणार असून, ग्लोबल वार्ंमगपासून ते इलेक्ट्रॉनिक कचरा, पाण्याचे नाहीसे होणे, प्रदूषण इ. अनेक कारणांनी मानवाला जर आपले स्थान या जगात टिकवायचे असेल, तर पृथ्वी सोडून अन्य वस्तीसाठी योग्य जागांचा आश्रय घ्यावा लागणार आहे हे नक्की. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ या विषयावरती अभ्यास करत असून, विविध शक्यतांचा आढावादेखील घेत आहेत. यातील जवळजवळ सर्वच शास्त्रज्ञांचा आवडीचा अभ्यासाचा विषय म्हणजे, अंतराळात मानवी वसतिस्थाने उभी करणे आणि मानवांचे अंतराळातील भविष्यातील जीवन होय. भविष्यात अंतराळात वस्ती करायची तर अनेक साधन सुविधांची गरज ही मानवाला पडणार आहे. यातील प्रमुख म्हणजे राहण्यासाठी आणि पुढील सुविधा उभारण्यासाठीचा अभ्यास करण्यासाठी वसतिस्थानाची गरज.

आता या अडचणीच्या मार्गातील पहिला अडथळा पार करत, शास्त्रज्ञांनी अंतराळातच सिमेंट बनवण्यात यश मिळवले आहे. मानवाच्या या अभिनव यशाविषयी नुकतीच नासाने माहिती दिली आहे. अंतराळात मायक्रो ग्रॅव्हिटीचे परिणाम अभ्यासण्याच्या प्रयोगाचाच एक भाग असलेल्या या प्रयोगात सिमेंट पावडरची पेस्ट, वाळू आणि खडक यापासून हे सिमेंट कॉंक्रिट बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. भविष्यात हे सिमेंट अंतराळात वापरण्यासाठी अत्यंत परिणामकारक पदार्थ ठरणार असून, हे सिमेंट अतिउच्च तापमान आणि रेडीएशनपासून संरक्षण देणारे आहे. याच वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार अशा प्रकारचे सिमेंट हे चंद्र आणि मंगळावरच्या मातीपासून देखील बनवणे शक्य होणार आहे. याचाच अर्थ, पृथ्वीवरून कोणत्याही प्रकारचे वेगळे सामान अंतराळात पाठवण्याची गरज नसल्याने, अंतराळात सिमेंट बनवण्याच्या खर्चात प्रचंड बचतदेखील शक्य होणार आहे. सध्या शास्त्रज्ञ या सिमेंटवरती ग्रॅव्हिटी, अर्थात गुरुत्वाकर्षणाचे काय परिणाम होतात आणि अंतराळात हे सिमेंट लवकर वाळून कणखर होण्यासाठी काय काय उपाय करता येतील यावरती अभ्यास करत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात ‘Microgravity Investigation of Cement Solidification’ नावाच्या प्रोजेक्टखाली या विषयावरती अभ्यास चालू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या