मुद्दा : मध्य रेल्वे आणि मराठी

125


>> दि. मा. प्रभुदेसाई

अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या डब्यात अनेक घोषणा तीन भाषांमध्ये उद्घोषित केल्या जातात. त्यात आता आणखी काही सूचनांची भर पडली आहे. प्रत्येक स्थानकावर गाडी थांबताना व सुरू होताना या सूचना दिल्या जातात. प्रवाशांवर जणू सूचनांचा भडीमारच होत असतो! त्यामुळे कंटाळा येऊन प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ होते ती अशी! त्यांचे सातत्य कमी केल्यास बरे होईल.

गर्दी असताना चौथ्या सीटसाठी भांडणारे प्रवासी गर्दी नसताना त्या रिकाम्या सीटवर पाय ठेवून बसलेले असतात. काही जण पादत्राणांसहीत! पुढच्या स्थानकावर आत येणाऱ्या प्रवाशांना त्या जागेवर बसावेसे वाटत नाही. पाय खाली ठेवण्याची विनंती केल्यास काही जण मानतात, काही जण दुर्लक्ष करतात, काही जण ‘जागा रिकामी आहे ना?’ असा प्रश्न विचारतात तर काही जण ‘तुम्हारे बाप की गाडी है क्या?’ असे विचारण्यासही कमी करत नाहीत. म्हणून ‘रिकाम्या जागेवर पाय ठेवू नका’ अशी सूचना करावी. एवढेच नव्हे तर तशी पत्रकेही सर्वत्र लावावीत अशी माझी सूचना आहे.

खरे तर मला एका मजेदार मराठी घोषणेकडे लक्ष वेधायचे आहे. ‘चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नका’ ही ती घोषणा.

लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांनाच गाडीच्या बाहेर डोकावून बघण्याची मोठी हौस असते. म्हणून तर सर्वजण खिडकीजवळची जागा पकडण्याची खटपट करत असतात! ही सूचना वाचल्यावर मला वाटले, आता रेल्वे गाडय़ांच्या डब्यांच्या सर्व खिडक्या बंद करणार! गाडी चालू झाल्याबरोबर डब्यांचे दरवाजे आपोआप बंद करण्याचे तंत्र रेल्वेने त्याच हेतूने आणले असावे अशीही मला शंका आली, पण ते मान्य नसल्यामुळे गाडीनेच तसे करण्यास नकार दिला असावा.

या घोषणेत ‘डोकावणे’ हा चुकीचा मराठी शब्द वापरला आहे हे आता सर्वांच्या लक्षात आले असेल. गंमत म्हणजे इंग्रजीतील ‘Lean out’ याचा मराठीत अर्थ ‘झुकणे’ असाच आहे आणि हिंदी भाषेत तर मराठीशी जुळणारा ‘झुकना’ असाच शब्द वापरला आहे. असे असताना ‘डोकावणे’ हा शब्द कोणाच्या डोक्यात डोकावला कोण जाणे! म्हणून मराठीतील योग्य घोषणा ‘चालत्या गाडीच्या दरवाजात उभे राहून बाहेर झुकू नका’ अशी असली पाहिजे.

कुणीतरी एखादा मराठी भाषाप्रेमी हे रेल्वेच्या नजरेस आणील म्हणून वाट पाहण्यात वेळ गेल्यामुळे ही सूचना करण्यास मला विलंब झाला आहे. म्हणून केवळ मध्य रेल्वेनेच नव्हे तर पश्चिम रेल्वेनेही, तिथेही चुकीची घोषणा उद्घोषित केली जात असल्यास मी सूचविलेली वरील योग्य घोषणा त्वरित उद्घोषण्याची व्यवस्था करावी.

आपली प्रतिक्रिया द्या