
>> रणवीर राजपूत
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना सामाजिक न्यायाचे जनक म्हणावे लागेल. मागासवर्गीयांचे जीवनमान सुधारून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाहूंनी आपल्या कोल्हापूर संस्थानात ‘आरक्षण कायदा’ लागू केला. मागासवर्गीय जाती-जमाती व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना शिक्षणाची कवाडं खुली केल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास होणार नाही हे जाणून छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करून त्यावरील शैक्षणिक शुल्क माफ केले. 26 जून हा छत्रपती शाहू महाराजांचा जयंती दिन. त्यानिमित्त अशा महान राजाच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख.
हिंदुस्थानच्या इतिहासात ज्या राजांनी समाजातील गोरगरीब, मागास, निराधार, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं, त्यात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे नाव अग्रणी घेतले जाते. मागासवर्गीयांचे जीवनमान सुधारून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाहूंनी आपल्या कोल्हापूर संस्थानात ‘आरक्षण कायदा’ लागू केला. याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन, स्त्राr शिक्षणास प्राधान्य, महिला संरक्षण कायद्याची निर्मिती, विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महार वतन खालसा, बलुतेदार पद्धतीवर बंदी यासंबंधीचे समाजोपयोगी निर्णय अमलात आणले.
मागासवर्गीय जाती-जमाती व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना शिक्षणाची कवाडं खुली केल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास होणार नाही हे जाणून छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करून त्यावरील शैक्षणिक शुल्क माफ केले. इतकेच नव्हे तर पाल्यांना शाळेत न पाठविणाऱया पालकांना प्रतिमहा एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली. प्राथमिक शिक्षण योजनेंतर्गत किमान 500 ते 1000 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये शाळा स्थापन केल्या. मागास जातींतील प्रौढ स्त्र्ायांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणाऱया शिक्षिकांना महाराजांतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असे. शाहू महाराजांनी सामाजिक गुलामगिरीचे उच्चाटन करून सामाजिक समानता निर्माण होण्यासाठी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले. ‘सामाजिक समता’ प्रस्थापित करून समाजातील ‘आहेरे अन् नाहीरे’ यातील दरी मिटविण्यासाठी शाहू महाराजांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले.
आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते
आधुनिक पद्धतीने शेतकऱयांनी शेती करावी यासाठी शाहू महाराज आग्रही असत. कृषीविषयक आधुनिक धोरणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी 1912 मध्ये कोल्हापुरात ‘किंग एडवर्ड ऑग्रिकल्चर इन्स्टिटय़ूट’ची स्थापना केली. आधुनिक पद्धतीने शेतकऱयांनी शेती करावी यासाठी त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाने तयार केलेल्या अवजारांचे एक म्युझियम सुरू केले. शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराजांनी कृषी अधिकाऱयांची नियुक्ती केली. शेतकऱयांच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी ‘राधानगरी धरणा’ची निर्मिती केली. त्यांच्या कल्पनेतून साकारलेले ‘कोल्हापूर टाईप बंधारे’ हे आज सर्वत्र रोल मॉडेल ठरले आहेत.
आपण केवळ शेतकरी वा सैनिक व्हावे ही गोष्ट समाधानकारक नाही. यासाठी व्यापार, उद्योगात शिरून उद्यमशील व्हावं. आज हे धाडस आपण केलं नाही, तर आपल्या सर्व चळवळी कुचकामी ठरतील, असा मोलाचा उपदेश त्यांनी रयतेला दिला. शाहूंनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शिरोळ येथे ‘जयसिंगपूर बाजारपेठ’ स्थापन केली. त्याबरोबरच त्यांनी तेल उद्योग, सुगंधी औषधी उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, कपडा उद्योग आदी लोकोपयोगी उपक्रम राबविले. 1906 मध्ये शाहू महाराजांनी ‘स्पिनिग अँड वीव्हिंग मिल’ची उभारणी केली. कामगारांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘राजाराम इंडस्ट्रियल स्कूल’ची निर्मिती केली. आपण सर्वप्रथम उद्यमशील व्हावे यासाठी शाहूंनी आपल्या दोन्ही सुपुत्रांना उद्यमशील केलं अन् कोल्हापूर संस्थानात उद्योगाचे जाळे निर्माण करून लाखो लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला. त्यामुळे आजही शाहूंची ‘दूरदृष्टीचा राजा’ म्हणून जनमानसात ख्याती आहे.
कलावंतांचे आश्रयदाते
शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात संगीत, नाटय़, चित्रपट क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय दिला. गानमहर्षी अल्लादिया खाँ, भास्करबुवा बखले, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर,शालीग्राम, गोविंदबुवा, निवृत्तीबुवा सरनाईक आदी कलावंत कोल्हापूर नगरीत नावारूपाला आले. त्याप्रमाणेच शाहीर विठ्ठल ढोणे, रामचंद्र माळी, लहरी हैदर हे नामवंत शाहीर तसेच बालगंधर्व, शंकरराव सरनाईक, हिराबाई बडोदेकर अशा नाटककारांची येथे जडणघडण झाली. शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान ही नाटके आणि पुंडलिक, राजा हरिश्चंद्र हे चित्रपट, तर कलामहर्षी दादासाहेब फाळके, दादासाहेब तोरणे, बाबूराव पेंटर या ज्येष्ठ-श्रेष्ठ कलावंतांना त्यांनी सन्मानित करून प्रोत्साहित केलं.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे महान सामाजिक कार्य राज्यातील लोकांच्या सदैव स्मरणात राहावे या उद्देशाने महाराजांच्या नावाने राज्य सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्यात राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना अन् राजर्षी शाहू गुणवत्ता शिष्यवृत्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी – विद्यार्थिनींना दिली जाते. शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफत तसेच मुलींना बारावीपर्यंतचे मोफत शिक्षण या व अन्य हितकारक योजना राज्य सरकार कार्यान्वित करीत आहे. मागासवर्गीय लोकांच्या पाल्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात व सरकारी नोकऱयांमध्ये शासनाच्या नियमावलीप्रमाणे सोयीसवलती दिल्या जातात. शाहू महाराजांचे ‘सामाजिक न्याय’ हे धोरण अवलंबणे ही राज्य सरकारची मुख्य भूमिका आहे. त्यांनी दाखविलेल्या सामाजिक समतेच्या महामार्गावर मार्गक्रमण करून राज्यकारभार चालविणे हीच खरी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना ठरेल.




























































